Thursday, January 22, 2009

लक्झरीज..!!

.
आईग्ग..
पाय दुखताहेत ग खूप्प.... रिक्षा..!

नो ग प्लीज
बसने नको नं जाऊया... टॆक्सी..!

ओह.. मम्मा
कित्ती कित्ती ग गरम होतय.. फॆन..!

शी ग्ग...!
फॆनखाली सुद्धा उकडतय.. एसी..!

मम्मा ग
ताटात पोळी थंड झाली.. मायक्रो..!

ईई नक्को ग
कशाला डाळभाताचा कूकर.. पिझ्झा..!

स्कूल प्रोजेक्ट्स..
कुठे ग पेपरात शोधतेस.. इन्टरनेट..!

श्रम नको..
त्रास नको..
सहनशक्ती नाही उरली..
लक्झरीज..!!
लक्झरीयस आयुष्याची
रक्तात सवय मुरली ..!
.
पण,
तुझी चूक नाही बाळा...!
मला तरी कुठे बसवतय फॆनविना..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, January 15, 2009

पिग्गी बँक

.
लहानपणीचा स्टडीटेबलावरचा
तो मातीचा ओबडधोबड पिग्गी..!

पाच पैशापासून रुपयापर्यंत
तळव्यावर पडलेलं कुठलंही..
अगदी कुठलंही नाणं चालायचं
खण्णकन वाजत त्यात ते पडायच
तेव्हा कित्ती आनंद व्हायचा..

ती गच्च भरलेली पिग्गी बँक
तश्शीच आहे अजून टेबलावर
त्यातल्या नाण्यांची खणखणही
त्यात जपलेले आनंदाचे कणकणही

अलिकडेच कधी घेतलेले एफडीज
कितीदा घेतले आणि..
कितीदा मोडले...
गणितच नाही..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर