Thursday, June 26, 2008

एबनॉर्मल..??

तू हल्ली नीट बोलत नाहीस..
पूर्वी सारखी खुलत नाहीस..
सांग ना ग.. काय झालं
बघ डोळ्यात पाणी आलं
.
नाही रे कुठे काही..
काहीच तर झालं नाही..

.
हेच तर तुझं बदललेलं रूप
वेडे.. ओळखतो मी तुला खूप
पूर्वीची असतीस तर डोळ्यातून वाहिली असतीस
तुझी व्यथा माझ्या डोळ्यात पाहिली असतीस
पण आता सारं डोळ्यातच लपवून ठेवतेस
का ग जीवाला माझ्या असा घोर लावतेस
.
मीही म्हणू शकते ना रे ... असच काही बाही
आधी मनातलं तुला न सांगताच समजून जाई
सांग.. आताच तुला का मग सारं विचारावसं वाटलं..
माझ्या डोळ्यातलं आभाळ का तुझ्या डोळ्यात नाही दाटलं..?
जाऊदे.. नको आता उत्तर शोधत राहू ..
नसलेल्या प्रश्नांना अडगळीत टाक पाहू..
गप्प आहे आज तर होईन उद्या नॉर्मल..
नाहीतरी आहेच ना मी थोडीशी.. एबनॉर्मल..??
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

विस्कटलेले आयुष्य..

कुठे आयुष्य कसे सरले
की थोडे आणखी उरले..
आयुष्यभर कोणाला पुरले
कशासाठी उगा झुरले..

किती सोसली वेदना
किती कोंडली भावना
किती प्रेम ओसंडून राहिले
किती प्रेम भांडून वाहिले

किती केला तत्वांचा बाजार
किती भावनांचा मांडला व्यापार
कितीदा तत्व 'स्व'त्व विकले
कितीदा नशिबापुढे मी झुकले

किती मांडला संसार सारा
किती सांडला व्यर्थ पसारा
कितीदा सारे सावरून झाले
कितीदा नव्याने आवरून झाले

विस्कटलेले आयुष्य थोडे
त्याचे कोडे सुटेना झाले..
उचकटलेले मळके रंग
कसे बरं मिटेना झाले..
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, June 14, 2008

एक बातमी तीच तीच..

कोणाचे कोसळे छप्पर..
कुठे कोसळली भिंत
पाऊस कोसळतो ऐसा
त्याला नसे रे उसंत

ओल्या आडोश्याला घरटे
त्याला प्लास्टिकची चादर
त्याची फाटलेली लुंगी
तिचा ओला ग पदर

भुईवर तळे, त्यावरी गळे
फाटके डोईवरले छत..
हाय आभाळ फाटले
त्याला वार्‍याची सोबत

देवा आक्रित घडले..
कसे उडाले रे छप्पर
शेजारले हे गटार
तेही येई वर वर

नशिबाने केली दैना
वाहिली झोपडी-घरटे
डोळ्यालाही येई पूर
उघडा संसार झाकते
.
.

एक बातमी तीच तीच
टीव्ही चैनल पुन्हा दळते
मिलन सबवे ला भरले पाणी
आणि ट्रेन उशिराने पळते

सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, June 13, 2008

पावसात भिजत गाणं कसं बरं गुणगुणायचं..?

पाऊस पाहून मोहरायचे दिवस आता गेलेत..
सरी कोसळताना बहरायचे दिवस आता गेलेत..
.
आता .. पाऊस म्हणजे..
वैताग.. दोरीवर न सुकणारे कपडे..
भिंतीवर..छतावर गळके कुरुप पोपडे..

काचा तावदानं बंद.. मारते पाण्याची झड
घरात होते घुसमट.. हवासुद्धा येईना धड

रस्त्यावर चिखल.. साचलेली तुडुंब डबकी..
तुंबलेली गटारं चोहीकडे..कोंदट आणि सडकी..

रस्त्यावरच्या खड्ड्यांचे करुन मस्त बहाणे,
चालताना अंगावर चिखल उडवतात वाहने..

घोंगावणार्‍या माश्या.. डेंग्यू मलेरियावाले डास
डायरिया.. ताप.. आणि नको त्या आजारांचा त्रास

अगदी ब्रान्डेड छत्रीसुद्धा वार्‍यापुढे टिकत नाही..
रेनशीटर घालावं तर आमचं धड पूर्ण झाकत नाही..

ट्रेन लेट.. रूळावर पाणी.. ट्रैफ़िक जाम.. मग लेट मार्क
ओले कपड्यात हुडहुडी.. कप्पाळ कामात दिसणार स्पार्क

अस्सा हा पाउस.. त्याला छान कसं बरं म्हणायचं..?
पावसात भिजत भिजत गाणं-कसं बरं गुणगुणायचं..?

तेवढ्यातच कुठूनशी..
नरिमन पॉइन्टच्या कट्ट्यावर फेसाळती लाट येते
छत्री उलटी पालटी करत त्यात- सर चिंब भिजवते..

नाही नाही म्हणतानाच मनही कसे ओले चिंब ओघळते
"रिमझिम गिरे सावन" म्हणत मग-चक्क मी सुद्धा निथळते


सौ. अनुराधा म्हापणकर.

Thursday, June 12, 2008

लाइफ़ इज ब्युटीफुल

लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे
कारण..
मला तुझी..
तुला माझी..
सोबत.. अष्टौ प्रहर आहे..

कधी व्यक्त..
कधी अव्यक्त..
भावनांचा आवेग
प्रेमाचा फुलला बहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

सुखात हसताना
एकमेकांत रमताना
ओठांवर तुझ्या
माझ्या आनंदाची लहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

अडथळ्यांची शर्यत
दु:खाचे उंच डोंगर
तुझे अश्रु पुसायला
रेशमी माझा पदर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

ऊन.. कधी पाऊस
कधी बोचरी थंडी
तुला लपेटणारी
माझ्या ऊबेची चादर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे..!!
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, June 4, 2008

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.
सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा, परी लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे, हसून खोटे, चाचपले मी किती मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती परी चढवायचे राहून गेले
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
हसून आता, विसरून सारे, वावरते जणू उनाड वारे
हसता हसता भरले डोळे, पापणीतूनी अश्रू वाहून गेले
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.

थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

.

सौ. अनुराधा म्हापणकर