Wednesday, April 30, 2008

फुले पाने चंद्र चांदण्या...

फुले पाने चंद्र चांदण्या
समुद्र नद्या झरे वारे..
माझ्या कवितेच्या विश्वात
एकदा तरी डोकवून जा रे..!

माझ्या शब्दांशी का बरं
जुळत नाही तुमची सोयरीक
का कधी त्यांच्याकडूनच
घडली आहे अक्षम्य आगळीक

तुम्हाला सोबतीला घेऊन
कविता सर्वांच्या कशा खास
तुमच्या विना माझे शब्द
कसे निरस.. आणि भकास

तुमची वाट पाहून मग मी
माणसा माणसांतच कविता पहाते
जीवन सारच सारे जमवून
कवितेतून माझ्या वहाते

तरीही
आजही माझी कविता बिच्चारी
तुमची वाट पहात आहे
कधीतरी तुम्ही येणार..
वेड्या आशेवर रहात आहे


सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 29, 2008

डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..

वर्षं संपलं .. तशी डायरीही संपली..
थर्टी फ़र्स्ट नाइट ला हलकेच तिला मिटली..

अशा कित्येक डायर्‍या.. आणि कित्येक वर्षं सरली..
त्या सरल्या फाटक्या पानांवर सरसर नजर फिरली..

मी तर कदाचित आत्म चरित्रच लिहिले होते..
नेहमी एकाच चष्म्यातून जगाकडे पाहिले होते..

आजवर मी कध्धी कध्धीच चुकले नव्हते..
माझ्या तत्वांना कध्धीच मी विकले नव्हते..

सार्‍यांनीच माझ्यावर केलेला अन्याय होता..
मी मात्र प्रत्येक वेळेस केला तो न्याय होता..

यश मिळाले जे त्यावर माझा अधिकार होता..
अपयश जे वाट्याला आले तो दैवाचा वार होता..

खूप दु:ख केवळ माझ्याच पदरात आले
सुख फारच थोडे हुलकावणी देऊन गेले..

कष्ट.. संघर्ष करून मी जरा कुठे स्थिरावले..
जगायला तेव्हा कुठे मी थोडी थोडी सरावले..

अस्सा गेला एकेक दिवस- महिने..वर्षं सरून गेली..
डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..


:सौ. अनुराधा म्हापणकर.

Monday, April 28, 2008

पुन्हा डायरी..

डायरी लिहिली .. माझी मीच वाचली..
नको ती आठवण.. पुन्हा डोळ्यात साचली..

नको ते मला अस तीचं रोज रोज दिसणं
भुतकाळाच ते माझ्या वर्तमानात असणं

सारखं सारख दिसून.. ते मला असं खिजवणं
भरत आलेल्या जखमेला तिचं रोज ते खाजवणं

फाडून टाकलं मग एकेक पान टरा टरा..
केराच्या टोपलीत फेकून दिलं भरा भरा..

आता नाही ना पुन्हा मला ती त्रास देणार..?
आजच्या क्षणाना.. सरलेल्या क्षणांचा भास देणार?

पण मनातले आठव.. त्याला कसे बरं पुसावे..
डोळे केलेत ना बंद.. तरी स्पष्ट सारे का दिसावे..

डायरी फाडली खरं मी
पण मनातली पाने काही फाटत नाहीत..
दिवस.. वारच काय.. वेळ सुद्धा आठवतेय..
मनातली ही डायरी, मिटू म्हटलं तरी मिटत नाही..

:सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, April 26, 2008

कविता मला स्फुरलीच नाही

.
कुठलीही संवेदना का
माझ्यापाशी उरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

शब्द होते साचलेले
पण काव्यपंक्ती मुरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

आतुर माझी लेखणी फार
शाई त्यातुनी परी झरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

मनास उधाण जणु आलेले
पोकळी त्याची परी भरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
.
.
मूक शब्दांचे ते वाहत जाणे
काठावर बसोनी मी पाहते
दुखरी एक वेदना मनाची
अव्यक्तच बापडी राहते..

