Friday, November 28, 2008

नोंद..!

माहीत नाही कुठे.. पण
होतेय नोंद माझ्या सत्कर्मांची..!

कुठल्याशा वहीत..
होतोय माझा पुण्यसंचय..!

एका अज्ञात पोतडीत
ठेवतंय हिशोब माझ्या जमेचा..
कुणी अकाउंटंट..!

माझ्यातलं माणूसपण
कुणाला तरी कळलंय..!

न विकलेल्या मूल्यांची किंमत
कोणीतरी केलीय..!

म्हणूनच फिरलेय कदाचित माघारी
त्या ठळक होत चाललेल्या सीमारेषेहून..
निर्धोक.. सुरक्षित..!!!


सौ. अनुराधा म्हापणकर

जमाखर्च

.
व्यवहार भावनांचा कागदावर सांडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

रक्तांचीच काही नाती
नवी काही जोडलेली
आतड्याच्या ममतेने
आतूनच ओढलेली

नात्यांचा नाजूक रेशमी बंध जोडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

घडली हातून सेवा
थोडा केला परमार्थ
जगण्याचा त्यात माझ्या
गवसला मला अर्थ

व्यर्थ अहंकार माझा स्वत:हून मोडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

खर्चले फक्त शब्द
गोड आणि मुग्ध
सुख भरुन वाहिले
सारे जमेत राहिले

समाधान तृप्तीचा घडा अखंड ओसंडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, November 24, 2008

बिनअर्थाचे काही शब्द

बिनअर्थाचे काही शब्द
माझ्याकडे आले एकदा
’मला कवितेत घे’ म्हणत
सा-यांनी लावला तगादा

कधी नव्हे ते स्पष्ट बोलले
म्हटलं-अज्जिबात नाही जमणार
निरर्थक बिनबुडाची कविता
मी कध्धी कध्धी नाही करणार

चिडले - रुसले- माझ्यावर
अगदी फुरगटूनच बसले
त्यातले काही शब्द तर
हट्टाने पेटूनच उठले

म्हणाले - बघ विचार कर
वापर तुझी सद्सदविवेक बुद्धी
नाहीतरी तुझ्या कवितांची
अलिकडे फार वाढलीय रद्दी

"कोंबडी पळाली लंगडी घालून"
"ढिपाडी ढीपांग"- ऐकलंस ना
निरर्थक शब्दांचेही होते गाणे
आणि त्यातही असते भावना

गीतकार होणे गाणे लिहिणे
तुला कध्धीच नाही जमणार
आयुष्यभर म्हणे फक्त फक्त
तू "कविता"च करत रहाणार..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, November 19, 2008

विलपॉवर..!

.
"शी इज क्रिटीकल"..!
काळजाचा ठोका चुकला..
कित्ती कित्ती सोप्पंय म्हणणं
वैताग आलाय जगण्याचा..
पण समोर येतं साक्षात-
तेव्हाच साक्षात्कार होतो
आपण आपल्या जगण्यावर
फार फार प्रेम करतो
दिसत रहातात भोवताली
अश्रू गिळलेल्या पापण्या..
भेदरलेली नजर पिल्लांची..
काही हरत चाललेले हात..!
.
मग जागी होते एक आंतरिक शक्ती
एक प्रबळ इच्छा.. जगण्याची उर्मी..
तीच ती .. विलपॉवर..!
खेचून आणण्याचं सामर्थ्य तिच्यात..!
आणि मग पुन्हा येतो तोच आवाज..
"आऊट ऑफ़ डेंजर नाऊ"..!!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

उत्तर..

.
का विचारतोस असं..
माझ्या डोळ्यात डोळे रुतवून..
अजूनही आवडतो का तुला मी?..
तेवढाच..!

तू म्हणालास..
विझलीस.. का निजलीस..?
मी मात्र.. पापण्याआड
तुझं रुप साठवत राहिले
तुझे माझे क्षण आठवत राहिले

उत्तर द्यायला क्षणात
उघडले होते रे डोळे..
थोडं थांबला असतास तर
माझ्या डोळ्यातच तुला
तुझं उत्तर मिळालं असतं..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

गर्ल फ्रेंड..!

.
सहा वर्षांचं पिल्लू माझं
खेळता खेळता मैत्रिणीला घरी घेऊन आला
आजोबा म्हणाले.. कोण रे ही..??
झटक्यात उत्तर..
माझी गर्ल फ्रेंड..!
कित्ती निरागस उत्तर..
’माझी मैत्रिण’ - या शब्दाचं भाषांतर फक्त..!
पण मला हसू आवरता आवरेना..
आणि त्याचं काय चुकलं
त्याला काही कळेना..
त्याच्या मैत्रिणीचा छान गालगुच्चा घेतला..
म्हटलं.. काही नाही रे.. पळा खेळायला..!!
.
.
थोडी वर्षं आहेत अजून
मग पुन्हा म्हणेल.. माझी गर्ल फ्रेंड..!!
.
त्यावेळी सुद्धा असंच हसू यायला हवं..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

सारे स्वत:चे..!!

.
पाण्याचा रंग घेतला
हवेचा संग घेतला

पाणी कसं मिसळतं कोणातही
हवा कशी गंध घेते कोणाचाही..

पण मग सरभेसळ झाली..
माझ्या सात्विक रंगात
भलतीच मिसळ झाली..

माझा दरवळ लपला..
भलताच दर्प आला

उगारलेल्या रंगाने
त्या उग्राट दर्पाने

जागी झाले
भानावर आले

पाण्याबाहेर आले
हवेला दूर केले


माझे अस्तित्व.. मीपण माझे
गंध माझा.. आणि रंग ही माझे
जगते घेऊन आता सारे स्वत:चे..!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

सी - सॉ.............

.
ते दिवस असे होते
आई बाबांबरोबर आम्ही बागेत जायचो..
घसरगुंडी.. सी-सॉ..
मग हिरवळीवर बसून सुकी भेळ खायचो..
आता ती बाग..
त्या बागेतली सारी हिरवळ सुकून गेलीय..
तो हलणारा सी-सॉ
ती झूम घसरगुंडी पार तुटूनमोडून गेलीय..
कारण आमची
रविवारची संध्याकाळ आता मॉलमधे हरवलीय
व्हिडीओ गेम.. सिनेमा..
पिझ्झा..आइसक्रीमची जीभेला चटक लागलीय
जगण्याची स्टाइल बदलली..
आणि आनंदाची व्याख्याही..!
मन कधी कधी
सी-सॉ सारखं हिंदकळतं...
दुखून कधीतरी
आतल्या आतच.. कळवळतं..
घसरगुंडीच्या एका बाजूने वर चढतोय..
का.... दुस-या बाजूने घसरत जातोय...
खरंच... कळतच नाही..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

Monday, November 10, 2008

एक पूर्ण वर्तुळ..

.
रशिया चायना.. आफ्रिका..
उत्तर आणि दक्षिण अमेरिका..
भूगोलाचे एकेक नकाशे
पोलपाटावर आकारता साकारता
कधी कंपास लावून गोल करावा
आणि त्रिज्या जुळाव्यात तश्शी
अगदी गोssल पोळी केली पहिली..
आणि मग...
शिकले.. लग्नाची झाले..
सारेच कसे जुळून येत गेले..
.
हल्ली.. माझी लेक..
पोलपाटावर असेच नकाशे काढू लागलीय..
तिला कित्ती म्हणते...
थांब ग राणी..! वेळ आहे ग अजून..!!
तरी.. किती घाई तिला..!!
एक वर्तुळ पूर्ण व्हायला पहातय..!
दुनिया गोल आहे म्हणतात.. म्हणूनच का?
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, November 1, 2008

जगण्याचा तो धागा

.
दिवस कस्सा..
धावपळ.. नुसती..
घाईगर्दी.. गडबड नसती..

चिवचिवाट मुलांचा
घरभर पसारा..
युनिफ़ॉर्म.. कज्युअल्स..
कपड्यांचा ढिगारा

रेशन.. प्रोविजन..
ठेवायचा चोख हिशोब सारा
डाळ तांदूळ भाजीपाला
ब्रेकफास्ट जेवणं-रेसिपींचा मारा

फडफडणारे पेपर्स
फ़ाइल वेळेवर करा
मख्ख चेह-याचे आकडे
रिटर्न्स वेळेतच भरा

विस्कटल्या घराची
पुन्हा पुन्हा लावते घडी
पाठ टेकवताना गादीवर
असते अर्धमेली कुडी
.
तुझ्या खांद्यावर मान
शीण सारा जावा सरूनी
विषय वासने पल्याड
असा तुझा स्पर्श संजिवनी

हक्काची एकमेव जगात
ती सिक्युअर्ड आहे जागा
पकडून चालते मी ज्याला
माझ्या जगण्याचा तो धागा
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

कारण..

.
.
काही अंतरी उमाळे
काही हुंदके उसासे
अडविले मी श्वासात
थांबलेले कसेनुसे

तुझे रोखुनी पहाणे
गळाले रे अवसान
विरघळूनी सांडले
कसे राहिले ना भान

आता कसं काय करु
अश्रू कसे रे आवरु
बांध फुटला तुटला
कसे स्वत:ला सावरु

काय करु मी बहाणा
चहुबाजूनी मरण
तुझ्या नजरेत प्रश्न
काय देऊ मी कारण

काय झाले काही नाही
डोळ्यामधे काही गेले
अश्रु आसवे नाही रे
डोळा पाणी थोडे आले
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

पायवाट..

.
आसवांना वाट करून दिली..
मनसोक्त म्हटलं वाहून घ्या एकदाचं..!
मग.. डोळ्यांनीच दटावलं त्यांना..
चिडत म्हटलं.. आता हे वाहाणं शेवटचं..!!
तेव्हापासून घाबरलेत..
डोळ्यांत आता त्यांची गर्दी होत नाही..
मात्र अलिकडे वरचेवर सर्दी होत असते..
कशाने?.. काही कळत नाही
नाकातून सूँ..सूँ.. करत
वहात रहातं पाणी.. अविरत
पोल्युशन हो!.. धुळीची अँलर्जी..!
मी बिनधास्त ठोकून देते..
.
पण कळलय कारण खरं..
अश्रूंनी.. त्यांची..
रोजची पायवाट बदललीय..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

शून्य..

.
.
मुखड्यातच ओंकार
पूर्णत्वाचाच आकार
तरीही अपूर्ण..
काहीच बाकी नसलेलं
कुणी हात धरला
तरच अर्थ...
नाहीतर अवघं
अस्तित्वच व्यर्थ..!!
.
तसंच काहीसं
माझंही अस्तित्व..
नादमयी ओंकारलेलं..
परीपूर्ण साकारलेलं..
तरीही..
तुझ्याशिवाय अपूर्ण..
तू हात सोडलास तर..
बाकी शून्य..
फक्त एक शून्य...!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर