Tuesday, October 1, 2013

कातरवेळ

जीव कापरा कापरा
वेळ कातर कातर
सांज पहाटेच्या मधे
एका रात्रीचे अंतर
धेनू हंबरती कशा
गूढ गंभीर गंभीर
घरट्यात परतली
सारी पाखरे अधीर
असा सूर्य वितळला
क्षितीजाच्या रेषेवर
लाटा लालबुंद मंद
सागराचा नीर तीर
तम दाटे दाहिदिशा
त्यासी चंद्राचा आधार
चंद्रकोरीने पेलला
गर्द अंधार अंधार
सांजवेळी वृंदावन
उजळले देवघर
चराचरी तो भरुनी
आला चैतन्याचा पूर
अनुराधा म्हापणकर

Tuesday, September 24, 2013


चाले आषाढीची वारी

चाले आषाढीची वारी 
वर आषाढाच्या सरी 
सारी गरजे पंढरी 
विठू नाम ll

संथ लय एक ताल 
चाले थोर वृद्ध बाल 
चिपळीच्या सवे टाळ 
वाजविती ll

डोईवर ती तुळस 
दिसे विठूचा कळस 
नाही पायाला आळस 
वेग वाढे ll

बळ देतो माझ्या पाया 
माझा पंढरीचा राया 
वारी पूर्ण ही कराया 
कृपा तुझी ll

विठू नाम सदा मुखे 
कळसासी डोळा देखे 
तिन्ही लोकीची हो सुखे 
त्याचे ठायी ll

माझ्या शहरी भावंडा 
वेळ काढुनिया थोडा 
मुखी विठ्ठल तेवढा 
आळवावा ll

अनुराधा म्हापणकर http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:ywMudXL7cowJ:maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/21152996.cms+&cd=5&hl=en&ct=clnk&gl=in

पत्त्यांचा डाव

आयुष्य पत्त्यांसारखंच असतं.. प्रत्येक नवा दिवस म्हणजे हातात आलेलं नवं पान! ते जमिनीवर आहे तोवर माहीत नाही, पण हातात आल्यावर कळतं, दुरी-तिरी आहे की हुकुमाचा एक्का! पण मला नकोस तू, म्हणून त्याला नाकारता नाही येत. दिवस जसा आला आहे तसाच जगावा लागतो. 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20721205.cms

लेकाची आई

लेकीची आई वाचून बऱ्याच लेकीच्या आयां नी प्रतिसाद दिला आणि लेकाच्या आया मात्र हिरमुसल्या .एक लेकाची आई तडकलीच फोनवर . ' काय गं लेकीचंच कवतिक मुलाच्या आईपणाच्या काही भावनाचनसतात की काय ?' मी हसत म्हटलं , ' नाही गं पण मुलाच्या आईच्या भावना लेकीच्या आईपेक्षा वेगळ्या !' तीफुरफुरली , ' मग लिही तुलाही मुलगा आहेच की !' नवा भुंगा तिने लावून दिला आणि माझ्यातली लेकाची आईविचार करत राहिली 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19534332.cms

लेकीची आईआई होणं ही स्त्रीजन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका लेकीची आई होणं हे स्त्रीला अधिक समृद्ध करतं... एका मातेचा हा स्व शोध.... 

http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/ladies/-/articleshow/19299017.cms?

स्पीड...


सुपरफास्ट प्रवासाची भुरळ आता सा‍-यांनाच पडू लागली आहे. मात्र या सुपरफास्ट प्रवासामुळे प्रवासात डोळ्यांत साठवल्या जाणा‍-या चित्रचौकटी हरवत चालल्यात... 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर मस्त गाणी ऐकत जाण्याचा आनंद वेगळाच! असंच गाणं ऐकता ऐकता लक्ष स्पीडच्या काट्यावर गेलं ... स्पीड चक्क ११० होता. त्या ११०च्या स्पीडने धावणाऱ्या गाडीत पोटातले पाणीही हलत नव्हते. नुकताच फूड मॉलमध्ये खाल्लेला बटाटेवडाही पोटात शांतच होता. डोक्यावरचा एकही केस सकाळी नेमून दिलेली आपली जागा सोडत नव्हता. खिडकीबाहेरच्या एकाही फ्रेमवर नजर ठरत नव्हती आणि मुख्य म्हणजे ११०च्या स्पीडला असतानाही शेजारून अनेक गाड्या भन्नाट ओव्हरटेक करून जातच होत्या... 

