Sunday, February 28, 2010

मराठी असे आमची मायबोलीप्रहार : कोलाज : २८ फेब्रुवारी, २०१०
http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=20167&boxid=23442593

Sunday, February 21, 2010

किक..!

त्याने किक मारली
त्याची बाईक फुरफुरली
ती डौलाने स्वार होत
अख्खी त्याच्यावर रेलली

आज कुठे.. कुठला नवा बीच
की खडकामागची जागा- ठरलेलीच

ती अधिकच लाडात आली
हातांची मिठी घट्ट झाली
त्याचेही बाहू फुरफुरले
बाईकचे हॊर्न्स गुरगुरले

अंगी भिनले वारे - भन्नाट
वा-याच्या वेगाने - सुस्साट

ओळखीचे रस्ते धुसर झाले
नवे रस्ते अंगावर आले

फुल्लटू धूम स्पीड………!
तेवढ्यातच -
करकचून लागलेले ब्रेक्स..!
काचांचा चक्काचूर..
फाटलेला स्कार्फ..
दूर उडालेलं हेल्मेट ..!
………….
आणि क्षणात थांबलेलं सारं…. !!
.
.
तिची आई मात्र काही ऐकून घेत नाही
सारखं आपलं एकच… कॊलेजला गेलीय..
आज एक्स्ट्रा लेक्चर आहे, म्हणाली
येईलच एवढ्यात !!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, February 15, 2010

अगतिक..

हातातून एकाएकी सारं निसटावं
तसं सारं सुटून जात होतं
पायातलं सारं बळ गळून जावं
तसंच तिला वाटत होतं

भरल्या नजरेतून पाणी वाहिलं
त्याक्षणीही तिला आठवत राहिलं
.
.
तिच्या बाळाचं बारसं - त्याचं बालपण
असामान्य हुशारीने चमचमणारं शिक्षण
त्याच्या सर्वांगिण वाढीसाठी
तिने वेचलेला आयुष्यातला क्षणन क्षण
त्याच्यासाठी अहोरात्र झटताना
तिचं स्वत:च झिजून जाणं कण कण
सदैव यशाच्या शिखरावर असताना
त्याच्यात प्रयत्नपूर्वक जपलेलं माणूसपण

तिने घडवले त्याला.. सुसंस्कारही दिले..
फक्त.. "अपयश कसं पचवायचं ?"
हे शिकवायचे मात्र राहून गेले.......
.
.
आता मांडीवर त्याचं थंड होत चाललेलं डोकं..
आणि हातात त्याचं रक्ताळलेलं मनगट धरून
बसली आहे अगतिक.. हॊस्पिटलच्या वाटेवर... !!!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

तिची अट ..


आज पुन्हा कांदे पोहे..
गुण जुळलेली पत्रिका
स्वैपाक नोकरी आवडीनिवडी
मॊड्युलर प्रश्नपत्रिका

ती पुन्हा साडी सावरत
वाफाळणारा चहा घेऊन
प्रत्येक प्रश्नाला तिचं उत्तर
नजरेला नजर देऊन

देखणी हुशार शिकलेली
नोकरी कायम पगारी
गृहकृत्यदक्ष अदबशीर
ती सुसंस्कृत व्यवहारी

अघळपघळ गप्पांत
चहाचा कप सरला
"पसंत आहे मुलगी"
त्यांनी ’हो’कार भरला

तिचा चेह-यावर तटस्थ
को-या निर्विकार भावना
डोळ्यात होती अस्पष्ट
खुपणारी एक वेदना
.
.
"विचार करुन कळवतो"
ते म्हणाले, बैठक उठली
अपेक्षित तिला होते तशी
गाठ जुळताजुळता सुटली
.
.
.
ध्यानीमनी तिच्या नसता
त्या रात्री अघटीत घडलं
तिच्या विधवा गरिब आईने
स्वत:ला संपवून टाकलं

जाता जाता इतकंच म्हटलं
"लग्न करुन सुखी हो बाळा..
माझ्या जबाबदारीतून तुला मी
आता कायमचं मोकळं केलं......"


: सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, February 14, 2010

"व्हॆलेन्टाईन डे"..