ठसठसते ती जखम बिचारी
खपली त्यावरी धरलीच नाही
खरच..!!.. कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, April 16, 2008

आई आहेस तू.. पण...

आई आहेस तू..
पण किती ग ओळखतेस.. कुशीतून निपजलेल्या मुलाला
नऊ महिने पोटात वाढवलसं त्या आपल्या बाळाला
तो.. त्याचा स्वभाव.. त्याच्या मूड.. त्याची आवड निवड..
वेळेवर न मिळालेल्या नाश्त्यासाठी त्याने केलेली ओरड
त्याच्या बर्‍या वाईट सवयी.. त्याची गादी त्याची उशी..
तव्यावरची गरम पोळी.. त्याच्या विटमिनची गोळी
दिवसभर नुसती राब राब राबतेस..
शब्द त्याचा पडू नये म्हणून हवेतच झेलतेस..
.
.
पण काय ग..
घरातून बाहेर पडल्यावर... तो काय काय करतो..
कुठे कुठे जातो आणि कोणा कोणाला भेटतो..
लोकलच्या दाराला म्हणे हल्ली तो लटकतो..
लेडिज डब्याकडे पहात एक शिट्टी सुद्धा वाजवतो..
कॉलेजात गेल्यावर लेक्चर सारी बंक करतो..
बाहेरच्या पानवाल्याकडे झुरके म्हणे ओढतो..
एम एम एस आणि सिडीज ची अदला बदल करतो..
रोज नव्या "आयटम" ला घेऊन जुहु बीच फिरतो..
.
.
घरी येतो सातच्या आत.. तू मागे पुढे करतेस..
कित्ती दमला बाळ माझा.. म्हणून घाम सुद्धा पुसतेस..
साजूक तुपातल्या शिर्‍याची बशी समोर धरतेस..
काय करू रे जेवण? म्हणून पुन्हा पुन्हा विचारतेस
.
.
कधी विचार ना ग अधून मधून...काय शिकवलं रे आज कॉलेजमधे...
आठवतंय... न चुकता विचारायचीस तू.. जेव्हा जायचा तो शाळेमधे..!!
.
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 15, 2008

ओंजळीतलं आयुष्य..?

एका ओंजळीत आयुष्य घेऊन जगते मी
आणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा
तसं आयुष्यही निसटून जातं क्षणा क्षणाने
किती काही करायचं राहिलय..
आणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..
कसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..
किती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..
कमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला
रात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला

ओंजळ कित्ती घट्ट केली
मी मूठही वळून पाहिली
कित्येक दिवसरात्रींची
मग धार होऊन वाहिली

येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय
ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय

किती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..
असूदेत कितीही.. तमा कशाला..
आता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, April 11, 2008

पिंजर्‍याची मला सवय झाली..

.
.
एक मोकळा श्वास घ्यावा
तर कितिक बंधने भोवताली
का आता मलाच माझ्या
पिंजर्‍याची सवय झाली....

जरा कुठे तोडू म्हटलं तर
पायातली बेडी तुटत नाही
हं.. पैजण म्हणतात खरं तिला
पण पाऊल जड.. उचलत नाही..

खिडकी बाहेर डोकावून कधी
मंद झुळुक घेते अंगावर
कधी झेलते तुषार थेंबांचे
निस्तेज फिक्या गालावर..

ते करतानाही मनावर माझ्या
मोरपीस आता फिरते कुठे
मरून गेलेल्या संवेदनाना
हौस मौज तरी उरते कुठे....?

सवयीनेच सारे लादले आहे
दोष कोणाचाच मी मानत नाही
की निरिच्छ मनालाही काही असेल हवं
जे माझं मीच जाणत नाही..??
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, April 9, 2008

नवरी..

भरला चुडा.. हातात
हिरवा कंच काचेचा
रंगलेला नक्षीदार
हात माझा मेंदीचा

पिवळे रेशमी वधुवस्त्र
पिवळे तेज हळदीचे
पैजण छुनछुन पायी
जोडवे नाजुक चांदीचे

मुंडावळ्या मोगरीच्या
गजरा कुंद सायलीचा
हाती अधीर पुष्पहार
गुलाबी टपोर्‍या कळीचा

आंतरपाटाचे वस्त्र मधे
पलिकडे विश्व खुणावणारे
नजरेत ओसंडतो विश्वास
दोन डोळे ते बोलावणारे

पडे अक्षतांचा पाऊस
"शुभ मंगल सावधान"..
भरली लग्न घटिका
विसरले देह भान

आंतरपाट दूर होतो
वरमाला मी घालते
हाती हात देऊनी
नव-वधु मी लाजते

हाती हळकुंड, ती सप्तपदी
मंगळसुत्राचा पहिला स्पर्श
झेलते मी नजरेनीच ते
अवखळ तुझे नेत्र-कटाक्ष

नव्या कोर्‍या शालूचा
कसा नवा कोरा वास
पेटवलेल्या होमाचा
आगळा वेगळा सुवास

आज एक नवा जन्म..
नवा अध्याय.. नवे जीवन..
सौभाग्याचे दान लाभले
सुखाने उमलूदे सहजीवन
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 8, 2008

एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा..

एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा
रोजच्यापेक्षा वेगळे एक जीवन कधी जगून पहा

स्वत:च्या प्रेमात तर नेहमीच असता..
एकदा दुसर्‍यावरही प्रेम करून पहा
स्वत:च्या भावनेला कुरवाळने रोजचे
दुसर्‍याच्या मनीचेही कधी जाणून पहा

स्वत:च्या मर्जीला सारखेच केलेत खरे
दुसर्‍याची मर्जीही कधी राखून पहा
दु:खभार स्वत:चे नित्य मिरवता खांद्यावर
पर दु:खाचीही झोळीही कधी उचलून पहा

स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादलेत सगळ्यांवर
दुसर्‍याच्या अपेक्षानाही कधी पूर्ण करून पहा
भांडत वाद घातलात तत्वासाठी स्वत:च्या
दुसर्‍याच्या तत्वाचीही कधी कदर करून पहा
.
.
त्या दिवसाच्या संध्याकाळी खरंच खूप बरे वाटेल
सारी नाती... सार्‍यांचे प्रेम अचानक सारे खरे वाटेल

आजवर पुकारलेले सारे वाद उगाच केलेले बंड वाटेल
आजवर जपलेली सारी तत्वं अचानक एक थोतांड वाटेल

न सांगताच सार्‍या अपेक्षांना पूर्णत्व आलेलं असेल
न वाटताच तुमचं सारं दु:ख हलकं झालेलं भासेल

आयुष्यातला हा एकच दिवस.. खूप काही देऊन जाईल
जाताना कदाचित बरेचसे.. भ्रमाचे भोपळे फोडून जाईल
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, April 7, 2008

एकदाचं अगदी रितं रितं ह्यायचय..

.
मलाही सारं काही बोलून टाकायचंय
मनाचे बंध सोडून
एकदाचं अगदी रितं रितं ह्यायचय..

माझ्यापाशी येऊन
तूही होतोस ना पूर्ण रिकामा..
उद्या पुन्हा भरण्यासाठी
रिता करतोस ना तुझा अंतरात्मा..

तसंच कधी तरी मलाही होऊदे ना मोकळं
सांगू दे ना मलाही अगदी सगळं सगळं..

एकदाच फक्त करते रे
मनाचा गाभारा रिता
ऐकशील का रे सारं
तू काही न बोलता..?

माझ्या भावना वेड्या.. तुझ्यापर्यंत पोचतील न पोचतील..
माझे शब्द हळवे सारे.. तुला कळतील न कळतील..
तरीही एकदा मला बोलू दे..
आयुष्यभरासाठी पुढच्या..
आयुष्यभराचं साचलेलं..
एकदाच फक्त वाहू दे..

.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, April 5, 2008

माझंच काही चुकतंय का..

