Wednesday, December 19, 2007

एक दिवस असा यावा..


एक दिवस
असा यावा..

ऊर भरुन
श्वास घ्यावा..

उनाड वारा
आकंठ प्यावा..

श्रावण सर
चिंब झेलावी..

गर्द सावली
अंगावार घ्यावी..

पायाखाली मऊ
हिरवळ असावी..

दव ओले
अलगद टिपावे..

पिसासारखे
हलके ह्वावे..

एकदा.. फक्त एकदाच..
मुखवटा काढुन चेह-यावरचा..
खरे ..अगदी खरे जगावे...!!
.
.
.
..मुखवट्याआड..
..सौ. अनुराधा म्हापणकर..

Tuesday, December 18, 2007

आभास...??

तन.. मन.. धन..
सारे तुच निर्मिलेले आकार
पण आकार घेण्याआधीच
का झाले त्यांना विकार..?

दया.. क्षमा ..शांती..
सारी तुच पाडलीस स्वप्नं
पण साकार होण्याआधीच
का झाली ती भग्न?

इच्छा.. अपेक्षा .. आकांक्षा..
सारी तुच घेतलेली भरारी
पण आकाशी भिडण्याआधीच
का परतली ती माघारी?

धीर.. ख़ात्री.. विश्वास..
सारा तुच दिलास 'हो'कार
पण काही घडण्याआधीच
का आला हा 'न'कार..

तुच दाखवल्यास आशा
सारा तुच दिलास दिलासा..
मग या अपुर्णत्वाचा
का होत नाही खुलासा?

तुझ्य प्रत्येक किमयेचा
दरवळतो आहे सुवास
पण अस्तित्व कुठेच जाणवत नाही
सारेच आहेत का आभास...??

Sunday, December 16, 2007

विरह.. एका झाड़ाचा..

झाडाचा तो बुंधा..
त्याला धरुन बिलगुन
सरसर वर चढलेली ती वेल,
कुणी एके दिवशी
खसकन ओढुन काढली..

अंगभर सुकत थकत
त्या वेलीला आठवत स्मरत
ते झाड़ तीळ तीळ जळत राहीले..

चैत्रातही मग त्याला
पालवी नाही फुटली
आणि हळु हळु त्याची
सावलीसुद्धा आटली..

शिशिरात कारण जेंव्हा
त्याच्याच पानाफुलांनी
त्याची साथ होती सोडली..
त्या वेलीनेच तेंव्हा
खोड-फ़ांदीभर पसरून
त्याची हिरवळ होती जपली..!

सौ. अनुराधा म्हापणकर
:एक वेल मीही..
:माझ्या झाडाला बिलगलेली..

Saturday, December 15, 2007

कर्तव्यदक्ष गृहिणी: अ वर्किंग वुमन...!

पहाटेस गजर वाज़ला..
कुणाची झोपमोड़ होऊ नये म्हणुन
धडपडत तिने त्याचा गळा दाबला..

दबकत चोऱ्ट्या पावलानं
ती स्वैयंपाक घरात शिरली..
सारं घर उठेपर्यंत
ती अलगद अलवार वावरली..

मुलांचे डबे.. दप्तर यूनिफॉर्म..
चहा नाश्ता तयार होते.
नव-यासाठी पेपर ताज़ा
टेबलावर ज्युसचे जार होते..

वेळ्च्या वेळीच
मुलं शाळेत गेली..
आपल्या डब्याला तिने
मग भाजी पोळी केली..

नव-याचे बूट टाय
पाकिटासोबत ठेवला मोबाइल
गाडिची चावी- रूमालाची घड़ी
बाज़ुला ठेवली ऑफीसची फ़ाइल

सारं आटपून घातली तिने
स्वत:ला आंघोळ पट्कन..
पूजा .. प्रार्थना यथा सांग
देवाचेही केले स्मरण..

तीही मग झटकन
अशी काही तयार झाली
जणु सकाळपासुन सारी कामं
नोकरमंडळीच करून गेली

टवटवीत तिचे सावळे रूप
ट्रेनमधे गुदमरले
चेंगरून गेले थकुन
घामाने अगदी डबडबले

ओफिसातही तिने
कामाचे डोंगर उचलले..
मीटिंग्स..ऑडिट.. सारे
लिलया तिने पेलले..

त्याच गर्दीत चेंगरत
धावत पळत ती घरी आली..
मुलांचा अभ्यास.. पोळी भाजी
नव्याने तीच सूरवात झाली..

जेवण झाले गोडीने
पुन्हा सारे आवरले..
गजर लावत उशाशी
स्वत:ला तीने सावरले..

एक भुक अजुनही
भागवायची बाक़ी होती
डोळ्यावर होती झापड तरी
गालावर आली तकाकी होती

नव-याने मग अलगद तिला
आपल्या कुशीत ओढुन घेतले..
हळुवार चेह-यावरचे तिचे
कुंतल त्याने मागे सारले..

दिवसभर राबणा-या अर्धांगिनीला
परंतु त्याला वाटेना उठवावे..
काहीच जमलं नाही निदान
तिचे हे काम तरी मिटवावे..

मिट्लेल्या पापण्यांना मग त्या
हलकेच त्याने थोपटले..
भाबड्या तिच्या चेह-याला त्याने
नजरेनेच फक्त गोंजारले..


:एक गृहिणी..
:सौ. अनुराधा म्हापणकर

"आजच्या ठळक बातम्या"...

पेपर उघडला.. तेच तेच..

एकतर्फ़ी प्रेमातून प्रेयसीवर एसिड फ़ेकले
कुणी तर प्रेयसीच्या आईलाच जीवे मारले

होटेल रूमवर प्रेमिकेचा प्रियकरानेच केला घात
षोडस वर्षीय युवकाला मारण्यात मित्रांचाच होता हात

क्षुल्लक छोट्या भांडणातून
शाळ्करी मुलं सुद्धा पाडतात ख़ून
चाकू न्हवे.. नाही सुरा
गोळ्या झाडतात चक्क बंदुकीतून

रोज़ तेच घडत असते .. पेपरात छापुन येत असते
आजतक ..स्टार न्यूज़ पुन्हा पुन्हा दिसत असते

सगळं काही तेच..
नाव-गाव फक्त बदलत असते
वाचून पाहून ते भयाण सत्य
उरात धडकी भरत असते

घरोघरी मग प्रत्येक आईच्या
काळजीला येते भरते
जपुन रहा रे बाळांनो..
दिवस वाईट आलेत -म्हणते..

मीही एक आई.. मी सुद्धा घाबरते..
घाबरते तरी पुढ़च्याच क्षणी माझी मी सावरते..

बळी जाणा-याचे नशीब
नकोच माझ्या पिल्लांच्या वाट्याला
पण बळी घेणारेही नको हात त्यांचे
म्हणुन मलाच हवे ना घडवायला.........!!!!!!
:
:
अलिकड्च्या काळात.. अदनान-उद्योगपति पुत्र, अंधेरी होटेलरूमवर कौशंबीचा तिच्या प्रियकरानेच केलेला घात.. दिल्ली गुरगावला अगदी परवा घडलेलं शाळ्करी मुलांचं प्रकरण.. वर्शानुवर्शं चालत आलेली एसिडफेकी.. ह्या सर्व घटना पाहिल्या की वाटतं ह्या सा-याला बदलेला काळ जबाबदार आहेच.. पण पालकही तेवढेच जबाबदार आहेत..

जे बळी जातात त्यांच्यावर हळहळत, 'ते' आपल्या मुलाच्या वाट्याला न येवो म्हणुन आई वडील जागरूक असतात.. पण बळी घेणारे हात घडताना मात्र उघड्या डोळ्यानि तेच आई वडिल बघत रहातात (किंबहुना तेच घडवत असतात).

त्यांनीच लहानपणापासुन मुलाला एक सिक्युअर्ड लाइफ दिलय . जे जे मागेल.. ते ते आणुन दिलय.. प्रत्येक हट्ट पुरवलाय.. त्यामुळे 'नाही' कधी ऐकलच नाही.. 'नकार' पचवायची सवयच जर त्याला लागू दिली नाही तर.. हे पुढच्या आयुष्यातले "नकार" कस पचवणार आहे ते मुलं मोठं झाल्यावर???

आहे ना एक प्रश्नच??.. पण उत्तर आपल्याकडेच आहे त्याचं.. खरं ना??

एक आई..
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, December 1, 2007

"भारत माझा देश आहे"..

सरळ काटकोनात हात
शाळेत बोबड्या आवाजात
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

समज आली - आणखी जोशात ..
करून अगदी ताठ हात..
म्हणायचो प्रतिज्ञा "भारत माझा देश आहे"

शाळा सुटली.. तशी प्रतिज्ञा..

विसरतो..."भारत माझा देश आहे"

आम्ही आता मल्टिपलेक्समधे सिनेमा पाहतो
पॉपकॉर्न ठेवून बाजूला राष्ट्रगीताला उभे राहतो
राष्ट्रगीत ते पाहताना दाटून येते देशभक्ती
मुलानाही मग करतो ताठ उभ राहायची सक्ती
राष्ट्रगीत संपते.. तसा ताठ कणा मोडतो..
रिलॅक्सिंग खुर्चीत आम्ही अस्ताव्यस्त पसरतो..

