Thursday, November 29, 2007

उर्मिलेची व्यथा..

कशी सांगू माझ्या मनीची व्यथा
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

भरजरी हे शालू, रेशमी हे शेले
मखमालीची शय्या, अलगद मजला झेले
तरी जरीची टोचे तार, शेल्यात खुपतो काटा
शय्येची मृदू मखमलही बोचू लागली आता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

दागदागिने सोनेरी, रत्नजडीत हे दिव्य
ऐश्वर्याची सावली, प्रासाद उंच हे भव्य
भार दागिन्यांचा मज येई न सोसता..
खुजे वाटते सारे ..महाल होईल रिता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

जरी जानकीच्या भाळी लेखीला वनवास
प्रभू श्रीरामांचा तिला, परी घडेल सहवास
काट्यातुन मग अनवाणीही येईल चालता
थंडी वारे पाऊस सारे येईल मग झेलता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

घोट विषाचा मग मी का प्यावा
माझ्याच नशिबी हा विरह का यावा
चौदा वर्षे -कधी होईल चौदा युगाची सांगता
की सम्पेन मीच आधी वाट पाहता पाहता
बोलते इतकेच-- सोडूनि जाऊ नका नाथा

सती जानकी -श्री रामांची सोबत
प्रभूसेवेचे घेतले तुम्ही व्रत
वचनबद्ध तशी चरणी तुमच्या असे ही पतिव्रता
नाही अडवत..जाऊ सोबत ..आपणही उभयता
बोलते इतकेच- सोडूनि जाऊ नका नाथा

Tuesday, November 27, 2007

शब्द माझे..

शब्द आहे श्वास माझा
शब्द हेच विश्व आहे
शब्दसुसाट वेगान पळणारं
उधळलेलं एक अश्व आहे

शब्द माझा प्राण वायू
हवेतला जणू ओक्सिजन आहे
शब्द हेच एकमेव
जगण्याचे प्रयोजन आहे..

शब्द माझ्या हृदयातील
धड़धड़णारं स्पंदन आहे
हसवणारं कधी पोट धरून
करुण कधी आक्रन्दन आहे

शब्द माझे भावनाना
फुलवणारा गाव आहे
रोजचेच सारे तरी
अव्यक्त असा भाव आहे

शब्द माझे लढवय्ये
वेशीबाहेर त्यांची धाव आहे
गाठले शिखर कधी
कधीतरी बुडालेली नाव आहे

शब्द माझे शिवधनुष्य
मी पेललेला भार आहे
भेद्लेला डोळा कधी तर
तलवारीचा वार आहे

शब्दावाचून जगावा असा
एक क्षणही व्यर्थ आहे
स्वप्नातही शब्द माझ्या
म्हणून झोपेलाही अर्थ आहे

शब्द सुमनांची माझ्याकडे
नित्य भरलेली झोळी आहे
दरवळणारा सुवास त्याचा
न कोमेजणारी पाकळी आहे

शब्दांचा दरवळ माझ्या
लपता आता लपतच नाही
प्रदर्शनी ना मांडला परी
वा-यासवे तो वाहातच राही

शब्दांची माझ्या दौलत..
कमवण्यासारख सुख नाही
उधळले जरी असंख्य तरी
गमावल्याचेही दु:ख नाही

Sunday, November 25, 2007

माझी माणुसकी ......??

सिग्नल पाशी गाडी थांबली..
तोच हात..सरर्कन आला समोर
डोक्या वरून फिरला
आणि विसावला चेह-यासमोर

एक किळस नामक संवेदना
शीर शीरत गेली नसातून
कपाळावर चढली आठी
तिडिक गेली डोक्यातून

कपाळावरची आठी
आणि मनातल्या गाठी
प्रयत्न केले मी फार
दोन्ही दाबून टाकण्यासाठी

तो चेहरा आपल्याच मस्तीत
काही फरक पडला नाही
देखावा रोजचाच
काही आजच घडला नाही

पर्समधे खूपसून हात
येतील त्या आकाराची चिल्लर
जवळ जवळ भिरकावालीच मी
त्या सामो-या हातावर

गाड्यांच्या गर्दीत
तो चेहरा दिसेनासा झाला..
दिसेनासा झाला तसा
माझ्यातला माणूस जागा झाला

घडलेले सारे आठवले की
मी माझ्याच नजरेत घसरते
किती ठरवल तरी हे असच होत
मी माणुसकीच विसरते


म्हणजे माणुसकी सुद्धा मी
माझ्या सोयीनेच दाखवते
तो तृतीय पंथी येतो जेंव्हा जेंव्हा सामोरा
.
.
तेंव्हा तेंव्हा मी अशीच ..
एक क्षुद्र सामान्यांचं जीण जगते..
तेंव्हा तेंव्हा मी अशीच ..
एक क्षुद्र सामान्यांचं जीण जगते..

Saturday, November 24, 2007

फुगा घ्या.. फुगा ..

उठता बसता दिला नाही मार..
तरी करत नाही लाड फार..

करतात मुलं जेंव्हा हट्ट
मन करते हट्टाने घट्ट ..

तरी अधून मधून
आणते त्याना फिरवून

कधी बागेत.. तर कधी पिक्चर
एस्सेलवर्ल्ड कधी आइसक्रीम पार्लर

असेच एकदा संध्या काळी
फिरून आलो घरा खाली..

होटेलातून जेवून आले होतो तृप्त
पाहिला होता मग सिनेमाही मस्त

गेटवर पाहिल्यावर फुगेवाली
लेकाचा जीव पुन्हा वर खाली..

द्यावी सणसणीत असा आला राग
आवरत म्हटलं हळूच-अरे नीट वाग

दिवसभराची चैन पडली होती अपुरी
दोन रुपयांच्या फुग्याची पकडायची होती दोरी

क्षणभर केला विचार- थोडा सारासार
सारे घेतले फुगे .. मुलाना केले पसार

कारण
तिच्या डोळ्यात दिसली तिच्या मुलांची भूक
ओठ मात्र हलत नव्हते..शब्द होते मूक..

फुगे देताना मात्र ओठ झाले थोडे विलग ..
डोळ्यात आला दाटून आशेचा एक ढग..

आज तीही आमच्यासारखी जीवाची चैन करणार होती
खूप दिवसानी पिल्लाना पोटभर जेऊ घालणार होती

Monday, November 19, 2007

तू असा जवळी रहा..

माझी प्रत्येक हाकेला
मला तुझी साद हवी..
माझ्या प्रत्येक स्मृतीत
मला तुझी आठवण हवी..
माझ्या प्रत्येक हासण्याला
तुझ्या गालांची खळी हवी..

माझ्या प्रत्येक चित्रात
मला तुझे रंग हवे
माझ्या प्रत्येक गाण्याला
मला तुझे सूर हवे
माझ्या प्रत्येक ठोक्याला
तुझ्या ह्रुदयाचे स्पंदन हवे..

माझ्या प्रत्येक श्वासाला
मला तुझा गंध हवा
माझ्या प्रत्येक स्पर्शाला
मला तुझा स्पर्श हवा
माझ्या प्रत्येक ऐकण्याला
मला तुझा शब्द हवा..

माझ्या प्रत्येक शब्दाला
मला तुझं ऐकण हवं
माझ्या प्रत्येक नजरेला
मला तुझं दिसण हवं

अगदी.. थोडक्यात सांगू..
प्रत्येक प्रत्येक क्षणाला
तुझं सोबत असण हवं..!
तुझं सोबत असण हवं..!

Sunday, November 18, 2007

डायरी..

आड़ रात्रीला दचकून उठवते ..
राहिलेली झोप मग उड़वते..
अशी माझी डायरी..

माझ्या डायरीला
पाने तीनशे पासष्टच..
पण फाटलेली..

फाटलेली कसली..
मीच फाड़लेली...
नको ते आठव म्हणुन..
पण आठवली की
झोप उड़वतेच हमखास..

आणि मग..
मी बसते चाचपत..
ती फाटलेली पाने..
आणि तो गेला
भूतकाळ... !!

स्मशान मी..

स्मशान.. मी..

इथेच संपला अनेकांचा इहलोकीचा प्रवास..
इथेच घेतला कित्येक शरिरानी शेवटला श्वास..

स्मशान शांतता इथे..जळणारी इथे अचेतन शवे..
आणि सभोवताली अचेतन भावनांचे.. माणसांचे थवे..

अग्नी देइपर्यंत पाझरणारे डोळे ..भिजणारे रुमाल..
नक्राश्रु गाळणारे लोक इथे.. आणि भिजणारे गाल..

चिता भड़कताच मात्र प्रत्येकालाच पळण्याची घाई..
आधाराचा हात जो तो हलकेच काढून घेई..

अग्नी देणा-याला सोबत म्हणुन कुणीच उरत नसतं..
आपलं आपल्यालाच सावरायचय..त्याला कळून चुकतं..

माझ्याही भिंतीनी कधी केलं होतं इथे रुदन..
जळणा-या शवाला पाहून केलं होतं आक्रंदन..

इथे येणा-या शवावर ढाळीले होते अश्रु..
यात्रेवर निघताना मी दिला निरोप साश्रु..

आता मीही निर्जीव.. कोरडा.. अलिकडे संवेदानाच मेल्यात..
इथेच समोरच्या चितेवर मी स्वत:च त्या जाळल्यात..

वाटतं ..
बरं झालं मेलेल्याच्याही मरुन जातात सा-या संवेदना ..
नाहीतर..
आपल्याच अंत:यात्रेत भोगल्या असत्या मरणप्राय यातना

Friday, November 16, 2007

आभाळ फाटून जावं.. !!

उगाच असं आज का वाटे
की तुझ्यासाठी लिहावं
कागदाच्या कायेकर या
शब्दानी तुझ्यासाठी उमटावं..

आज असं काय झाले
मनास वाटे बरसावं
बरसलेल्या 'त्या' क्षणाना
आठवत आठवत तरसावं..

श्रावणातल्या 'त्या' सरीनी
एकटं कधीच नसावं
उन पावसाच्या झिम्म खेळात
मन चिंब चिंब भिजावं ..

ती एकच सर अपुरी
मन अधिकच व्याकुळ व्हावं
घे मिठीत राजा पुन्हा एकदा
आभाळ फाटून जावं.. !!

Tuesday, November 6, 2007

ओर्कुटिंग.. ओर्कुटिंग ..

दिवाळीचे दिवस.. थोडा फराळ बनवीन म्हणते..
लाडू बेसनचे गोल गोल.. चकली तळीन म्हणते..

म्हणत म्हणत मनात मी ऑरकुट लोग़ इन करते..
स्क्रैप वाचून बंद करायचं मनोमन अगदी ठरवते ..

चार रिप्लाय देऊन मी कम्युनीटीवर डोकावाते ..
'मराठी कविता' दिसताच मात्र नजर माझी सोकावते..

नवी कविता.. नवे विषय .. नजर भिरभिर फिरते..
वेळ सरकते पुढे पुढे .. पुन्हा भान माझे हरपते ..

इतकं करूनही भागत नाही.. मग मलाही कविता स्फुरते ..
मराठी टाइपिंग करता करता.. कविता जूनी होउनी मळते ..

चकली चिवडा ..कसलं काय.. सारं मनातच राहून जाते..
ह्या भानगडीत मी रोजचं जेवण..अरे देवा..तेही शिजवले नसते..!!

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

मराठी कविता

(ऑरकुटच्या 'मराठी कविता' या कम्युनिटी साठी .. )

वसंतातही तेव्हा बहर नव्हता..
आता शिशिरातही फुटते पालवी..

नवा धुमारा.. नवा शब्द..
नवी भावना .. ओळ नवी..

नवी कल्पना.. नवा विषय..
गाढ प्रतिभेसही जाग यावी..

शब्दांचे श्वास जमवून सारे..
कविता पुन्हा नव्याने जगावी

'मराठी कविते'च्या प्रांगणात या
असे कितीक जन्मले नव कवी..

कोण म्हणतो .. मराठीला नसे वाली?
क्षणाक्षणाला इथे जन्मते.. नित्य नवी ओवी..

मायबोलीचे अपुल्या..आम्हीच तटरक्षक..
असंख्य तिच्या ऋणांची.. इथेच फेड व्हावी...

सौ अनुराधा सचिन म्हापणकर

सॉरी.. राजा..

सॉरी राजा.. माफ़ कर - मी आजही पुन्हा चुकले..
कळले तेव्हा मला जेव्हा - भांडून मी थकले..

रुसू नको रे माझ्यावर.. मी आजही पुन्हा हरले..
घे कवेत विसरुन सारे.. बघ डोळे माझे भरले..

वाटत असेल तुला मी सारखी सारखी का चुकते..
चूका करून..पुन्हा वर कचा कचा का भांडते...

ऐक आता गुपित माझे .. मी आज तुला सांगते..
प्रेमाला लागू नये दृष्ट.. म्हणुन मी पुन्हा पुन्हा भांडते..

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

चर्चगेट - विरार लोकल..

लोकलच्या गर्दीत एकदा माझा हातच हरवला..
खूप शोधला तेव्हा लांब कुठे - पुसटसा दिसला..

वरच्या कडीला दोन हातांबरोबर लोंबकळत होता..
नखांना त्याच्या काल मी लावलेल्या पेंट्चा कलर होता..

पण हाय रे देवा..! तो माझा हातच नव्हता ...
हलवून खूप पाहिला, तरी हलतच नव्हता..

उतरायची वेळ झाली तरी हात काही मिळेना..
कुठे शोधू ..कशी शोधू.. काही काही कळेना..

शेजारणीला म्हटलं - हात माझा शोधून दे..
ती म्हणे वैतागून - माझा पाय तरी मिळू दे..

तिची बिचारीचीच मला कीव आली ..
म्हटलं .. काय ही परिस्थिती झाली..

हाताशिवाय मी उतरेन तरी खाली..
पायाशिवाय तर ही अगदी अपंगच झाली ..

तेवढ्यात पायावर पडला पाय.. मी म्हटलं  ..
बघ बाई.. तुझाच की काय..?

ती म्हणाली .. खूप जोरात का पडला?
मी म्हटलं  - हो..! ती म्हणे- सापडला.. सापडला..

मीही मग अगदी हट्टालाच पेटले ..
सारं बळ एकवटून मग जोरातच हलले..

ती कळवळली - म्हणाली - हाताचं कोपर लागतंय..
हसतच मग म्हटलं मी- माझ्याच हाताचं वाटतंय..

तीही हसली गालात.. स्टेशनही आलं तेवढ्यात..
आणि हातापायासकट आम्ही दोघीही राहिलो आत.. !!

-अनुराधा म्हापणकर
- लोकलपीडित