Wednesday, January 30, 2008

गणितच सारे चुकलेले..

त्या वळणावर त्याची नि माझी
अवचित घडली भेट
माझ्या चेह-यावर रुतलेली
त्याची नजर थेट..

उगाच घुटमळलेली आणि
थबकलेली ही पावले
नको म्हटले तरी का पुन्हा
भुतकाळात मी धावले

ती बोचरी नजर चुकवणारा
चेहरा माझा बावरा
मुलाला कडेवर घेतलेला
सोबत माझा नवरा..

ओळख कशी करून द्यावी
काय सांगू नव-याला..?
मुलाला माझ्या काय शिकवू
मामा की काका म्हणायला..?

वाटले सारे मी विसरलेले
संसारात होते रुळलेले ..
येताच तो सामोरा मात्र
का गणितच सारे चुकलेले..?
.
.
.
कल्पना विलास..
सौ. अनुराधा म्हापणकर
30-01-2008.

Monday, January 21, 2008

आई होण्या आधी ......

आई.....मला तुला काही सांगायचय..
मी सांगितलेलं तुला कळलं की नाही..
ते तुझ्या डोळ्यात वाचायचय
तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून
तुला जीवापाड जपायचय..
तुझ्या कुशीत शिरून स्वत:ला विसरायचय
तुझ्या असंख्य ऋ णांचं ओझं खांद्यावरुन मिरवायचय
आणि ते कधीच फेडता येणार नाही म्हणून स्वत:ला लाजवायचय..
जगातलं सारं सुख तुझ्या पायाशी लोळवायचय
तुला समाधानाने हसताना पुन्हा पुन्हा पाहायचय
तुझ्याच साठी शब्दांना काव्यात बांधायचय
आणि हे काव्यपुष्प तुझ्या चरणी अर्पायचय
देवा आधी तुझ्यापुढे नतमस्तक व्हायचय
तुझ्या मनातल्या स्वप्नांना सप्त रंगात रंगवायचय
तुला खरं नाही वाटणार कदाचित
पण तुझ्यासाठी खूप खूप काही करायचय..

विश्वास ठेव आई..
जरी संसारात पडले आणि पतिप्रेमात गुंतले..
नोकरीत अडकले आणि जगरहाटीत मिसळले..
तरी मी तुझीच तुझ्याच कुशीत अंकुरले..
तुझ्या मायेने लाडावले.. तुझ्या सात्विक आहाराने दृढ झाले
तुझ्या धाकात वाढले ..तुझ्या संस्कारात सुसं स्कृत झाले
तुझ्या पोटी जन्म घेऊन अगदी धन्य धन्य झाले..
.
तू खूप काही दिलस.. तरी आज पुन्हा तुझ्याकडे मागायचय
तू चालवलेलं हे मातृत्वाचं व्रत मलाही आता चालवायचय...
म्हणुनच आई.. आई होण्या आधी तुझ्या आशीर्वादाला वाकायचाय..

.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

चुक तशी माझीच होती..

फूल देताच हातात तू
आई ग .. का टचकन टोचला काटा..?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
टोचून घेण्याची सवय माझी तशी फार जुनीच होती..

स्तुतीसुमने उधळताच तू
बाई ग.. का म्हटलं मी पुरे तेव्हा.. ?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
कौतुकाचे शब्द माझ्यासाठी?.. वेळ तशी पहिलीच होती..

दिलेस हाती हात जेव्हा..
हं!.. का सोडवुन घेतले मी हात माझे..?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
संस्कार बिंबवलेल्या मनाची तशी तयारीच कुठे झाली होती

विचारलेस मला.. लग्न करशील का माझ्याशी..
अरे देवा!.. का थिजले ओठातच शब्द.. ?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
स्वप्नांची पूर्तता होताना शुद्धच माझी हरपली होती...
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

"पती परमेश्वर.. ?"

.
लग्नानंतर नव-याला जेव्हा
नावाने मारली हाक
बाया बापड्यानी सासरच्या
मुरडले तेव्हा नाक

शिकवले काही नाही म्हणे
हिला आईच्या घरी
नवराही बायको अशी
चालवून घेतो बरी..?

