Tuesday, December 23, 2008

शिट्टी.....!

.
धगधगतय.. की..
काहीतरी उकडतंय आत..?
कोंडलेली वाफ.. तप्त ज्वाळा
सोसवेना झाल्या ह्या उष्ण झळा
उकळतंय की शिजतंय रटारट
असह्य होतेय आता ही घुसमट
कसं आणि कुठून बाहेर पडावं
की उठावं आणि फुटून यावं..

"शिट्टी" वाजली..
गैस मालवला..
"कूकर" उतरला..
शांत झालं सारं..!!

धगधगत्या.. वाफाळत्या
तापल्या .. कोंडल्या..
घुसमटत्या मनाची मात्र
अजिबात "शिट्टी" होत नाही..
त्याला काय करावं..?
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

क्षणात.. फक्त अंधार.. !

काहीतरी विपरित घडतय..
जीव वाचवायचा एवढंच कळतय..
सगळीकडे माजलाय गोंधळ
जीवाच्या आकांताने धावपळ
सुसाट एक गोळी तेवढ्यात ...
माझाच वेध घेत येते..
नियती चुकत नाही
माझी हसत भेट घेते..
समोर येतात चेहरे
बायको माझी बाळं
आईवडील म्हातारे
दिसते मग रक्ताची धार
आणि क्षणात.. फक्त अंधार.. !
.
अस्पष्ट शुद्ध येते..
तिथेही धावपळ असते..
तो देवदूत येतो जवळ..
एकवटतो मी सारं बळ..
डॉक्टर मला वाचवा...
प्लीज- प्लीज- मला जगवा..
पण शब्द ओठातच थिजतात
तशातही पापण्या भिजतात..
पण कोणीही थांबत नाहीत
माझ्याकडे बघतही नाहीत..
बिनचेह-याचा एक आवाज येतो
"इथे काही होप्स नाहीत....
लीव्ह धिस केस.. पुढचा बघा.."
.
जड पापणी मिटत असते
उघडू म्हणता उघडत नाही
माझ्या मरणावर रडायलाही
माझ्याकडे वेळ उरत नाही..!!


सौ. अनुराधा म्हापणकर