Tuesday, July 29, 2008

थांब ना रे..

.
शेवटचा थेंब डोळ्यात अजूनही बाकी आहे
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..

देऊन जा थोड्या जखमा-व्रण
आणखी थोडेसे व्याकूळ क्षण
थोडा विरह.. थोडी वेदना..
जीवाला आणखी थोडी यातना देऊन जा
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..


घेऊन जा हा बहर सारा
आणिक देहाचा हा शहारा
फुल कोमेजूदे थोडे आणखी..
निर्माल्य होउदे.. विसर्जनाला मग घेऊन जा
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..


घाई कसली.. वेळ फार नाही
खांद्यावर तुझ्या आता भार नाही
शेवटेचा श्वास एकच बाकी..
प्राण कुडीतून माझा अलगद सोडवून जा..
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..
.
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

टिपिकल बायको

.
वेडी ग वेडी.. किती काळजी करतेस
खरं सांगू.. हल्ली ना फारच अती करतेस
डोळ्याखाली बघ तुझ्या किती काजळी धरली
तारुण्याची आणखी पाच वर्षं- बघ तुझी सरली

कशाला इतके प्रश्न तुझे -
कुठे आहेस - कधी येणार
जेवलास.. की घरी जेवणार

कशाला भाराभर सूचना-
जपून जा बरं का.. गाडी सावकाश चालव
उशीर होणार असेल तर वेळच्यावेळी कळव
वाट पहाते - जेवायला थांबते
वाटेवर तुझ्या जीवाला टांगते

केवढं ते घाबरणं -
अग बाई - सर्दी झाली
काढा करून देऊ..?
अंग दुखतय की डोकं चेपू
डॉक्टरची अपॉइंटमेन्ट घेऊ..?

सतत आपलं अवती भवती
बावरल्या चेहर्‍यानं वावरायचं
कसं ग तुला कळत नाही
वेड्या भावनांना आवरायचं

नको ग अशी टिपिकल बायको म्हणून राहू
अनंतकाळची माता बनून तर कध्धीच नको येऊ

त्यापेक्षा एका संध्याकाळी ये ना प्रेयसी होऊन
लग्नाआधीचे ते नवथर क्षण ये ना पुन्हा घेऊन..!!
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

येणार ना परत..?

.
पेपर उघडला
माहितीची बातमी..
काल लाइव्ह पाहिलं टीव्ही वर
आज पेपरात स्टील फोटोज..
रोज नवे ठिकाण
स्फोटांची आणि मृतांची
संख्या बदललेली
हाय अलर्ट सगळीकडे..
आज कोणावर कोसळेल
हा मानव निर्मित प्रपात..?
.
चला .. फार उशीर झाला
९.०४ ची लोकल गाठायचीय
संध्याकाळी.. येताना.. ६.२४
पण.. येणार ना परत..?
की.. आज ही वीज..??
जाऊदे.. वाण्याची लिस्ट
घेऊन जायला हवी..
आणि येताना उद्यासाठी
भाजीही आणायला हवी..!!


:सौ. अनुराधा म्हापणकर

डिझास्टर मॅनेजमेंट

.
चला .. चला
उभारू नवे झोपडे.. नदीच्या सुकल्या पात्रात भरभर
चला .. चला
वाहुदे निर्माल्य सारे.. नदीचे थांबले ओहोळ निर्झर
चला .. चला
टाकू कचरा सडका.. गटाराचे उघडे झाकण
चला .. चला
भाग घेऊ "झोपडपट्टी बचाव" .. एक नवे आंदोलन
चला .. चला
बांधू रस्ता नवा - ढकलून नदीला अगदी अलगद
चला .. चला
बांधू एक नवा टॉवर .. बूजवून सारी ओली दलदल
चला .. चला
नव्या फ्लॅटचे बुकिंग- टॉवर मधे.. विसाव्या मजल्यावर
.
पाऊस आला- मुसळधार धो धो
पूर प्रपात… खवळला सागर
.
चला .. चला
ओबी वॅन चॅनेलवाल्यांची आली
चला .. चला
उतरू सारे लिफ्टने खाली
आणि सांगू व्यथा पूराची
ठेवू नावे पालिका प्रशासनाला

म्हणू.. एक सूरात सारे..
.
डिझास्टर मॅनेजमेंट फेल्ड..!!
डिझास्टर मॅनेजमेंट फेल्ड..!!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, July 24, 2008

हरवलेले ते क्षण

हरवलेले ते क्षण माझे - कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे - कुणी परत मला देईल का..

हरले मी - हरवले मी - माझे मला कळलेच नाही..
कळले तेव्हा - मला जेव्हा - माझी मी उरलेच नाही
हरलेले ते मी पण माझे कुणी परत मला देईल का
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

जळले मी - गळले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - राख जाहली - पुन्हा मी उठलेच नाही
राखेचा तो कणन कण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

झुरले मी - कुढले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - वसंतातही जेव्हा पुन्हा मी फुललेच नाही
वसंत बहराचा तो एक सण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

रुसले मी - मुसमुसले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - डोळ्यानाही तेव्हा रडायचे सुचलेच नाही
अश्रुचा तो थेंब शेवटला कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

काव्य माझे मरूनि गेले - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - दु:खातही जेव्हा काव्य मला स्फुरलेच नाही
शब्दांची ती अखेरची गुंफण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

सांज सरली - रातही सरली - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - पहाटेनेही तेव्हा दव बिंदू शिम्पडले नाही
पहाटेचा ओलावा दवाचा - कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

सरले संपले - सारे काही - माझ्यापाशी उरलेच नाही
श्वासही संपला-थांबले स्पंदन-हृदय पुन्हा धडधडलेच नाही
संपलेले आयुष्य माझे कुणी परत मला देईल का..?
मला जगायचय हो पुन्हा - कुणी जन्म मला देईल का..??


:सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 22, 2008

एकावर एक फ़्री...!!!!

.
आज मॉल मधे गेले..
का..?.. उगाच...??

बाहेर पोस्टर लावलं होतं..
एकावर एक फ़्री..
असंच काहीस लिहिलं होतं..

तशी एकाचीही गरज नव्हती..
पण..त्या क्षणी अक्कल गहाण होती..

आत शिरले.. फिर फिर फिरले..
काही बाही.. असेच..
काहीच अडले नसलेले
घरात त्यातले थोडे
आधीच पडले असलेले

घेतले सारे..
काही एकावर एक
काही दोनावर एक

एकच त्यातल्या त्यात
हवी असलेली वस्तू..
जी दोनावर एक फ़्री म्हणून
पहिल्या दोन्ही उगाच घेतल्या

जीवाच्या आकांताने सरकवली ट्रॉली
भरमसाठ बील.. क्रेडिट कार्डं वापरली

बाहेर पडले.. पिशव्या संभाळत..
उरा पोटावर ती ओझी पकडत..
.
.
गल्लीच्या तोंडावर.. माझे वाण्याचे दुकान
बिच्चारा.. !!!!
एका फोनचा अवकाश.. घरपोच द्यायचा मला..
अगदी अर्ध्या तासात.. !!
हं... पण एकावर एक फ़्री नाही ना दिलं त्याने कधी..!!!
.
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, July 20, 2008

ओढ तरी ती पूर्वीचीच

.
सरत्या वयाचं ओझं
हिशोब मांडत बसलोय
सरणात गेली लाकडं
तरी अजून भांडत बसलोय

आताशा भांडणाला पण
पूर्वी सारखा रंग चढत नाही
मी तुझ्याशी - तू माझ्याशी
पूर्वी सारखे आता लढत नाही

दातांची कवळी निसटेल म्हणून
शब्द तोंडातून निसटत नाही
कवळी ठेवावी काढून तर
शब्दच नीट उमटत नाही

तरीही काही निरर्थक
अखंड बडबडत रहायचं
माझ्या कुठल्याही प्रश्नाला
तू कुठलही उत्तर द्यायचं

गुढगे दुखी, सांधे दुखी..
जाड भिंगांचा चष्मा
बोचरी थंडी, निसरडा पाऊस
सहन होईना उष्मा

आजही तरी दुखलं खुपलं
मला तू आणि तुला मीच
स्वर्गाच्या उंबरठ्यावर दोघे
ओढ तरी ती पूर्वीचीच


: सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, July 19, 2008

सुखसुद्धा बोचतं.........

जास्त झालं की
सुखसुद्धा बोचतं
जागेपणी झोपेतही
सुईसारखं टोचतं

ओसंडून वाहिलेलं सुखसुद्धा
जीवाला मानवत नाही
सुखाचही होतं ओझं
मनाला ते पेलवत नाही..

काही हवं असतं उगाच
मनात कुठेसं खुपणारं
भाजलेल्या फोडासारखं
आतल्याआत ठुसठुसणारं

एक हवी असते हुरहुर
काळजी काही चिंता
थोडा उगाचच आयुष्याचा
वाढवायचा असतो गुंता

झेपेल इतकी जीवालाही
हवीच असते यातना
सुखाला तोलून धरेल
इतकी हवीच एक वेदना

तेव्हाच कुठे संवेदनेला
सुखाची ओळख पटते
आणि वेदनाही सुखाचे
मग वस्त्र नेसून नटते..

: सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 15, 2008

बॅंड-एड

.
माझ्या हातून झालेली जखम
भळभळत ठेवण्यातच किती आनंद मिळतो ना तुला..
नाही म्हणता नाहीच खपली धरू देत तू त्यावर..
स्वत:च्याच हातानं वर मीठ चोळत असतोस अजून..
मी फुंकर मारलेली तरी कुठे चालते तुला..?
.
पण त्या एका जखमेच्या बदल्यात
तू दिलेल्या अनेक जखमांचा हिशेब मी ठेवते कुठे..
त्या जखमा कधीच भळभळतानाही दिसत नाहीत
मुकाट सोसताना डोळ्यातून अश्रुही वाहत नाहीत
पदराखाली झाकून घेते मी एकेका व्रणाला
त्यावर खपली धरते की नाही.. माझं मला तरी कुठे कळतं..
मी आपली बॅंड-एड घेऊन तुझ्या मागे मागे फिरत असते ना..
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

ई-मेल..

उजवीकडे तारीख..
मग मायना..
नंतर मजकूर..
बुद्धीबळातल्या उंटासारखा
तिरका वाकडा धावणारा..
तसं बर चाललय आयुष्य
असं पानभर सांगणारा..
खाली डावीकडे लिहिलेलं
कळावे.. लोभ असावा..
तळटीप.. ता.क. उगाच..
काहिसं निरर्थक.. पण
पत्राचा स्कूल पैटर्न पूर्ण करणारं..
.
.
आज ती सारी पत्र..
कपाटातून बाहेर सांडली..
आणि.. समजलं
त्या निरर्थक भावनेलाही
किती अर्थ होता..
त्या पत्राला सखे,
तुझ्या हाताचा स्पर्श होता..
.
.
आज सातासमुद्रापलिकडून
रोज येतात तुझी फ़ॉर्वर्डेड ई मेल्स
पण.. त्यात.. तू कुठे ग दिसतेस..
.
ह्याला विज्ञानाचा
शाप म्हणावं की वरदान..
संभ्रमात मी आहे थोडी..
निर्णय पक्का झाला की..
मीही तुला ईमेलच करणार आहे..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, July 11, 2008

मागणं..

ज्यावर माझी ही अचेतन काया..
हे अंथरूण आहे की मृत्यु शय्या..?

की मला पांघरलेल्या चादरीतच
अडकलाय माझ्या कुडीतला प्राण
न जाणो किती वर्ष सरली इथेच
हा शय्येवर खिळलेला देह निष्प्राण

अर्ध्या देहाची जळून गेली संवेदना
आणि जळत्या मनाच्या असह्य वेदना

त्या खिडकीच्या छोट्या चौकटीतून
बाहेर दिसणारं ते तुकडाभर आभाळ
तिथेच डोळे लावून बसतो मी रोज
कोण जाणे असच, अजून किती काळ

करणारे सेवा करतात.. मेला जीव जगवतात..
माझा जीव जगवताना स्वत:चा जीव मारतात

पण हे न येणारं मरण आता नाही सोसवत..
लेकाचं हे तीळ तीळ मरणं आता नाही बघवत

पुरे झालं रे श्रावण बाळा.. पितृ ऋण सारं फेडलस
इतकी केलीस सेवा ..की बापालाच ऋणात ओढलस
.
.
एकच दान मागतो.. माझं अखेरचं मागणं..
देता आलं तर देऊन जा- इच्छा मरणाचं देणं..

:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर

एक निळं आभाळ..


एक निळं आभाळ..असं तुझ्या डोळ्यात आलं दाटून
की समुद्राची निळाई तुझ्या डोळ्यात गेली साठून
चवसुद्धा तीच खारट त्या निळ्याशार पाण्याची
का अशी ओढ त्याला अविरत वहात रहाण्याची
लाटामागून लाटा.. ही भरती ग कुठली..
पटली ग पटली- तुझ्या प्रेमाची खूण पटली


चला.. जा बाई..
डोळे पुसायचं निमित्त
सारखे गालाला करताय स्पर्श..
साखरपुडा केला आता
आणि लग्नाला लावताय वर्ष..


अग हो.. हो.. हो.. किती अधीर उताविळ होशील..
आजची आठवण म्हणून, सांग ना ग- मला काय देशील?


इश्य... काहीतरीच आपलं तुमचं.. हट्ट धरून बसायचं
लग्नाआधीच तसलं काही- मला नाही बाई जमायचं..

वेडे.. तुझ्याच मनात येतात- विचार असले खट्याळ
मी मागतोय फक्त तुझ्या डोळ्यातलं निळं आभाळ
टिपलेस ज्याने अश्रु.. आणि पुसलेस ज्याने गाल
जाताना देऊन जा तुझा तो -सुगंधी हात रूमाल
.

.
: सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, July 3, 2008

ब्युटी-पार्लर...

ती कळकट थोडी.. रापलेली उन्हाने..
असावी गव्हाळ ती .. मूळची रंगाने..
दोन्ही डोळ्याखाली.. वर्तुळं काळी..
चेहर्‍यावर सुरकत्यांची अस्पष्ट जाळी..
केससंभार गुंतलेला.. भुरभुरलेला..
दुष्ट वार्‍याने पार विस्कटलेला..
एक मळभ तिच्या अस्तित्वावर दाटलेली
की धूळ होती ती.. तिच्यावर साचलेली..?

.
ब्युटी पार्लर नावाच्या पाटीखाली ती शिरली..
आणि उन्हात चांदणं पडावं तशी बाहेर पडली..
.
मळभ दूर झालेली.. की धूळ होती झटकलेली..
स्वच्छ ऊन पडावं तशी लख्ख ती उजळलेली..
वळणदार कमानीखाली.. दोन टपोरे डोळे..
दिसेनासे झाले.. सुरकुत्यांचे अंधुक जाळे..
केस मऊ शार सुंगधी.. वार्‍याला न भिणारे..
गालावर बट एखादी.. बाकी मानेवर रेंगाळणारे
.
ती.. आता एका विचारात फक्त..!
मनावरची मळभ थोडी दूर व्ह्यायची राहिलेय..
विचारांवर साचलेली धूळ थोडी झटकायची राहिलेय..
आता कुठे जावं बरं...?

:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर.