Tuesday, October 1, 2013

कातरवेळ

जीव कापरा कापरा
वेळ कातर कातर
सांज पहाटेच्या मधे
एका रात्रीचे अंतर
धेनू हंबरती कशा
गूढ गंभीर गंभीर
घरट्यात परतली
सारी पाखरे अधीर
असा सूर्य वितळला
क्षितीजाच्या रेषेवर
लाटा लालबुंद मंद
सागराचा नीर तीर
तम दाटे दाहिदिशा
त्यासी चंद्राचा आधार
चंद्रकोरीने पेलला
गर्द अंधार अंधार
सांजवेळी वृंदावन
उजळले देवघर
चराचरी तो भरुनी
आला चैतन्याचा पूर
अनुराधा म्हापणकर