Friday, February 22, 2008

भ्रष्ट...??

लाच ?.. छे हो छे.. अज्जिबात मी घेत नाही..
घेत तर नाहीच नाही आणि देतसुद्धा कध्धी नाही..

आजपर्यंत - खंडोबाची आन
कुणाकड़े काहीच नाही मागितले
म्हणाले बरेच.. तुमचा रेट सांगा
तरी कध्धीच नाही हो सांगितले

मग त्यानीच दिले खुषीने जे
मिठाईचे पुडे फक्त मी स्विकारले
खंडोबाचा प्रसाद तो..
म्हणुन नाही कध्धी हो नाकारले

हं.. पाजली कोणी वाईन शाम्पेन
तेव्हा कंपनी आपली नुसती दिली
आयच्यान सांगतो हो ..
फक्त तीर्थ म्हणुन अगदी थोडीशीच पिली..!

प्रेमाने दिली हो सोन्याची चेन
मन मोडवेना.. म्हणुन ठेवून घेतली
नाय हो नाय..माझ्या नाय
लेकाच्या गळ्यात प्रेमानेच घातली

कुणी दिले हि-याचे घड्याळ
अहो घड्याळ म्हणुन घेउन टाकले
वक्तशीर ना मी हाडाचा
म्हणुन हाताला माझ्या बांधून टाकले

मोबाइल दिला कैमेराचा कुणी
कित्ती नक्को नक्को तेव्हा म्हटलं
पार्टी रागावली म्हणुन घेतला
मला वाईटच की हो खुप वाटलं

भ्रष्ट या जगात सा-या
सत्यवान एकटा मी- तत्वे पाळतो
विकायला काढला हो देश भxxxनी
जीव माझा कसा तीळ तीळ जळतो..

.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

.........किंमत!!

'लव्ह एट फर्स्ट साईट' म्हणतात
ते झालं मला प्रेम..
पलीकडे त्यालाही तसच
वाटलं सेम टू सेम ..

तो तसा धेड़गुज़री
मीही अर्धवट वयातली
मला भासला तो राजकुमार
त्याला मी परी.. स्वप्नातली

कोलेजच्या नावाखाली मग
रोजच लागलो भेटायला
समुद्रासमोरच्या खड़कामागे
प्रेम लागलं फुलायला

आईबाबांच्या बाजूला बसून
चैटिंग केलं ऑनलाइन
वेब-कैम मधूनही भेटलो
देतघेत एकमेकाना लाइन

नशा होती ..कैफ होता
तारुण्याचा मस्त उन्माद होता
जन्म दाते .. नी सा-या जगाशी
पुकारलेला मी वाद होता

आई-बाप हतबल ..मग
विनवण्या झाल्या.. बंधन आले
साम दाम दंड भेद - त्यांचे
सारे उपाय करून झाले

आली ती रात्र तेव्हा
डोक्यावर चढलेली धुंदी होती
गहाण पड़लेली अक्कल माझी
आणि झाडापासून तुटलेली फांदी होती

मिट्ट काळोखात उम्बरा ओलांडताना
माझी पापणीसुद्धा ओली झाली नाही
हं.. मोजतेय त्याचीच किंमत अजून
आयुष्यात सकाळच पुन्हा झाली नाही..!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, February 15, 2008

बाबा.. तुम्हाला श्रद्धांजली...


बाबा.. तुम्ही गेलात...
आणि.. कळून चुकलं..
तुमच्यासाठी दोन शब्द लिहायचीही..
तुम्हाला श्रद्धांजली वाहायचीही..
लायकी नाही आमची..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

खुजे आम्ही.. तुम्ही वट वृक्ष होतात..
आम्ही पारंब्यानाही तुमच्या कधी धरले नाही
उन्मळलात आता - तरी पाळेमुळे रुजलेली खोलवर
स्वत:चे पायही जमिनीवर आम्ही नीटसे रोवले नाही

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

दु:खिताना आनंदवन देणारे तुम्ही..
स्वत:च्या घरातही आम्ही अद्याप आनंद फुलवलेला नाही..
पिडितान्चे पितृत्व खांद्यावर घेणारे तुम्ही..
आणि आमच्याच मातृपित्याला वृद्धाश्रमि धाडणारे आम्ही..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे..

स्वत:च्या अंगी प्रयोग म्हणून
विषाणू घेतलेत महारोगाचे टोचून..
लोभ, कपट, अहंकार, मत्सर.. नामक
किडे कीटक मिरवतो आम्ही शरीरातून..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे

घुडगे टेकून नतमस्तक तुम्हापुढे..
उरले एकच परी मागणे..
आनंदवन अपुल्या घरापुरते तरी
शक्य होऊ दे आम्हा जपणे.........
.
.

:आनंदवनात माझ्या..
:मी..
:सौ. अनुराधा म्हापणकर.