जातोस ना.. जा...
अजिबात.. थांबु नकोस ..
जाताजाता साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..
निरोपाचा अर्धा हातसुद्धा हलवू नकोस..
कसली अपेक्षा नाही..
आणि आता तर
कसली इच्छासुद्धा नाही..
.
आई होण्याची किंमत
मोजेन मी एकटीच..
एकांताला माझ्या आता
वाचा फोडू नकोस..
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस..
.
.
तुझ्या आवडी निवडीसाठी
झिजत राहिले अखंड
स्वत:साठी जगेन उरलेले
हे स्वप्न तरी आता मोडु नकोस
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
.
.
जग तुझ्यावर हसेल..
कुपुत्र म्हणुन हिणवेल..
तरी डोळ्यांवरची झापडं
दूर सारु नकोस..
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
.
ऐक एकच शेवटचे..
पुन्हा त्रास नाही देणार
अशीच एके दिवशी मी
शेवटला श्वास घेणार..
कुडीतून सोडताना प्राण
तुला क्षमासुद्धा करणार
.
पण..
शपथ आहे तुला बाळा..
पाजलेल्या त्या दुधाची..
बेवारस राहुदे.. कलेवर माझे...
लोक लज्जेस्तवही मला
अग्नी द्यायला तू येऊ नकोस....
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
जाताना साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर
Thursday, March 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
Beutiful! Simply beutiful no words to describe my feelings
ReplyDelete