वेड्यासारखी हल्ली कुठेही मी कविता करत असते
मुलं खेळण्यात रमावी तशी शब्दांशी खेळत बसते

किचनमधे तडतडून जेव्हा डाळीला देते फोडणी
आह..! कशी उस्फूर्त! शब्दांची जुळून येते मांडणी

मंडईत.. मैफ़िलीत.. गर्दीतही मी गुंग स्वत:त
गर्दीचे शब्द माझ्या मनापर्यंत कुठे पोचतात

आसपासच्या सार्‍यांनीच वेड्यात मला काढलंय
म्हणे हीचं खूळ आजकाल जास्तच जरा वाढलंय

कोणी मेल्यावरसुद्धा हल्ली काव्य हीला स्फूरतं
कविता करुन का कधी पोट कोणाचं भरतं ..?

माझंच काही चुकतंय का.. कधी कधी मला वाटतं
तरी पुन्हा पुन्हा मन माझं शब्दातच गुंतून राहतं..

माझ्या शब्दांची महती सांगायला शब्द मला स्फूरत नाही
खरं सांगायचं तर बोलायला शब्दच माझ्याकडे उरत नाही

कसे समजावू- चार दिवस कदाचित ऑक्सिजनशिवायही राहीन
पण कवितेला सोडुन माझ्या - एका निष्प्राण देहाला मी वाहीन

जाऊदे- माहितेय मला-
कविता करणार्‍याला व्यवहारी जगात किमंत उरत नाही
तुम्ही कितीही म्हणा हो.. "वा वा.. अप्रतिम.."
कारण रसिकहो.. नुसतं म्हणायला खरच पैसे पडत नाही
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, April 4, 2008

रूप-गर्विता

ती :
मी कुरुप आहे रे वेड्या
माझ्या मधाळ आवाजावर जाऊ नको
माझे शब्द करतात घायाळ पण
त्यात रुपाला माझ्या पाहू नको

ऐकायला वाटते छान खरंय
श्रवणीय आहे मी थोडी
पाहशील मला प्रत्यक्षात
तेव्हा सरून जाईल ही गोडी

सामोरा येशील कधी काळी
शोधशील एखादी पळवाट
म्हणशील हाय का पडली
हिची नि माझी इ-गाठ
.
.
तो :
वेडी आहेस ग खूप
भोळी भाबडी.. निरागस
तुझं रुप पाहिलं ग शब्दात
तेच आहे फार लोभस

तू कशी काळी की सावळी
की नाकी डोळा विरुप
माझ्यासाठी तू रूप गर्विता
सौंदर्याचे मूर्त रुप

रुप रंग गौण मला
मी भाळलो तुझ्य शब्दावर
शब्दातून जे व्यक्त होतं
त्या नितांत सुंदर मनावर
.
तरीही विचारायचं खरतर
एक गेलंच आहे की राहून
समोर गच्चीत मी पांढर्‍या शर्टात
तूही घे ना एकदा मला पाहून..!!
.
.
.
:कल्पना विलास
सौ. अनुराधा म्हापणकर

वटपौर्णिमा..

या वर्षीही मी वटपौर्णिमा करणार आहे
दरवर्षीप्रमाणे उपवाससुद्धा धरणार आहे
वडाला नित्यासारखे फेरेही घालणार आहे
जन्मोजन्मी तुलाच देवाकडे मागणार आहे
.
पण यंदा देवाला काही अट घालणार आहे
अट घालूनच मग मी वट पूजणार आहे

नाही रे तसं नाही .. तू नाही झालेलास मला वर्ज्य
थोडा हवाय बदल फक्त म्हणून करणार आहे अर्ज

सांगेन -येणारे सारे जन्म मला, तुझा नवरा होता यावे
आणि बायको म्हणून किनई तुझे, माझ्याशी लग्न ह्वावे

तुला मग माझी नवरेशाही मस्त दाखवीन म्हणते
या जन्मीचा सारा हिशोब चोख चुकता करीन म्हणते

वट पूजशील ना जेव्हा तू.. माझा शब्द तुला स्मरेल
बायको होणं सोप्पं नसतं बरं ..तुला तेव्हाच ते कळेल..!
.
.
टिपिकल बायको..!
सौ. अनुराधा म्हापणकर