विसरतो .."भारत माझा देश आहे"

'बॉर्डर' सिनेमा पाहून राष्ट्रप्रेम उफाळते
धमण्या नसा-नसातून रक्तरक्त उसळते
सीमेच्या सैनिकाला मन सलामसुद्धा करते
धारतीर्थी पडले जे त्यानाही मन स्मरते
सिनेमा संपतो.. सैनिकाची आठवण मग मनाला कुठली होते
आणि धमन्या नसातून वाहणारे रक्त पुन्हा बर्फासारखे थिजते


विसरतो "भारत माझा देश आहे"

भारत पाक मॅच म्हणजे देश भक्तीचे भरते
सचिन शोएबची जुगलबंदी मस्त पैकी रंगते
फाळणीची आठवण पुन्हा मनात दाटते
जिंकणे न्हवे फक्त, त्यांची हार महत्वाची असते
मॅच संपते.. हरल्यावर देशभक्तीचा दिवा विझतो
दोन शिव्या हासडून मग जो तो वाटेला लागतो
विसरतो.. "भारत माझा देश आहे"..

स्वाभिमान ..राष्ट्र प्रेम जागवायला असे घडावे लागतात प्रसंग
तेव्हाच फक्त दिसतात आम्हाला आमच्या तिरंग्यातले रंग ..

[blue]
क्षणभरच आम्ही देशप्रेमाला लागतो..
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र दिन आम्ही
पब्लिक हॉलिडे म्हणून लक्षात ठेवतो ..

विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे"
विसरतो पुन्हा.."भारत माझा देश आहे" ..

मी का भोगावी ही शिक्षा..?

झाले असेल एकच चूक ..
पण तीही का केली..
पोटभर जेवुनसुद्धा
ही भूक का लागली ..?

आणि ह्या चुकीची..
मी का भोगावी ही शिक्षा..
सांगा माझं काय चुकलं ...???

ज्याच्यावर प्रेम केलं ..
त्यानेच मला फसवलं होतं..
ह्याच धक्क्याने खरतर
मन माझ मेलं होतं ..

हेच काय कमी होतं..
म्हणुन..
एड्सच जोखड लादलं गेलं
जगुन संपण्याआधीच
मरण लादलं गेलं ..

विश्वासघाताची शिक्षा म्हनून
घटस्फोट घेईन कदाचित..
विसरेन ही प्रयासाने..
त्याच्यावर केलेली भोळी प्रीत..

पण एड्स मात्र मला हा
आता जन्मभर पुरेल..
माझं कलेवर चढेल सरणावर
तेंव्हाच मला सोडेल..

पण कळत नाही अजूनही..
मी का भोगावी ही शिक्षा..
सांगा माझं काय चुकलं ...???
.
.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर
डिसेम्बर १, २००७

द्रौपदीचा धावा

थांब थांब रे दु:शासना
माझा सोडी रे कचपाश
स्व:हस्ते तू लेखीशी का
तुझ्या कुळाचा नाश

द्रौपदी मी सती पतिव्रता
भ्रात्यांची तव भार्या
कूलवधु भारत वंशाची
चारित्र्यवान मी आर्या

कवड्यांचा सारीपाट मांडला
दुर्योधना शकुनीची सोबत
पणास लाविली पांचाली
कवडीची केली किंमत

भरसभेत बसले हतबल सारे
कुणी न राहिला वाली
मम रक्षणाची शपथ घेतली
त्यांची मानही खाली

भीष्म पितामह, पिता धृतराष्ट्र
द्रोण गुरू.. अन् कृपाचार्य..
मूक नि:श्‍चल बसले सारे
खचत चालले माझे धैर्य

याची देही याची डोळा
काय पहाते आज
भरसभेत ह्या निराधार मी
कशी वाचवू लाज

डोळ्यासमोर दाटूनी येई
काळा कुटट अंधार
दुभंगे धरती पायाखाली
आकाशी हाहा:कार

शेवटली आस अखेरचा श्वास
ओठांवर येई शेवटले नाव
नसे इथे तरी विश्वास परी
मजसाठी हरी घेईल धाव

सरली सारी भयभीती
उरले ना काही प्रश्न
एकच आता ओठावरती...

हे कृष्ण ..
.
हे कृष्ण ..
.
हे कृष्ण....!!!!!!!!!!