Saturday, September 6, 2008

एक आस एकुलती..

तू मनांच्या कप्प्यात
तू स्वप्नांत सत्यात
एक बांधलेली वीण
तुझ्यामाझ्या रे नात्यात

तूच श्वास प्राणवायु
हृदयातले स्पंदन
तूच गंध रे कायेचा
तूच चंदन चंदन

तूच प्रिय प्राणसखा
माझ्या प्रीतीचा उच्चार
तुझे आयुष्यात येणे
माझ्या जीवनाचे सार

एक आस एकुलती
तुझ्या रंगात रंगता
मम आयुष्याची ह्वावी
तुझ्या मिठीत सांगता

Monday, September 1, 2008

माझे जळणे तीळतीळ..

.
माझे जळणे तीळतीळ
जगणे रोजचेच झाले माझे
तू देत रहा चटके खुषाल
सोसणे रोजचेच झाले माझे

मी सुगंधी घेतला वसा
दरवळत राहील आसमंत
आयुष्य सरते रे सरूदे
कसली ना मजला खंत

सरेन मी मरेन मी
राख होऊनी उरेन मी
कणा कणात रक्षेच्या
चैतन्य होऊनी भरेन मी

टेकवशील ना बोट तू
तुझ्या कपाळी मिरवेन मी
विभुती होऊन करेन रक्षण
चटके नियतीचे जिरवेन मी


.
सौ. अनुराधा म्हापणकर

देव आज मूडमधे नाही..

तिन्ही सांजेची वेळ
देवघर दिव्याने उजळवलं..
देवाला हात जोडले..
रोजचच मागणं मागितलं

पण आज कदाचित देव मूड मधेच नसावा..

माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं
म्हटलं असेल काही.. मीही लक्ष नाही दिलं..

काही केल्या माझ्याकडे देव जेव्हा बघेना
मलाही मग तेव्हा अजिबातच राहवेना..
म्हटलं बाबा.. तुझ्या मूडला आज काय बरं झालं..
सांग ना रे.. माझ्याकडून काय चुकीच घडून गेलं
तरी देव गप्पच.. !! घुश्श्यातच बसलेला..
कधीच नव्हता खरतर माझ्यावर असा रुसलेला

आठवत राहिले मग.. नक्की आज काय चूक झाली
की पूर्वीच्या कुठल्या चूकीची देवाला आठवण झाली

नाही म्हणायला चुकले खरी.. आज चिडचिड केली फार
आदळाआपटही केली थोडी.. आज शब्दांनाही होती धार

आजचे मागणे माझे.. म्हणून नामंजूर झाले
आज थोडी जास्तच कारण मगरूर मी झाले

कधीची देवाच्या दारात
ताटकळत उभी मी हात जोडून..
म्हटलं नको आज काही..
पण एकदा माझ्याकडे बघ तरी वळून..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

ठरवलय मी..

ठरवलय मी- आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

डोळ्यातून सांडलेले खारट पाणी..
ती तुझ्या तोंडची कडवट वाणी
सारं पुन्हा पुन्हा आठवत रहायच..

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

प्रेमाची ती साखर पेरणी..
मस्का लावणारी मनधरणी
लाड.. हट्ट सारं पुरवून घ्यायचं

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

चेहर्‍यावर लावेन राग लटका
जीभेवर ठेवेन तिखट चटका
मूक शब्दाने तुला बोलतं करायचं

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

माहितेय मला पुन्हा मी हरणार आहे
तुझं प्रेम मला पांगळं करणार आहे
पांगळं होताना तरीही ताठ उभं राहायचं

ठरवलय मी - आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं
:
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

आता पश्चाताप..

जिंकलो आम्ही दोघे
मुलगा डॉक्टर होऊन आला..
एम.बी.बी.एस. नाही नुसता
एम.एस. सर्जन होऊन आला

बालपणीच रुजवलेली
त्याच्या मनात ही जिद्द
त्याच्या शिक्षणासाठी
आम्ही कष्ट केले बेहद्द

पण हे काय.. विपरित?
म्हणतो -इथे राहाणार नाही
परदेशातून आले बोलावणे
इथे प्रक्टिस करणार नाही

समजावले- किती विनवण्या
हातही जोडून पाहिले
आईबाप असूनही मुलापुढे
लाचार होऊन पाहिले

ईमेल आले काल
आज अपॉन्टमेंटचे पाकीट येईल
व्हिसाही मिळेल आता
आणि एअर टिकीट येईल

चूक त्याची नाही
त्याला आम्हीच घडवले होते
महत्वाकांक्षाना त्याच्या
आम्हीच तर रूंद केले होते

मोठं करताना त्याला
जिद्द-ईर्षेचे पंख लावले होते
लक्षातच आले नाही कधी-
त्याच्यातले "माणूस"पण खुंटले होते

आता पश्चाताप..
ज्याचा काडी मात्र उपयोग नाही
त्याच्यासोबत म्हातारपणीचे दिवस..?
आमच्या पत्रिकेत तो योग नाही..:सौ. अनुराधा म्हापणकर