माहेरच्या संस्कारांपुढे
पडलं होतं प्रश्न चिन्ह..??
ऐकून ते सारे आरोप
मन झालं होतं सुन्न

काही झालं तरी मला मात्र
अजिबात नव्हते झुकायचे
सखा-प्रियकर झालेल्याला
नवरा नव्हते बनवायचे

एक काकू म्हणाली मला
पती असतो ग परमेश्वर..
एकेरीचा उल्लेख करताना
थोडातरी विचार कर

ठीक म्हटलं.. मान्य काकू..
नवरा माझा देव आहे..
देवाचाही उच्चार पण
एकेरीच ना सदैव आहे..?

तेव्हापासून काकू माझ्याशी
थोडं अंतर ठेवूनच वागत असतात
"श्रीधर"पंताना मात्र "श्री" च म्हणत
काकू म्हणे हल्ली लाजत असतात...
.
.
.
.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

वांझोटी....

मी एक शापित स्त्री..

हो..शापच आहे मला
नियतीने दिलेला..

नशिबानं सारंच अगदी भरभरून मला दिलय..
मात्र मातृत्वाचं दान मला नाकारण्यात आलय..

फुटक्या नशिबाचं माझ्या.. कळलं खरं कारण
जिवंतपणीचं ओढवलं तेव्हा.. माझ्यावरच मरण

लादलं गेलं माझ्यावर .. माझ्या नव-याचं अपुर्णत्व
नियतीनं म्हणुनच मला.. नाकारलं होतं मातृत्व

नव-याला हल्ली माझ्या सहानभूती फार मिळते..
मी मात्र हताश ... एका वांझोटीचं जीणं जगते..

.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, January 12, 2008

चालतच राहा...पण...

मुलगी वर्षाची झाली
माझं बोट सोडून चालू लागली..
एक एक पाऊल टाकू लागली..
म्हटलं बाळे .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल..
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगी सोळा वर्षाची झाली..
हा हा म्हणता वयात आली..
शाळेच बालपण सोडून
कॉलेज कुमारी झाली..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
प्रत्येक नजर पारखून घे..
प्रत्येक स्पर्श चाचपून घे..
.
स्वत:च जपायचं स्वत:च पावित्र्य..
काचेसम जपायचं स्वत:च चारित्र्य..
कारण
अडखळणं धडपडणं
आता मानवणार नाही..
न भरणा-या जखमेचा व्रण
तुला सोसवणार नाही..
.
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
.
.
.
.
मुलगा वर्षाचा झाला
माझं बोट सोडून चालू लागला..
एक एक पाऊल टाकू लागला..
म्हटलं बाळा .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा..
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल
राजा .. थांबू नकोस.. चालतच राहा...
राजा.. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगा सोळा वर्षांचा झाला..
हा हा म्हणता वयात आला..
शाळेतच बालपण सोडलं होतं..
कॉलेज कुमार होताच नव्याने तरुण झाला..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
नजरेत स्वत:च्याच घसरू नकोस ..
स्पर्शाने घृणा पसरू नकोस..
.
प्रत्येकाचं जपशील जर पावित्र्य..
निष्कलंक राहिल तुझंही चारित्र्य..
कारण
अडखळेल.. कोणी पडेल जर तुझ्यामुळे
तुझं तुलाही मग सावरता येणार नाही..
न भरणा-या जखमेचे व्रण देऊ नकोस हं कुणाला
तुझी चूक मग तुलाच सुधरणार नाही..
.
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, January 8, 2008

त्या पाच जणी .. मैत्रिणी..

त्या पाच जणी..
सख्या मैत्रिणी..
कॉलेज कट्ट्यावर त्यांनी..
गायिली होती गाणी...
खळखलून उगाच हसताना
डोळ्यातून येई पाणी...
.
.
कॉलेज संपलं .. संपला तो सहवास..
संसार.. नोकरी.. सुरु झाला नवा प्रवास..

सुन-बायको-आई..रूपं करावी लागतात धारण..
हसण्यासाठी आताशा शोधावं लागतं कारण ..

रोज नवी समस्या हात जोडून असते उभी ..
सोडवताना वापरायची नित्य नवी खुबी..

