Wednesday, December 29, 2010

आयुष्याच्या मध्यभागी



रसिकहो..

८४ व्या साहित्यसंमेलनाच्या प्रकाशन मंचावर, माननीय अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे व सुप्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या शुभहस्ते, माझा पहिलाच काव्यसंग्रह .. "आयुष्याच्या मध्यभागी...." प्रकाशित झाला.

तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या प्रसंगावर बेतलेला हा काव्यसंग्रह तुम्हाला नक्की आवडेल.

किंमत: रुपये ऐंशी फक्त

तुमची प्रत राखून ठेवली आहे.. !
संपर्क : ०९८६९३४६१५१

Friday, December 24, 2010

ll आमंत्रण ll

मराठी साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची मांदियाळी, साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने भरते. हेच औचित्य साधून, " १४ विद्या ६४ कला " ही संस्था, ठाणे येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या मंचावर, एका प्रतिभावान कवयित्रीचा पहिला कवितासंग्रह - " आयुष्याच्या मध्यभागी ... " प्रकाशित करीत आहे. सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या " आयुष्याच्या मध्यभागी…. " ह्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहातून पुस्तकरुपाने प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहेत ! 

ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, सुप्रसिद्ध संगीतकार, कौशल इनामदार ह्यांच्या हस्ते होईल.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या आपल्या शिल्पकार पतीच्या कला-व्यवसायात व्यावहारिक बाजूचे समर्थ व्यवस्थापन करतात. परंतु, कामाच्या वाढत्या व्यापात, शालेय जीवनापासूनची " कवितेची वही " मात्र एव्हाना, माळ्यावर सुखे-समाधाने नांदू लागली होती. तरीही, मनाच्या कोप-यात रुजलेली एक हळवी कविता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच अस्वस्थतेतून एक दिवस एक कविता, इंटरनेटच्या माध्यमातून ऒरकुटच्या पानावर पोस्ट झाली.. आणि मग त्यांना तो छंदच जडला. यथावकाश, लोकसत्ता, प्रहार सारख्या दैनिकांतून, सौ. अनुराधा म्हापणकर, कधी काव्यरुपांत, तर कधी आपल्या लेखांतून वाचकांच्या भेटीस येत राहिल्या. ह्या काव्य संग्रहास, सुप्रसिद्ध गीतकार, गुरु ठाकूर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.

" आयुष्याच्या मध्यभागी .... "
कवयित्री : सौ. अनुराधा म्हापणकर 
प्रकाशक : १४ विद्या ६४ कला 
प्रकाशन स्थळ : ८४ वे मराठी साहित्य संमेलन, ठाणे 
प्रकाशन समारंभ : २५ डिसेंबर २०१०, सायंकाळी ५ वाजता.
संगीतकार कौशल इनामदार ह्यांच्या हस्ते प्रकाशन..... 


Tuesday, November 2, 2010

"कविते"साठी काय हवं ?

मूठभर ठसठसती वेदना,
पसाभर हळव्या भावना

पापणीभर ओले डोळे
थेंबथेंब आसवाचे तळे

काही मोकळे उसासे
काही कोंडले जरासे

जगण्याचा वेडा ध्यास
अप्राप्यसे स्वप्न भास

चिमूटभर सुखाचे कण
ठेवणीतले आनंद क्षण
.
.
ओंजळभर शब्दांना,
ह्या सा-यात मुरु द्यावं
"कविते"साठी वेगळं,
आणखी काय हवं ?..

.
अनुराधा म्हापणकर

Friday, October 15, 2010

कधी भेटूया गं?

खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणीचा फोन आला. माझा किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस नसतानाही तिचा फोन आला तेव्हा नंबर बघून थोडं आश्चर्यच वाटलं. ‘सहजच असेल ना..? की..?’ अशी शंकेची पालही चुकचुकली. फोन उचलल्यावर तिचा तितक्याच उत्साहातलं नेहमीचं ‘हॅल्लो’ ऐकलं आणि जीव भांडय़ात पडला. ‘काय गं, असं अचानक?’ ‘हो गं, खरंच खूप कंटाळा आलाय. सकाळी उठायचं- डबा, जेवण, मुलं, दप्तरं, शाळा, लोकल, नोकरी- मरेपर्यंत कामाचं प्रेशर, पुन्हा लोकल, धावपळ, घर. पुन्हा स्वयंपाक, घर, नवरा, मुलं, त्यांचा अभ्यास! लाइफ में कुछ ब्रेकही नहीं! भेटूया ना गं
.
.


