Tuesday, July 24, 2012

सुखाच्या शोधात


कुठे आहे निखळ सुख
कुठे शोधावं त्याचं कारण
नक्की कुठल्या दु:खाला
ठेवावं त्यासाठी तारण
कुठल्या आनंदाचं बांधावं
पापणीच्या दारी तोरण
नक्की कुठल्या भावनेचं
थांबवायला हवं मरण
कुठल्या देवादिकांना जावं
त्या सुखासाठी शरण
कसं आणि कशाने घालावं
वाहत्या आसवाला धरण
कुठल्या रातीच्या स्वप्नांला
वास्तवात मागावं आंदण
कुठल्या आशा अपेक्षेचं
नयनी रेखाटावं कोंदण
कुठेतरी ते नक्कीच आहे
कुठल्यातरी फुलांत, बागडणा-या मुलांत
कुणाच्यातरी जगण्यात, कुणाच्यातरी मानण्यात
आहे ते आहे…
सुख कुठेतरी जवळपास..
नक्कीच आहे सुख कुठेतरी जवळपास..

अनुराधा म्हापणकर

उध्वस्त !

.
उध्वस्त मन..
युद्धात बेचिराख झालेल्या शहरासारखे
मनात सर्वभर भग्नावशेष..
जळून गेलेल्या काळ्याकुट्ट घरांसारखे
एकदोन अस्वस्थ विचार रांगणारे
बेचिराख शहरात वाचलेल्या एकदोघांनी
उठण्यासाठी धडपडावं असे
.
.
ते एकदोन विचार आता जगवायला हवे
बेचिराख शहरातल्या माणसांना
उठवायला हात द्यावा तसे
ते बेचिराख शहर ....
पुन्हा वसवायला हवंच ना !!
.
अनुराधा म्हापणकर