Saturday, May 11, 2013

सांग ना - काय हवं ?


उगवती शुक्राची चांदणी देशील की
अढळ ध्रुवतारा..
कवेत घेऊन येशील का माझ्यासाठी
तो बेभान उनाड वारा

कातरवेळंच दाटलेलं क्षितीज
आणून देशील
चांदणरातीचं चमचमतं आभाळ
पेलून घेशील

सागरातली उसळलेली भरशील का
ओंजळीत एक लाट
की हिरव्या शेतातली आणून देशील
नागमोडी एक वाट

आणशील का ते चंद्रबिंब
पूर्ण गोल पुनवेचे
आणशील कोवळे किरण
तांबूस पिवळ्या पूर्वेचे

गवताच्या पातीवरला दवबिंदू
अलगद झेलशील ?
डोळ्यांच्याच भाषेत माझ्याशी
नजरेनं बोलशील ?

घेशील का आणाभाका
देशील का वचन
अबोल भावनेतही माझं
वाचशील का रे मन
.
भारावल्या सारखा तिच्याकडे तो
पाहात उभा राहिला
पहिल्या रात्रीच उभ्या संसाराचा
चित्रपट त्याने पाहिला
.
.
पुन्हा कधीच त्याने तिला
"काय हवं"- प्रश्न विचारला नाही
कवयित्रीशी झालं होतं लग्न
तो कधीकध्धीच विसरला नाही

- अनुराधा म्हापणकर