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16982671.cms?

महाराष्ट्र टाइम्स २८ ऒक्टोबर २०१२

ट्रांझिट हॉल्ट

दिवस दिवस नुसते पळण्यात संपत आहेत वर्षभर घाण्याला जुंपल्यासारखं काम ... आणि मार्च एण्ड म्हणजे तरकहर होता अगदी टनओव्हर टार्गेट्स टॅक्स प्लॅनिंग ...! एप्रिल उजाडला ... फ्री नाही म्हणता येणार पणनिदान श्वासांची लय नॉर्मल आली इतकंच लँडिंग म्हणावं का याला ... नाही ... पुढच्या टेक ऑफआधीचाट्रांझिट हॉल्ट असावा आज क्लायंटची मीटिंग अचानक रद्द झाली आणि चक्क दिवसाउजेडी घरी परतलोय .कुणीच नाही घरात ...! बऱ्याच दिवसांनी विचार करायला आपले म्हणावे असे काही क्षण अवचित हातात !आणि हा विचार करता करता वर्षभरातील अनेक गोष्टी सिनेमा पहावा तशा नजरेसमोर येत जातात एकेकसीन डोळ्यासमोर तरळत राहतो ... एकामागोमाग एक ...!
.

.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12571246.cms

Saturday, May 11, 2013

सांग ना - काय हवं ?


उगवती शुक्राची चांदणी देशील की
अढळ ध्रुवतारा..
कवेत घेऊन येशील का माझ्यासाठी
तो बेभान उनाड वारा

कातरवेळंच दाटलेलं क्षितीज
आणून देशील
चांदणरातीचं चमचमतं आभाळ
पेलून घेशील

सागरातली उसळलेली भरशील का
ओंजळीत एक लाट
की हिरव्या शेतातली आणून देशील
नागमोडी एक वाट

आणशील का ते चंद्रबिंब
पूर्ण गोल पुनवेचे
आणशील कोवळे किरण
तांबूस पिवळ्या पूर्वेचे

गवताच्या पातीवरला दवबिंदू
अलगद झेलशील ?
डोळ्यांच्याच भाषेत माझ्याशी
नजरेनं बोलशील ?

घेशील का आणाभाका
देशील का वचन
अबोल भावनेतही माझं
वाचशील का रे मन
.
भारावल्या सारखा तिच्याकडे तो
पाहात उभा राहिला
पहिल्या रात्रीच उभ्या संसाराचा
चित्रपट त्याने पाहिला
.
.
पुन्हा कधीच त्याने तिला
"काय हवं"- प्रश्न विचारला नाही
कवयित्रीशी झालं होतं लग्न
तो कधीकध्धीच विसरला नाही

- अनुराधा म्हापणकर

Saturday, April 6, 2013

पापणीस ओल नाही


मतलबी जगी या, आसवास मोल नाही
कुणाच्याच कुणासाठी, पापणीस ओल नाही

मना शोधिसी का, अर्थ नात्यांचा, व्यर्थ आहे
हे लावणे जीवाचे, जरी वाटे की फोल नाही

फुका लाव आशा, तेथ, भेटली निराशा
संभाळ रे मनाला, की ढळणार तोल नाही

डोळ्यांस जे दिसे ते, मायावी डोह सारे
परी उथळ सर्वकाही, काहीच खोल नाही

जगणे तुझे नी माझे, बंदिस्त चौकटीचे
दुनियाच ही आताशा, राहिली गोल नाही
मतलबी जगी या, आसवास मोल नाही
कुणाच्याच कुणासाठी, पापणीस ओल नाही
- अनुराधा म्हापणकर 

Saturday, February 9, 2013

बॅक टू स्कूल !

२२ वर्षांपूर्वीचे तेच चेहरे. फक्त घट्ट वेण्यातल्या मुलींच्या बाया झालेल्या आणि खाकी हाफ चड्डीतल्या मुलांचे बापे..पण ते दोन-तीन तास आम्ही त्या कॅन्डललाइटच्या मंद प्रकाशातल्या रेस्तराँमध्ये नव्हतोच. आम्ही होतो आमच्या दहावीच्या वर्गात..!

http://www.loksatta.com/chaturang-news/back-to-school-57443/

Sunday, January 13, 2013

कितीही म्हटलं तरी.....!!


कितीही आणलं उसनं अवसान जरी
कितीही ठेवलं मनानं अवधान तरी

कितीही जपली डोळ्यात तेल घालून
समजूत आपली घातली बोलून बोलून

कितीही सांगितल्या धीराच्या चार गोष्टी
कितीही म्हटलं ठेव चहुवार चौकस दृष्टी

कितीही जरी दिले युक्त्यांचे कानमंत्र
स्वरक्षणाचे कितीही शिकवले जरी तंत्र

कितीही म्हटलं, घाबरायचं काही कारण नाही
कितीही म्हटलं, कोणाला जायचं शरण नाही

कितीही मी म्हटलं तरी…
नाक्यावरच्या वाण्याकडेही आता
तुला पाठवायची वाटते भीती
काय सांगू, तुला कसं सांगू पोरी
सभोवार लांडगे कोण आणि किती

कुठवर तुला मी असं पदराआड जपणार
कुठवर अशी माझ्यापाठी पोरी तू लपणार

लाज भीतीचं बंधन तुला मोडायला हवं
लढ गं ! .. स्वत:साठी तुला लढायला हवं..
लाळ गळणा-यांचं थोबाड फोडायला हवं
आता फक्त त्या लांडग्यानीच रडायला हवं..

हं !! माझ्या आईपणाच्या बेडीलाही
मी आता तोडायला हवं….
पण.. शेवटी…
कितीही म्हटलं तरी ………. !!

: अनुराधा म्हापणकर

Wednesday, November 7, 2012

रुसलेले शब्द..

हल्ली शब्द रुसलेले असतात
माझ्याशी फारसे बोलत नाहीत

समजतात काय स्वत:ला, म्हणत
एकदा मुसक्या बांधूनच आणलं
आणि एका ओळीत नेऊन ठेवलं
अगदी माझ्या समोरच बसवलं ..
पण ते अति शहाणे..
म्हणाले, कस्सं फसवलं..

मारुन मुटकून आणलंस तरी
आम्ही बोलणार नाही
कवितेत तुझ्या मुळी म्हणजे
मुळीच फुलणार नाही

काय करु तेव्हा पासून मी
शब्दांना शोधत फिरत असते 
भेटले तर त्यांना नक्की सांगा 
त्यांच्यासाठी मी झुरत असते 

Tuesday, July 24, 2012

सुखाच्या शोधात


कुठे आहे निखळ सुख
कुठे शोधावं त्याचं कारण
नक्की कुठल्या दु:खाला
ठेवावं त्यासाठी तारण
कुठल्या आनंदाचं बांधावं
पापणीच्या दारी तोरण
नक्की कुठल्या भावनेचं
थांबवायला हवं मरण
कुठल्या देवादिकांना जावं
त्या सुखासाठी शरण
कसं आणि कशाने घालावं
वाहत्या आसवाला धरण
कुठल्या रातीच्या स्वप्नांला
वास्तवात मागावं आंदण
कुठल्या आशा अपेक्षेचं
नयनी रेखाटावं कोंदण
कुठेतरी ते नक्कीच आहे
कुठल्यातरी फुलांत, बागडणा-या मुलांत
कुणाच्यातरी जगण्यात, कुणाच्यातरी मानण्यात
आहे ते आहे…
सुख कुठेतरी जवळपास..
नक्कीच आहे सुख कुठेतरी जवळपास..

अनुराधा म्हापणकर

उध्वस्त !

.
उध्वस्त मन..
युद्धात बेचिराख झालेल्या शहरासारखे
मनात सर्वभर भग्नावशेष..
जळून गेलेल्या काळ्याकुट्ट घरांसारखे
एकदोन अस्वस्थ विचार रांगणारे
बेचिराख शहरात वाचलेल्या एकदोघांनी
उठण्यासाठी धडपडावं असे
.
.
ते एकदोन विचार आता जगवायला हवे
बेचिराख शहरातल्या माणसांना
उठवायला हात द्यावा तसे
ते बेचिराख शहर ....
पुन्हा वसवायला हवंच ना !!
.
अनुराधा म्हापणकर

Friday, June 29, 2012

मेणबत्ती
तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं

तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं

तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं  तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस

जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!

माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!

अनुराधा म्हापणकर

Monday, June 18, 2012

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला


घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला


चाले कशास आता हे श्वास मोजणे की
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला


शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला


ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला


अनुराधा म्हापणकर

Wednesday, January 11, 2012
मिळूनही सारं हुकल्यासारखं
कुठं तरी सारं चुकल्यासारखं

सा-या सुखातही - काही दुखणारं
राहून राहून काहीसं रुखरुखणारं

अनाकलनीय गूढ कुठलीशी उणीव
सल काट्याचा - दुखरीशी जाणीव

आता कुठेशी एक वेदना तुटणारी
आर्त मनाची भावना तटतटणारी

सारं सारं असूनही नसलेलं
सर्वकाही जमूनही बिनसलेलं

सुख म्हणावे की आभासाचे वलय हे
कळते ना कळते...गुंतता हृदय हे

Wednesday, December 29, 2010

आयुष्याच्या मध्यभागीरसिकहो..

८४ व्या साहित्यसंमेलनाच्या प्रकाशन मंचावर, माननीय अध्यक्ष श्री. उत्तम कांबळे व सुप्रसिद्ध संगीतकार श्री. कौशल इनामदार यांच्या शुभहस्ते, माझा पहिलाच काव्यसंग्रह .. "आयुष्याच्या मध्यभागी...." प्रकाशित झाला.

तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या साध्या प्रसंगावर बेतलेला हा काव्यसंग्रह तुम्हाला नक्की आवडेल.

किंमत: रुपये ऐंशी फक्त

तुमची प्रत राखून ठेवली आहे.. !
संपर्क : ०९८६९३४६१५१

Friday, December 24, 2010

ll आमंत्रण ll

मराठी साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या रसिकांची मांदियाळी, साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने भरते. हेच औचित्य साधून, " १४ विद्या ६४ कला " ही संस्था, ठाणे येथे संपन्न होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या मंचावर, एका प्रतिभावान कवयित्रीचा पहिला कवितासंग्रह - " आयुष्याच्या मध्यभागी ... " प्रकाशित करीत आहे. सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या " आयुष्याच्या मध्यभागी…. " ह्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहातून पुस्तकरुपाने प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहेत ! 

ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, सुप्रसिद्ध संगीतकार, कौशल इनामदार ह्यांच्या हस्ते होईल.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर, ह्या आपल्या शिल्पकार पतीच्या कला-व्यवसायात व्यावहारिक बाजूचे समर्थ व्यवस्थापन करतात. परंतु, कामाच्या वाढत्या व्यापात, शालेय जीवनापासूनची " कवितेची वही " मात्र एव्हाना, माळ्यावर सुखे-समाधाने नांदू लागली होती. तरीही, मनाच्या कोप-यात रुजलेली एक हळवी कविता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याच अस्वस्थतेतून एक दिवस एक कविता, इंटरनेटच्या माध्यमातून ऒरकुटच्या पानावर पोस्ट झाली.. आणि मग त्यांना तो छंदच जडला. यथावकाश, लोकसत्ता, प्रहार सारख्या दैनिकांतून, सौ. अनुराधा म्हापणकर, कधी काव्यरुपांत, तर कधी आपल्या लेखांतून वाचकांच्या भेटीस येत राहिल्या. ह्या काव्य संग्रहास, सुप्रसिद्ध गीतकार, गुरु ठाकूर ह्यांची प्रस्तावना लाभली आहे.

" आयुष्याच्या मध्यभागी .... "
कवयित्री : सौ. अनुराधा म्हापणकर 
प्रकाशक : १४ विद्या ६४ कला 
प्रकाशन स्थळ : ८४ वे मराठी साहित्य संमेलन, ठाणे 
प्रकाशन समारंभ : २५ डिसेंबर २०१०, सायंकाळी ५ वाजता.
संगीतकार कौशल इनामदार ह्यांच्या हस्ते प्रकाशन..... 


Tuesday, November 2, 2010

"कविते"साठी काय हवं ?

मूठभर ठसठसती वेदना,
पसाभर हळव्या भावना

पापणीभर ओले डोळे
थेंबथेंब आसवाचे तळे

काही मोकळे उसासे
काही कोंडले जरासे

जगण्याचा वेडा ध्यास
अप्राप्यसे स्वप्न भास

चिमूटभर सुखाचे कण
ठेवणीतले आनंद क्षण
.
.
ओंजळभर शब्दांना,
ह्या सा-यात मुरु द्यावं
"कविते"साठी वेगळं,
आणखी काय हवं ?..

.
अनुराधा म्हापणकर

Friday, October 15, 2010

कधी भेटूया गं?

खूप दिवसांनी जुन्या मैत्रिणीचा फोन आला. माझा किंवा आमच्या लग्नाचा वाढदिवस नसतानाही तिचा फोन आला तेव्हा नंबर बघून थोडं आश्चर्यच वाटलं. ‘सहजच असेल ना..? की..?’ अशी शंकेची पालही चुकचुकली. फोन उचलल्यावर तिचा तितक्याच उत्साहातलं नेहमीचं ‘हॅल्लो’ ऐकलं आणि जीव भांडय़ात पडला. ‘काय गं, असं अचानक?’ ‘हो गं, खरंच खूप कंटाळा आलाय. सकाळी उठायचं- डबा, जेवण, मुलं, दप्तरं, शाळा, लोकल, नोकरी- मरेपर्यंत कामाचं प्रेशर, पुन्हा लोकल, धावपळ, घर. पुन्हा स्वयंपाक, घर, नवरा, मुलं, त्यांचा अभ्यास! लाइफ में कुछ ब्रेकही नहीं! भेटूया ना गं
.
.


कधी भेटूया गं?

Thursday, September 9, 2010

बाप्पा म्हणाला, आठव टिळक
म्हटलं, गुगलवर बघू,
पटते का ओळख..

बाप्पाने मागितला, इकोफ्रेन्डली मखर
समजावत म्हटलं.. फॆड आहे रे सगळं
थर्माकोलच वापर

बाप्पाला हवी, शाडूची मूर्ती
छे छे.. म्हटलं, काहीतरीच !
अरे, नाजूक फार ती..

बाप्पाने म्हटलं, नको बॆन्डबाजा
मागवलाय म्हटलं त्याला
नाशिकचा ढोल ताशा

बाप्पा म्हणे, वीज जाळू नको फार
कशाला रे काळजी म्हटलं
जनरेटर्सही आहेत चार

बाप्पा वैतागला, लाऊडस्पीकर नको
आरतीचंच असेल रे रिमीक्स
अज्जिबात फिकर नको

बाप्पा म्हणाला उकडीचा मोदक हवा
म्हटलं, अरे चाखून पाहिलाय..
कालचाच आहे खवा

नवसाला पाव रे म्हणत,
त्याच्यावर नारळांचं तोरण चढवलं
पळ काढत म्हणाला बाप्पा
प्लॆस्टरच्या मूर्तीत माझं देवपणच हरवलं


: अनुराधा म्हापणकर

Wednesday, September 8, 2010

चेहरा

ओळखूनही, मला अनोळखी जो भासला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

आरशातही कितीदा, पाहुनी मला जो हसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

न ओळखता मी त्याला, थोडा जो हिरमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

अजाणता "स्व"हस्तेच होता मी जो पुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

"स्व" उमगले ना कधी, विचार त्याचा कसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

वाट पाहुनी अखेरी, स्फुंदुनी जो मुसमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

: अनुराधा म्हापणकर

साक्षात्कार..!!

बहुधा सुखाचा मला भार झाला
अन वेदनेचा, साक्षात्कार झाला

उफाळून आली जी होती तळाशी
कसा कोण जाणे, हा उच्चार झाला

होतेच जगणे चाललेले बरेसे
कोठोनी कळेना, हा चित्कार आला

अता उमजेना कसे तिस लपवू
कळे सर्व लोकी, हा बाजार झाला

सारेच जमले सांत्वनास माझ्या
उपदेश सल्ला - भडीमार झाला

राहिली वेदना ती बाजूस एका
उगा जीव माझा, हा बेजार झाला

पुन्हा बापुडीला कोंडले उराशी
कातावला जीव, थंडगार झाला

पुन:श्च आता, जगणे सुखाने
नव्याने सुखाचा, साक्षात्कार झाला

सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, September 2, 2010

पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवारपूर हा प्रकोप सारा, कोसळतो रे कान्हा
तुजवाचूनी व्याकूळ रे, देवकीचा पान्हा

यशोदेला दावी पुन:, विश्वाचे ते रुप
तुजसाठी साठविलेले, दही दूध तूप

वृंदावनी राधा झुरते, ख-या प्रीतीसाठी
एकवार लाव कान्हा, सानिकेस ओठी

शंभर येथ दु:शासन, अन सहस्त्र ते दुर्योधन
भरसभेत किती द्रौपदीचे, नित्याचे वस्त्रहरण

कुरूक्षेत्री पुन्हा आज, महाभारत पेटले
असुर-कौरवाचे सैन्य, रणांगणी लोटले

घे धाव पुन्हा कान्हा, दे छाया तो गोवर्धन
असुरांना मारण्याला, सोडी चक्र ते सुदर्शन

उद्धारण्या विश्वा, ये श्रीविष्णुचा अवतार
पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवार


: अनुराधा म्हापणकर

Tuesday, August 31, 2010

कितितरी दिसांत तो, आज दिसला ग बाई

कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
पानांआडून खट्याळसा
आज हसला ग बाई

..................त्याच्या येण्याने ग अशा
..................उजळल्या दाहि दिशा
..................त्रिभुवनाची बघ कशी
..................हसली ग रेषा रेषा
.
काळा काजळी काळोख
त्याने पुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................सखे, मनात ग तुझ्या
...................भलभलते विचार
...................नाव कुणाचे पुसशी
...................उगा असे वारंवार
.
बघ तोही मजवरी
आता रुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................डोंगराच्या पलिकडे
...................त्याचे आहे एक गाव
...................तुझ्या कानात सांगते
...................गडे "सूर्य" त्याचे नाव
.
एक माणूस कस्सा ना
आज फसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
.
अनुराधा म्हापणकर
ऒगस्ट २८, २०१०
A Bright Sunny Day
after a Long time, in Mumbai !

Thursday, August 19, 2010

एक उसासा फक्त


एक उसासा फक्त

बरंच काही बोलून गेला

किती हळव्या भावनांना

एका श्वासावर तोलून गेला


.

आता शब्दांना काही

बोलणे स्फुरलेच नाही

तरी ते बोलिले बापुडे

अर्थ त्यात उरलेच नाही


.

विरला तो उसासा हवेत

उगा श्वासात बोटे खुपसू नका

पसरले शब्द - भास खोटे

उगा भाव त्यातूनी उपसू नका


.

सारे आता शांत संथ

श्वासांनाही साधलेली लय आहे

शब्द आणि श्वास… !

त्यांची रोजचीच ही सवय आहे


.

अनुराधा म्हापणकर


Wednesday, August 18, 2010

श्रावण..!


उन्हे उलटता, सांजवेळी
श्रावण ओल्या घनात
दाटून आले आभाळ सारे
पावसाच्या काय मनात


रिमझिम रिमझिम झिरमिरती
इवलेइवले तुषार
हळूच मागून खोडी काढी
वारा किती हुशार


उघडीप झाली मेघाआडूनी
तळ्यात चमचम बिंब
तिरिप कोवळी पिवळीपिवळी
पानांत टपटप थेंब


श्रावण सा-या चराचरांत
नवचैतन्याचा पूर
अलगद जैसे मनात कोणी
छेडत राही सूर


: अनुराधा म्हापणकर