पाची दिशाना सा-या आता -कुठे ते भेटण..?
अल्लड थिल्लर उनाड आता कुठे ते वागण..?
.
.
तरी दहा वर्षानी तो योग महत्प्रयासाने आला जुलुन..
फोन ईमेल झाले पन्नास- तेंव्हा गेल्या सा-या जमून..

दहा वर्षाचं साचलेलं हसू .. मग उगाच त्या हसल्या..
कॉलेजचे ते उनाड दिवस पुन्हा पोटभर एकदा जगल्या..

चार घटका एकत्र..सा-याचं एक आयुष्य होतं..
पुढच्या काही दिवसांसाठी मिळाल टॉनिक होतं..
.
.
हसता हसताच निरोप घेताना ..गळा त्या भेटल्या ..
पाच वेग़ळी आयुष्य जगायला मग.. वाटेला त्या लागल्या ...!!!
.
.
.
एक मैत्रीण..
मी..त्यांच्यातलीच..
सौ. अनुराधा म्हापणकर.

तू धरशील हात.. म्हणुन

तू धरशील हात
म्हणुन झोकून दिलं बिनबोभाट
तू धरलं नाहीस..
आणि..
पडतानाही सावरलं नाहीस

तू पुसशील डोळे
म्हणुन आवरली नाहीत आसवे..
तू डोळे पुसले नाहीस..
आणि..
ओघळणारे अश्रुही पाहिले नाहीस

तू असशील सोबत
म्हणुन राहीले जगत
तू साथ दिली नाहीस
आणि
मला सोबतही घेतले नाहीस

असाच जन्म गेला वाया
तुझी वाट पहाता पहाता
आणि मग..
जगता जगता एक दिवस संपुन मी गेले..
पण ..
माझे संपणेही गेले व्यर्थ..
माझे 'नसणे'ही तुला कळले नाही...........



:सौ. अनुराधा म्हापणकर

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

ईमेल वर पाठवतो ई-ग्रीटिंग्स
कोणाच्या गाठीभेटी मात्र घेत नाही
ओर्कुटवर पाठवतो कलर स्क्रॅप्स
समोर आलो कधी- तर ओळखतसुद्धा नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

औन लाइन चाटवर आम्ही सदैव हजर
ओह.. क्रॅप.. समोर आलो तर मात्र बोलत नाही
बोलाचीच कढी.. नेट्वर आणि बोलाचाच भात
भेट.. गिफ्ट्स प्रत्यक्षात आम्ही कधीच देतघेत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

पत्रा-बित्राचा जमाना गेला कधीच
पोस्टाला (ऊप्स.. ते काय असतं) आम्ही त्रास देत नाही
फोनवर बोलायला आहे कुणाला वेळ
"न्यू यीअर विश"चा फोनही आम्ही करत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

'थर्टी फर्स्ट'ला मात्र रात्रभर चालते आमची पार्टी
एखादं वर्षही अजिबात चुकवत नाही..
वेळ काढून मुद्दाम एसएमएस करतो ना फॉरवर्ड
सेंड टू औल झटपट.. एकाचे नावही सुटत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..
.
.
.
एकदमच बिझी..
सौ. अनुराधा म्हापणकर

विळखा......

ते वादळ अक्राळ विक्राळ..
समोर उभा ठाकलेला प्रत्यक्ष काळ..
उसळलेला महापुराचा तो भयाण डोह..
आणि त्यात वहाणारे अनेक अचेतन देह..

त्या तांडवातही एक झाड
जमिनीला अगदी घट्ट धरून
त्यालाच विळखा घालून तीही
जीवनाची शेवटची कास पकडून..

घरात दारिद्र्य अठरा विश्व
रोजचं पाहिलं मरण
मनातल्या मनातच कितीदा रचलं
आपणच आपलं सरण..

आज घर पाहिलं वाहताना..
बहुदा आय- बा नि भैणही
दूर दूर पर्यंत आहेच कुठे
वाचवणारी साधी वेलही..

बधीर सा-या संवेदना
मन झाल होतं सुन्न
तरी ही धडपड कशासाठी
तिलाच पडला होता प्रश्न..?

मरणप्रायच होतं जगणं जरी
जगायलाही नव्हते काही कारण
हाताची पकड तरी करून घट्ट..
मरणाचं नाकारलं तिने आमंत्रण..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर