Saturday, April 5, 2008

माझंच काही चुकतंय का..

वेड्यासारखी हल्ली कुठेही मी कविता करत असते
मुलं खेळण्यात रमावी तशी शब्दांशी खेळत बसते

किचनमधे तडतडून जेव्हा डाळीला देते फोडणी
आह..! कशी उस्फूर्त! शब्दांची जुळून येते मांडणी

मंडईत.. मैफ़िलीत.. गर्दीतही मी गुंग स्वत:त
गर्दीचे शब्द माझ्या मनापर्यंत कुठे पोचतात

आसपासच्या सार्‍यांनीच वेड्यात मला काढलंय
म्हणे हीचं खूळ आजकाल जास्तच जरा वाढलंय

कोणी मेल्यावरसुद्धा हल्ली काव्य हीला स्फूरतं
कविता करुन का कधी पोट कोणाचं भरतं ..?

माझंच काही चुकतंय का.. कधी कधी मला वाटतं
तरी पुन्हा पुन्हा मन माझं शब्दातच गुंतून राहतं..

माझ्या शब्दांची महती सांगायला शब्द मला स्फूरत नाही
खरं सांगायचं तर बोलायला शब्दच माझ्याकडे उरत नाही

कसे समजावू- चार दिवस कदाचित ऑक्सिजनशिवायही राहीन
पण कवितेला सोडुन माझ्या - एका निष्प्राण देहाला मी वाहीन

जाऊदे- माहितेय मला-
कविता करणार्‍याला व्यवहारी जगात किमंत उरत नाही
तुम्ही कितीही म्हणा हो.. "वा वा.. अप्रतिम.."
कारण रसिकहो.. नुसतं म्हणायला खरच पैसे पडत नाही
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment