Wednesday, August 6, 2008

न्युक्लीअर फॅमिली



माणसं हवीशी वाटली कधी तर आरशात स्वत:ला पाहतो
कारण आम्ही किनई .. एका न्युक्लीअर फॅमिलीत राहतो

आमचा एकुलता एक आणि आम्ही दोघं- राजाराणी..
मस्त मोकाट भांडू शकतो अडवायला नाही कोणी..

एकदाच सकाळी डायनिंग टेबलवर चहासाठी होते भेट
अगदीच काही अर्जंट असेल तर- असतच ना इंटरनेट..

मुलाला शुभंकरोति शिकवायला आजी आजोबा नसतात
टिव्ही कॉम्प मोबाईल आय पॉड सोबत त्याला करतात

स्वत:भोवती गुरफटलेलं विश्व आमचं.. नाही जमत शेअरिंग
आजारपणात एकमेकांना जपतो ना.. तेवढेच आम्ही केअरिंग

कध्धीतरी मूड आला तर आमच्या घरातही होतो स्वैंपाक
नाहीतर इंस्टंट फ़ास्ट फ़ूड पार्सलचा रोज असतो खुराक

तस्सं कध्धीच कोणी आमच्याकडे येत जात नाही..
शेजारीसुद्धा उघड्या दारातून डोकावून पाहात नाही

वाढदिवस.. लग्न.. फॅमिली सोहळे.. तिथे सगेसोयरे असतात
रक्ताच्या नात्याचे बदललेले चेहरे खूप दिवसांनी तेव्हा दिसतात

तेव्हा मात्र गप्पा मारायला तो अख्खा दिवस पुरत नाही
देशाच राजकारण.. शेअर बाजार एकही विषय उरत नाही

एकमेकांची मुलं "कितवीत"? .. इतकी आवर्जून मात्र चौकशी
आमच्या घरी एकदा अवश्य या.. आमंत्रणेही होतात अशी..

पार्टी संपली पाटी कोरी.. लैचकीने दार उघडायचे
आत येतानाच सारे सगेसोयरे दाराबाहेरच सोडायचे

दारापलिकडे आपलं घर.. एक त्रिकोणी कुटुंब त्यात वसलेलं
खरतर लॉजिन्ग बोर्डिंग फक्त.. फ़ाइव्हस्टार अमेनिटीज असलेलं

न चुकता आत शिरताच.. टिव्हीचं बटण ऑन करायलाच हवं..
न्युक्लीअर डीडचं काय झालं.. आपल्याला बुवा कळायलाच हवं..!
.
.
:एका न्युक्लीअर फॅमिलीत.. मीही..!
:सौ. अनुराधा म्हापणकर