कधी भेटूया गं?

Thursday, September 9, 2010

बाप्पा म्हणाला, आठव टिळक
म्हटलं, गुगलवर बघू,
पटते का ओळख..

बाप्पाने मागितला, इकोफ्रेन्डली मखर
समजावत म्हटलं.. फॆड आहे रे सगळं
थर्माकोलच वापर

बाप्पाला हवी, शाडूची मूर्ती
छे छे.. म्हटलं, काहीतरीच !
अरे, नाजूक फार ती..

बाप्पाने म्हटलं, नको बॆन्डबाजा
मागवलाय म्हटलं त्याला
नाशिकचा ढोल ताशा

बाप्पा म्हणे, वीज जाळू नको फार
कशाला रे काळजी म्हटलं
जनरेटर्सही आहेत चार

बाप्पा वैतागला, लाऊडस्पीकर नको
आरतीचंच असेल रे रिमीक्स
अज्जिबात फिकर नको

बाप्पा म्हणाला उकडीचा मोदक हवा
म्हटलं, अरे चाखून पाहिलाय..
कालचाच आहे खवा

नवसाला पाव रे म्हणत,
त्याच्यावर नारळांचं तोरण चढवलं
पळ काढत म्हणाला बाप्पा
प्लॆस्टरच्या मूर्तीत माझं देवपणच हरवलं


: अनुराधा म्हापणकर

Wednesday, September 8, 2010

चेहरा

ओळखूनही, मला अनोळखी जो भासला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

आरशातही कितीदा, पाहुनी मला जो हसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

न ओळखता मी त्याला, थोडा जो हिरमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

अजाणता "स्व"हस्तेच होता मी जो पुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

"स्व" उमगले ना कधी, विचार त्याचा कसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

वाट पाहुनी अखेरी, स्फुंदुनी जो मुसमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

: अनुराधा म्हापणकर

साक्षात्कार..!!

बहुधा सुखाचा मला भार झाला
अन वेदनेचा, साक्षात्कार झाला

उफाळून आली जी होती तळाशी
कसा कोण जाणे, हा उच्चार झाला

होतेच जगणे चाललेले बरेसे
कोठोनी कळेना, हा चित्कार आला

अता उमजेना कसे तिस लपवू
कळे सर्व लोकी, हा बाजार झाला

सारेच जमले सांत्वनास माझ्या
उपदेश सल्ला - भडीमार झाला

राहिली वेदना ती बाजूस एका
उगा जीव माझा, हा बेजार झाला

पुन्हा बापुडीला कोंडले उराशी
कातावला जीव, थंडगार झाला

पुन:श्च आता, जगणे सुखाने
नव्याने सुखाचा, साक्षात्कार झाला

सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, September 2, 2010

पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवार



















पूर हा प्रकोप सारा, कोसळतो रे कान्हा
तुजवाचूनी व्याकूळ रे, देवकीचा पान्हा

यशोदेला दावी पुन:, विश्वाचे ते रुप
तुजसाठी साठविलेले, दही दूध तूप

वृंदावनी राधा झुरते, ख-या प्रीतीसाठी
एकवार लाव कान्हा, सानिकेस ओठी

शंभर येथ दु:शासन, अन सहस्त्र ते दुर्योधन
भरसभेत किती द्रौपदीचे, नित्याचे वस्त्रहरण

कुरूक्षेत्री पुन्हा आज, महाभारत पेटले
असुर-कौरवाचे सैन्य, रणांगणी लोटले

घे धाव पुन्हा कान्हा, दे छाया तो गोवर्धन
असुरांना मारण्याला, सोडी चक्र ते सुदर्शन

उद्धारण्या विश्वा, ये श्रीविष्णुचा अवतार
पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवार


: अनुराधा म्हापणकर

Tuesday, August 31, 2010

कितितरी दिसांत तो, आज दिसला ग बाई

कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
पानांआडून खट्याळसा
आज हसला ग बाई

..................त्याच्या येण्याने ग अशा
..................उजळल्या दाहि दिशा
..................त्रिभुवनाची बघ कशी
..................हसली ग रेषा रेषा
.
काळा काजळी काळोख
त्याने पुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................सखे, मनात ग तुझ्या
...................भलभलते विचार
...................नाव कुणाचे पुसशी
...................उगा असे वारंवार
.
बघ तोही मजवरी
आता रुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................डोंगराच्या पलिकडे
...................त्याचे आहे एक गाव
...................तुझ्या कानात सांगते
...................गडे "सूर्य" त्याचे नाव
.
एक माणूस कस्सा ना
आज फसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
.
अनुराधा म्हापणकर
ऒगस्ट २८, २०१०
A Bright Sunny Day
after a Long time, in Mumbai !

Thursday, August 19, 2010

एक उसासा फक्त


एक उसासा फक्त

बरंच काही बोलून गेला

किती हळव्या भावनांना

एका श्वासावर तोलून गेला


.

आता शब्दांना काही

बोलणे स्फुरलेच नाही

तरी ते बोलिले बापुडे

अर्थ त्यात उरलेच नाही


.

विरला तो उसासा हवेत

उगा श्वासात बोटे खुपसू नका

पसरले शब्द - भास खोटे

उगा भाव त्यातूनी उपसू नका


.

सारे आता शांत संथ

श्वासांनाही साधलेली लय आहे

शब्द आणि श्वास… !

त्यांची रोजचीच ही सवय आहे


.

अनुराधा म्हापणकर


Wednesday, August 18, 2010

श्रावण..!


















उन्हे उलटता, सांजवेळी
श्रावण ओल्या घनात
दाटून आले आभाळ सारे
पावसाच्या काय मनात


रिमझिम रिमझिम झिरमिरती
इवलेइवले तुषार
हळूच मागून खोडी काढी
वारा किती हुशार


उघडीप झाली मेघाआडूनी
तळ्यात चमचम बिंब
तिरिप कोवळी पिवळीपिवळी
पानांत टपटप थेंब


श्रावण सा-या चराचरांत
नवचैतन्याचा पूर
अलगद जैसे मनात कोणी
छेडत राही सूर


: अनुराधा म्हापणकर

Friday, July 30, 2010

Friday, July 9, 2010

रेनकोट

रेनकोट

Friday, June 18, 2010

बेस्ट ऒफ फ़ाइव्ह

अरे वा ! ९३ - ९५ - ९८ टक्के
मार्कांच्या राशी.. एडमिशन पक्के!

कीप इट अप .. वेल डन..
खूप छान.. अभिनंदन..!

आता एकच भीती... फक्त
आयुष्यात यापुढेही सगळं..
अस्सच... अगदी अस्सच
"बेस्ट ऒफ फाइव्ह" मिळेल ?

: अनुराधा म्हापणकर.

Wednesday, June 16, 2010

देवकी

हे कान्हा…
तू माझा की यशोदेचा
मला प्रश्न नाही पडलेला
माझ्या मातृत्वाचा श्वासही
तुझ्यासाठी नाही अडलेला

तरीही काही प्रश्न आहेत..
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

न मागताही तुझ्यासम दैवी रुप उदरी आलं
म्हणून भाग्याने मी उजळायचं,
की
तुला जन्म देऊनही वांझोटपणच पदरी आलं
म्हणून दैवावर मी उसळायचं...
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

"राम" म्हणून तू जन्म घेतलास तेव्हाही..
"कृष्ण" म्हणून माझ्या उदरी आलास तेव्हाही
तू त्राताच होतास..
कर्त्यव्य तत्पर.. जगाचा, युगाचा
उद्धारकर्ता होतास ...

तेव्हा वनवासात गेलास ते,
पित्याच्या वचनपूर्तीसाठी..
की रावणाच्या पापविनाशासाठी..?
आताही जन्म घेतलास तो
कंसाच्या दुष्कृत्याच्या विनाशाचे
लिखित होऊनच..!

कारण कुठलेही असो..
तेव्हाही.. तसेच..
कौत्सल्याराणीचे पुत्रवियोगात रडणे
आणि आताही
देवकीचे तुझ्यासाठी व्याकुळ होणे
प्रत्येक वेळी ..
आईची कूसच का पणाला लावलीस
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?


: अनुराधा म्हापणकर

Wednesday, June 9, 2010

पहिला पाऊस

आला पहिला पाऊस
धरा झाली चिंब ओली
कोणा सुचली कविता
कोणी लिहीली चारोळी

कोणी प्रेमी झाडामागे
होते झालेले बेभान
तिचे ओलेते सौंदर्य
आज आले मोहरून

तापलेली वसुंधरा
शांत थंड झाली थोडी
नभातूनी बरसली
धार अमृताची गोडी

आली निश्चिंती निवांत
आता भरतील तळी
अशी फुलली म्हणोनी
जनसामान्याची कळी

तरी जीवा नाही थारा
आहे घोर परी चिंता
कशी उडालेली दैना
एक सर येता येता

त्रेधा चालताना पाय
खड्डयांत अडखळती
कुठे पाण्यांची डबकी
कधी भिंती कोसळती

कशी ट्रेन लेट आली
कुठे रुळ उतरले
आणि सबवेत पाणी
उगा ट्राफिक फसले

तो आहे "मुंबईकर"
नाही नशिबी सुटका
ऊन असो की पाऊस
त्याला सदैव फटका
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, May 13, 2010

दिल्या घरी सुखी राहा

खूप छान दिसतेस गं, हातावरची कोपरापर्यंतची ती रंगलेली मेंदी, हिरवागार चुडा, गर्द रेशमी शालू, काळ्या मण्यांची पोत, नवी नवलाई सांगणाऱ्या त्या लखलख वाटय़ा! सगळं सगळं खुलून दिसतंय अगदी तुझ्यावर. कालच्या हळदीचं तेजही झळाळतंय. ते रुजही इतकं बेमालून मिसळलंय गालांवर की जणू लाजून लालीच चढली आहे!!
तरीही तुला कसं सांगू. हा आजचा दिवस आणि उद्यापासून सुरू होणारा तुझा संसार यात किती फरक आहे गं.



दिल्या घरी सुखी राहा

Monday, May 10, 2010

फोटो..

.
छान आहे फोटो.. क्लीअर..
यु लूक सो ऒसम डिअर.. !!

ओह.. लुक एट धीस... माइन्ड ब्लोईंग
किती शटर स्पीड होता, कसं होतं सेटींग

हाही ग्रेट.. क्लिक्ड ऒन मॆन्युअल मोड
पिल्लू बघ ना दिसतंय, किती गोड गोड

तसा छान आलाय तरी, फ्रेम नॊट परफेक्ट
डोन्ट वरी !! फोटोशॊपवर करु ना करेक्ट

मलाही देशील ना.. पेन ड्राइव्हमधे
पाहत जाईन पीसीवर मीही अधेमधे

काही निवडक त्यातले स्क्रीनसेव्हर ठेवेन
एखादा मस्त निवडून वॊलपेपर बनवेन

यात मी गोरी दिसतेय… येस्स ! प्रोफाइल पिक !
हं.! हा ग्रुप फोटो - एफबीच्या वॊलसाठी ठीक..!

एसएलआरचा कॆमेरा, विद झूम लेन्स..!
पापणीचाही दिसतोय एकेक केसन केस

एकाच आऊटींगच्या पिक्सने पीसी व्यापून गेला
तरीही फक्त पाचच मिनिटांत, स्लाइडशो संपून गेला
.
.
वरच्या ट्रंकेतला तो सोनेरी अल्बम मात्र
मी आजही पानपान उलटत पाहते

ब्लॆक एन्ड व्हाइटची ती प्रत्येक फ्रेम
किती हसवते, कधी पापण्यांतून वाहते

एकाच रोलमधले ते छत्तीस फोटो फक्त
दिवसभर मी.. नजरेत साठवत राहते
.
.
: एका फ्रेममधे अडकलेली !
: अनुराधा म्हापणकर

Thursday, May 6, 2010

रोल मॉडेल

रोल मॉडेल

रोल मॊडेल.. लोकसत्ता विवा.. ६ मे, २०१०

अजूनही आवडते ती.. पण आता फार्र्रच.. डोक्यात जाते. सतत प्रश्नपत्रिका
घेऊनच उभी असते अवतीभवती. काय करतेस, किती वेळ मोबाइलवर, कोणाशी बोलत
होतीस, कुठे चाललीस, बरोबर कोण आहे, कशी जाणार, किती वाजता येशील, इतका
उशीर का होणार, काय खाल्लंस, जेवून जा, जेवायला वेळेवर ये, वेळेवर का
झोपली नाहीस, अनेक अनेक प्रश्नांनी.. नुसती भंडावून सोडत असते. रोज
उठल्यापासून प्लेअरवर सीडी लावावी तशी चालू होते. मग म्युट, स्टॉप,
व्हॉल्युम कंट्रोल कुठलीच बटणं चालत नाहीत. कानात, केसांमागून इअर फोन्स
लावलेलेही कळतात तिला, तशी मुळातच स्मार्ट! पण आता जाम इरिटेट करायला
लागली आहे.....

पुढे....



http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=67373:2010-05-05-09-20-13&catid=74:2009-07-28-04-56-38&Itemid=87

Sunday, April 25, 2010

बंद चौकटीआड



दैनिक प्रहार एप्रिल २५, २०१० : कोलाज, पान ५ :
http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=22974&boxid=231948796

सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, April 8, 2010

माय कॉर्नर : जनरेशन नेक्स्ट

माय कॉर्नर : जनरेशन नेक्स्ट


लोकसत्ता : व्हिवा पान ३,
गुरुवार, एप्रिल ८, २०१०

Thursday, March 25, 2010

अग्नीपरिक्षा

जानकीस म्हणे श्रीराम, प्रिये, भूतली पहा जरा
जन्मदिन माझा आजि, उत्साहे होतो साजरा

पहा चहुकडे सारा, पसरला संतोष आहे
मंदिरात राऊळीही, माझा जयघोष आहे

मानवाने सागरात, उभारिला उंच सेतू
जैसा मीही रचिलेला, विसरलीस काय तू

माझ्या जन्मप्रीत्यर्थे, आज सेतूचे उद्धाटन
कितिक थोर जनांस, तेथ केले पाचारण

पुन:श्च वाटे जन्मावे, धरणीवरी अवतरावे
याचि देही याची डोळा, सारे ते अनुभवावे

ऐकोनी श्रींची वचने, जीव जानकीचा थरथरला
म्हणे नाथ कशासाठी, हा भलताचि हट्ट धरला

नाथा होईल अनर्थ, क्षणभरी विचार करा
कलियुगे जन्मापरी, तो वनवास होता बरा

एकटाच तो मायावी, होता रावण लंकाधिपती
मात्र कलियुगात या, रावणाचीच आहे भरती

तुम्ही साक्षात परमेश्वरी अंश, तुम्हांस न अशक्य काही
रावणराज्यात परि सीता पुन्हा,अग्नीपरिक्षा देणार नाही

सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, March 23, 2010

रोग !

असहाय्य अस्थिर लोकांचे, पसरलेले पुंजके
अशिक्षित खेडवळ कुणी अन, शहाणेही मोजके

गांजलेले व्यापलेले त्यात होते, त्रस्त कोणी
दुर्धर जर्जर व्याधींनी टेकलेले, ग्रस्त कोणी

आहे म्हणे तेथ एक, सिद्धपुरुष महायोगी
लीलया "बाबा"ने त्या निवारले किती रोगी

प्रत्येक गाववेशीवर अशी एखादी आहे रांग
शहरांचं म्हणाल तर वेशीइतकीही नाही लांब

एकविसाव्या शतकातही, अक्कलच गहाण आहे
पादुका म्हणोनी शिरावर, पहा कोणाची वहाण आहे

सायन्स टेक्नोलॊजी जमान्यात, इथे बुद्धीशी वाकडे
आणि (संधी)साधूबाबा ऐकतो, भक्तगणाचे साकडे

निवारेल का कोणी, हाच खरा रोग आहे..
अंधश्रद्धा, देशाचा या अनादिकालीन भोग आहे

सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, March 21, 2010

धमाल मस्ती
























सौ. अनुराधा म्हापणकर
दैनिक प्रहार : मार्च २१, २०१०

Thursday, March 18, 2010

"ती"....

जगण्याचा ध्यास ती, मूर्त स्वप्नभास ती
मूक शब्दा गवसलेला, मंजुळ स्वरभास ती

आयुष्याच्या मध्यांतरी, परतलेले शैषव ती
अल्लड अवखळ चंचला, मृदु कधी मार्दव ती

उसळणारा प्रपात कधी, अन खळाळता झरा ती
डोळ्यांतूनी उगा बरसत्या, कधी श्रावणधारा ती

कोसळताना सावरणारी घट्ट एक आधार ती
विस्कटताना आवरणारी लयबद्ध आकार ती

तिचेच देणे, जगण्यास आले, माझ्या जे, पूर्णत्व ती
माझाच वारसा लाभलेले, पारंपारिक स्त्रीत्त्व ती

कोण म्हणोनी काय पुसता, माझेच प्रतिबिंब ती
चांदणरात्री झळाळणारे, पूर्ण ते चंद्रबिंब ती

नाही दुजी अन्य कोणी, तिच्यासम एक ती
आहे माझ्या लाडाची, एकलुती एक लेक ती

अनुराधा म्हापणकर

Monday, March 15, 2010

गुढीपाडवा

मी आणली ना विकत
गुढी रेशमी एक रेडीमेड..
पाटावरली रांगोळी मात्र
माझीच हं! - सेल्फ़मेड..


गोडधोड काय विचारता ?
आणलंय ना "चितळे"च आम्रखंड..
पु-या मीच केल्या हो,
आणि बाकीचा स्वयंपाकही अखंड


दारावर बांधलं भरगच्च तोरण
आंब्याच्या डहाळीला अशोकाचं पान
झेंडू मात्र टपोरा केशरी
एकेक वेचून घेतलाय छान


मुलांनी विचारलं.. मॊम-
तांब्याला का ग उंचावर टांगलं
तांब्या नव्हे रे - गुढी ती,
आज किनई, असं करणं चांगलं..


"आजच का-" ? विचारशील
तर उत्तर मी थोडं मागाहून देते
विसरलेय खरतर बरंच काही
हळूच "गुगल" वर डोकावून येते


माझ्याच सणाचे महत्व,
मला माहित नाही, म्हणून हसू नका
"थर्टी फर्स्ट" च्या पार्टीत तुम्हीही नाचता
आता - खरं बोलले म्हणून रुसू नका


सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, March 8, 2010

Sunday, February 28, 2010

मराठी असे आमची मायबोली



प्रहार : कोलाज : २८ फेब्रुवारी, २०१०
http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=20167&boxid=23442593

Sunday, February 21, 2010

किक..!

त्याने किक मारली
त्याची बाईक फुरफुरली
ती डौलाने स्वार होत
अख्खी त्याच्यावर रेलली

आज कुठे.. कुठला नवा बीच
की खडकामागची जागा- ठरलेलीच

ती अधिकच लाडात आली
हातांची मिठी घट्ट झाली
त्याचेही बाहू फुरफुरले
बाईकचे हॊर्न्स गुरगुरले

अंगी भिनले वारे - भन्नाट
वा-याच्या वेगाने - सुस्साट

ओळखीचे रस्ते धुसर झाले
नवे रस्ते अंगावर आले

फुल्लटू धूम स्पीड………!
तेवढ्यातच -
करकचून लागलेले ब्रेक्स..!
काचांचा चक्काचूर..
फाटलेला स्कार्फ..
दूर उडालेलं हेल्मेट ..!
………….
आणि क्षणात थांबलेलं सारं…. !!
.
.
तिची आई मात्र काही ऐकून घेत नाही
सारखं आपलं एकच… कॊलेजला गेलीय..
आज एक्स्ट्रा लेक्चर आहे, म्हणाली
येईलच एवढ्यात !!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, February 15, 2010

अगतिक..

