Thursday, May 29, 2008

नकोस बोलू शब्दांनी तू..

नजरेत वाचते मी
तुझ्या मनीची भावना
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

तुझा चेहराही बोलतो
सांगतो अंतरीच्या खुणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

अधीर स्पर्शातूनी पाहिले
मनावर उठलेल्या व्रणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना
.
.
बघ डोळ्यानीच माझ्या
गोंजारते तुझी भावना
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

चेहर्‍यास चेहर्‍याचा आरसा
टिपतो सार्‍या खाणाखुणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

स्पर्शाचीच फुंकर मारते
हळुवार झाकिते तुझ्या व्रणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, May 28, 2008

जन्नत की सैर..


काश्मिर फिरून आले..
पावला पावला वर एकच..!
काश्मिर वर एक कविता..
म्हणे तू करून टाकच..!
.
ते सौंदर्य अस्मानीचे..
स्वर्ग खरोखर-आली प्रचिती..
आस्वाद घ्यायचा निव्वळ
अशीच निसर्गाची कला-कृती

जे अनुभवले.. नजरेने.. ते सारे
कलेन्डर मधेच पाहिले होते..
याचि देही याचि डोळा पहावे
असे खरच पहायचे राहिले होते

इंद्रधनुष्यातही मावणार नाहीत
इतक्या रंगाची भवताली उधळण
त्यावर कडी .. फुलांचा बहर
रंगात रंगांची पखरण

आपल्या हातात हात गुंफून
तिथे चालते खळाळते पाणी..
शुभ्र फेसाळते.. झरझर निर्झर
तुषार उडवती मनाच्या अंगणी

नजर अडविती पर्वत रांगा..
शुभ्र हिम-शिरपेच त्यांच्या डोई
शांत पहुडले दाही दिशांना
ढगांची ओढूनी मस्त दुलई

सूर्य किरण त्यावरी नाचरे
टाकती सोनेरी नेत्र कटाक्ष
स्वयें जणु मी ब्रह्म पाहिले
माझ्या मनास पटली साक्ष

गार बर्फ़.. मी त्यावरी चालते..
की चंद्रावर टाकले पाऊल
स्वर्ग स्वर्ग तो हाच नक्की..
पुन्हा पुन्हा लागते चाहूल

सोनमर्ग.. गुलमर्ग.. पहेलगाम
दृश्य इंद्र्यि जणु तृप्त शांत झाली
दाल लेक वर हाऊसबोट-शिकारे..
मने जणु त्यावर तरंगूनी आली

डोळ्यांच्या इवल्याशा खाचात दोन
मावू म्हणता सारे मावत नाही..
शब्दात बांधायचा मग का हा हट्ट
काय करावे.. पण रहावत नाही...!!

अपूरे सारे.. शब्दांनाही मर्यादा,
सौंदर्य वाचून समजायचे नसते
अमर्याद विखुरलेले ते सौंदर्य
स्वत:च अनुभवायचे असते..!

:सौ. अनुराधा म्हापणकर.

बिसलेरी..

उन्हाळा मी म्हणतो..
आम्ही तापतो.. तहानतो.. तळमळतो..
मग एसीची काळी काच सरकवतो..
एका दुकानासमोर नोटा भिरकवतो..
बिसलेरीच्या बाटल्यावर बाटल्या रिचवतो..
आम्हाला त्यावर लिम्का लेमोनेडही लागतो..
.
तेव्हाच..
तहानला एक जीव रस्त्यावरही असतो..
सार्वजनिक नळाला तो झोंबताना दिसतो..
ओंजळ हातांची करून पाणी घटाघटा पितो..
.
तो जीव मग शांत .. तृप्त...
मिजास खोर आम्ही खरच...!
.
आमची तहान कध्धी भागतच नाही...!!
:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर