Saturday, March 28, 2009

वायरस

काल गुढीपाडवा..
त्या निमित्ताने कालच सिस्टीमवर हात मारला होता
अपडेटेड एन्टी वायरससुद्धा सिस्टीममधे पेरला होता

नको त्या जुन्या फ़ाइल्स डिलीट करून टाकल्या
काही नव्या उघडलेल्या छान एडीट करून ठेवल्या

म्हटलं आता थोडे दिवसतरी
पीसी दणक्यात चालेल..

आज पीसी ऒन केला…
छे..!

आज हवेतच कंटाळ्याचा वायरस आहे
सगळ्ळ कस्सं नको इतकं सिरीयस आहे

ओह..!
काल फुटलेल्या कोवळ्या पालवीच्या
फाइल्स सुद्दा उडल्यात
’उत्साह’ एन्टी वायरसच्या सा-या
सिक्युरीटीज त्याने तोडल्यात

शी…!!!!
आज सिस्टीम पुन्हा मरत मरत चालतंय..!


:सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, March 24, 2009

नवरा - बायको

.
लग्न होतं तेव्हा
तो असतो नवरा
ती असते नवरी

पावलावर पाऊल
चालतात सप्तपदी
हाती हात धरून
चढतात विवाहवेदी

स्वागत समारंभ
बुके बुफे थाटमाट
पाठवणीचे हुंदके
उंब-यावरचे माप

ज्या क्षणी नवरी
ओलांडून माप येते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते

कारण
त्याची नवरेशाही मग
आयुष्यभर पुरते
नवरीची नवलाई मात्र
विवाहवेदीवरच सरते

लग्नातल्या ’नव-या’चा रुबाब
संसारातही टिकून राहतो
लग्नातल्या ’नवरी’चा आब
संसारातच पिकून जातो

’नव-या’ची घोडदौड सुरू
’नवरी’चे रास्ता रोको होते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते


:सौ. अनुराधा म्हापणकर

.
समस्त "बायको" वर्गाकडून एक घोषणा पत्रक :

ही कविता वाचून जे नवरे उत्तर देणार नाहीत
त्यांना ह्यातील मते पटली असे समजण्यात येईल

ही कविता वाचून नुसतेच "नो कमेन्ट्स" म्हणतील
त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे असे मानण्यात येईल

ही कविता वाचून जे वादाला उभे रहातील..!
अर्थात .. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो नाही का ? ह्यांच्या नवरेशाहीलाही असेल..!!

(आता सारे नवरे ग्रीन कॆटेगरीतले असतील नाही..??)

Saturday, March 14, 2009

पुन्हा सांजवेळी..

पुन्हा सांजवेळी
क्षितिजी सूर्य मावळत होता
आपले तेजबाहू
दशदिशांतून कवळत होता

रुंजी घालत सभोवती
त्या तेजोवलया विनविते
ये काकुळतीला ती धरती
पुन्हा पुन्हा ती मनविते

ही कातरवेळ,
जीवा लागे हूरहूर
दाटते दाहिदिशा
एक काहूर काहूर

आज अवसेची रात
चांदण्यांची साथ नाही
तुझ्यासवे साजरी
अशी एक रात नाही

बाहुपाशातून का रे
झाले अशी मी दूर
पाखरांचेही लोपले रे
ते गोड गोड सूर

झाडांपानांतून इशारे
मेघांनी अडवेन मी वाट
बघ धरला हात तुझा
सागराची होऊन मी लाट
पाहून धरेचा तो आवेश
निमिष एक सूर्यही गडबडला..
काय करावे बरे आता
आपल्या मनाशीच बडबडला
नको नको ग अडवू वाट
नको मोडूस माझी वहिवाट
निज तूही रात प्रहर
हा आलोच मी, होताच पहाट

तिमिराला भितो मी
वाढला तो -जातो मी
समुद्रस्नान घेतो मी
भल्या पहाटे येतो मी

आज नाही चांदणी
पहा सोबत माझी संधीप्रभा
नसेन जरी समीप तुझ्या
असेल परी माझी आभा
जाताजाता अलगद त्याने
सहस्त्रबाहुंनी तिज कवटाळले
आसवांचे थेंब दोन
अथांग सागरी त्या ढाळले

नित्यप्रमाणे भुलली ती
तेजात अशी झुलली ती
मिठीत विसरे देहभान
सांजवेळी अशी खुलली ती

क्षणात होई तो दिसेनासा
पाण्यात असा विरघळला
रक्तिमा तिच्या गालावरला
क्षितिजरेघेवर ओघळला

सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, March 7, 2009

क्रिटीकल

ती ही क्रिटीकल
आणि मीही..!

एकच गंभीर आजार
दोघींनाही..!

पण..
मला माहितेय..
मी सर्वाइव्ह होणार..
तिचं मात्र माहीत नाही..

कारण
न परवडणारा
खर्चिक आजार आहे हा

मी विकत घेईन डॉक्टर
आणि प्रत्येक मेडिकल एड

ती मात्र.. कदाचित
एकेका श्वासासाठी
देवाला आळवत राहिल

तिचा आजार महाग
आणि तिचा जीव स्वस्त आहे
माझं मरण मात्र
तिच्या वाटेवर व्यस्त आहे


:सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, March 6, 2009

इंद्रधनुष्य

ती रुबाबदार कमान
आभाळात डौलाने झुकली
सप्त-रंग होते त्यात
पण प्रत्येक रंग
एकमेकांत मिसळलेला
एकही रंग दुसर्‍यापासून
वेगळा करणं अशक्य
तरी प्रत्येक रंगाने
टिकवून ठेवलं होतं
स्वत:चं वेगळं अस्तित्व
त्या इंद्रधनुकडे
अनिमिष डोळ्यांनी
किती वेळ पहात राहिले
कुठेतरी वाटत राहिलं मग-
.
माझ्या माणसांत विरघळताना
मीही हवी होती का जपायला
माझीही वेगळी ओळख..?


: सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, March 5, 2009

ऑनलाइन आहेस?

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हां चाळा होता
ह्या प्रश्नाचं उत्तर
येणार
नाही तरीही
स्क्रैपची
दखल कोणी
घेणार
नाही तरीही
लिहायचं अन् पुसायचं, ऑरकुटचा तो फळा होता

ऑनलाइन आहेस?.... प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
दिसायची होमपेजवर
पुन्हा पुन्हा ती नावे
उत्तर द्यायची पद्धत
नसावी त्यांच्या गावे
माझ्या उत्कंठेचा तरी स्टँमिनाच निराळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
माझ्याही फळ्यावर काही
अनुत्तरीत प्रश्न थकले
कितीदा तरी स्वहस्तेच
पुसून ते मी टाकले
दोष देण्याचा अधिकार म्हणून मला विरळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
अंगवळणी पडली रीत
हे जगच आहे व्हर्च्युअल
बोलाचीच नाती सारी
काहीच नसते एक्च्युअल
साक्षात्कार माझा मला झाला किती वेळा होता

तरी.. ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता


: सौ. अनुराधा म्हापणकर