हातातून एकाएकी सारं निसटावं
तसं सारं सुटून जात होतं
पायातलं सारं बळ गळून जावं
तसंच तिला वाटत होतं

भरल्या नजरेतून पाणी वाहिलं
त्याक्षणीही तिला आठवत राहिलं
.
.
तिच्या बाळाचं बारसं - त्याचं बालपण
असामान्य हुशारीने चमचमणारं शिक्षण
त्याच्या सर्वांगिण वाढीसाठी
तिने वेचलेला आयुष्यातला क्षणन क्षण
त्याच्यासाठी अहोरात्र झटताना
तिचं स्वत:च झिजून जाणं कण कण
सदैव यशाच्या शिखरावर असताना
त्याच्यात प्रयत्नपूर्वक जपलेलं माणूसपण

तिने घडवले त्याला.. सुसंस्कारही दिले..
फक्त.. "अपयश कसं पचवायचं ?"
हे शिकवायचे मात्र राहून गेले.......
.
.
आता मांडीवर त्याचं थंड होत चाललेलं डोकं..
आणि हातात त्याचं रक्ताळलेलं मनगट धरून
बसली आहे अगतिक.. हॊस्पिटलच्या वाटेवर... !!!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

तिची अट ..


आज पुन्हा कांदे पोहे..
गुण जुळलेली पत्रिका
स्वैपाक नोकरी आवडीनिवडी
मॊड्युलर प्रश्नपत्रिका

ती पुन्हा साडी सावरत
वाफाळणारा चहा घेऊन
प्रत्येक प्रश्नाला तिचं उत्तर
नजरेला नजर देऊन

देखणी हुशार शिकलेली
नोकरी कायम पगारी
गृहकृत्यदक्ष अदबशीर
ती सुसंस्कृत व्यवहारी

अघळपघळ गप्पांत
चहाचा कप सरला
"पसंत आहे मुलगी"
त्यांनी ’हो’कार भरला

तिचा चेह-यावर तटस्थ
को-या निर्विकार भावना
डोळ्यात होती अस्पष्ट
खुपणारी एक वेदना
.
.
"विचार करुन कळवतो"
ते म्हणाले, बैठक उठली
अपेक्षित तिला होते तशी
गाठ जुळताजुळता सुटली
.
.
.
ध्यानीमनी तिच्या नसता
त्या रात्री अघटीत घडलं
तिच्या विधवा गरिब आईने
स्वत:ला संपवून टाकलं

जाता जाता इतकंच म्हटलं
"लग्न करुन सुखी हो बाळा..
माझ्या जबाबदारीतून तुला मी
आता कायमचं मोकळं केलं......"


: सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, February 14, 2010

"व्हॆलेन्टाईन डे"..

Monday, January 25, 2010

भाग्यवान आम्ही



दैनिक प्रहार : कोलाज २४ जानेवारी २०१०.

Monday, January 18, 2010

फक्त पावकिलो .. !

आताशा मला रोज रात्री
छान तूरडाळीचं स्वप्न पडतं
तूरडाळीच पोतं दिसत
आणि नेमकं स्वप्न मोडतं

साखर दिसते शुभ्र पांढरी
हिरे जणु ते मौल्यवान
भरुन ठेवेन म्हणते डबा
आणि स्वप्नाला येते भान

तो तांदूळ कोलम सुरती
डोळे मिटून घेते सुवास
डोक्यावरच पडते पोते
आणि मिटून जातो भास

उडीद.. चणा.. मूगमटकी
नाही- स्वप्नातही मी पहात नाही
पावकिलो मापातच आणते सारं
उगीचच बोजड पोती वहात नाही


सौ. अनुराधा म्हापणकर
(महागाईपिडित)

जन्म रहस्य?

थांबणार का कधी रे
हेटाळणारे ते हास्य
कळेल का कधी रे
मम जन्माचे रहस्य

कोण मी कुठला आहे
ब्राह्मण, म्हार दलित
कोण आहे मायबाप
कोणाचे बीज फलित

भाळी प्रायश्चित्त लेख
न घडलेल्या पापाचे ?
हसा लेको हसा तुम्ही
लावता नाव बापाचे

"सूतपुत्र" ज्या कथिले
सूर्यबिंब तो साक्षात
वीराहूनी कूळ श्रेष्ठ
अशी दुनियेची रित

मातृत्वाचा तो उच्चार
त्या सूर्यपुत्रही वंचित
नियतीला शरण मी
क्षुद्र मनुष्यनिर्मित ..!


: सौ अनुराधा म्हापणकर