Thursday, May 21, 2009

सुखाचा संसार

.
तो म्हणाला,
आकाशातून तो चंद्र आणतो उचलून
ती म्हणाली, वाट अडवून
नको, चंद्राला हेवा वाटेल मला पाहून

तो म्हणाला
ओंजळीत घेतो चांदणं, तुझ्यावर उधळतो
ती लाजली, म्हणाली इश्श्य..
नजरेच्या चांदण्यानेच जीव मखमाली होतो

तो म्हणाला
तुझ्यासाठी बांधेन संगमरवरी ताज महाल
ती म्हणाली, लटक्या रागात,
दहा बाय दहाची खोली झाडताना होतात हाल

तो म्हणाला
तुझ्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालू का
ती हसली, ओठांच्या पाकळ्यात
कशाला? उगाच फुलांना वाटेवर सांडू नका

जगावेगळं काही तिच्यासाठी
करण्यासाठी तो धडपडत राहिला
ती अडवत राहिली.. नेहमी
आणि संसार सुखाने भरुन वाहिला


:सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, May 15, 2009

तुझंही तस्संच

खूप गम्मत वाटते मला
क्षितिजावर टेकलेला सूर्य पहाताना
त्याच्या डोळ्यात थेट डोळे रोखताना

एरव्ही काय बिशाद
नजर उचलून पहायचीही
त्या तेजात नजर मिसळायचीही

पण धरेला स्पर्शताच कसा थंडावतो ना!

तुझंही तस्संच.. त्याच्या सारखं!
एरव्ही झंझावात तू..! पण..
माझ्या परिघात आलास की कसा..
मंद झुळूक होऊन वाहतोस ना..!

Friday, May 1, 2009

अशी भेट झाली..

.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..
मृगाची सर जणु ती
धरिणी चिंब न्हाली

तो स्पर्श ओळखीचा
ती नजर रोखलेली
खट्याळ त्या नजरेने
पापणी झुकून गेली....
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..

तो शब्द रोजचाच
स्तुति सुमने फुललेली
उधळताच आज का "ती"
पुन्हा मोहरून गेली
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..

आभाळीची सांजछटा
रंगून यावी गाली
लाजरी ती अबोली
आज मूक पुन्हा झाली....
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर