Wednesday, November 7, 2012

रुसलेले शब्द..

हल्ली शब्द रुसलेले असतात
माझ्याशी फारसे बोलत नाहीत

समजतात काय स्वत:ला, म्हणत
एकदा मुसक्या बांधूनच आणलं
आणि एका ओळीत नेऊन ठेवलं
अगदी माझ्या समोरच बसवलं ..
पण ते अति शहाणे..
म्हणाले, कस्सं फसवलं..

मारुन मुटकून आणलंस तरी
आम्ही बोलणार नाही
कवितेत तुझ्या मुळी म्हणजे
मुळीच फुलणार नाही

काय करु तेव्हा पासून मी
शब्दांना शोधत फिरत असते 
भेटले तर त्यांना नक्की सांगा 
त्यांच्यासाठी मी झुरत असते 

Tuesday, July 24, 2012

सुखाच्या शोधात


कुठे आहे निखळ सुख
कुठे शोधावं त्याचं कारण
नक्की कुठल्या दु:खाला
ठेवावं त्यासाठी तारण
कुठल्या आनंदाचं बांधावं
पापणीच्या दारी तोरण
नक्की कुठल्या भावनेचं
थांबवायला हवं मरण
कुठल्या देवादिकांना जावं
त्या सुखासाठी शरण
कसं आणि कशाने घालावं
वाहत्या आसवाला धरण
कुठल्या रातीच्या स्वप्नांला
वास्तवात मागावं आंदण
कुठल्या आशा अपेक्षेचं
नयनी रेखाटावं कोंदण
कुठेतरी ते नक्कीच आहे
कुठल्यातरी फुलांत, बागडणा-या मुलांत
कुणाच्यातरी जगण्यात, कुणाच्यातरी मानण्यात
आहे ते आहे…
सुख कुठेतरी जवळपास..
नक्कीच आहे सुख कुठेतरी जवळपास..

अनुराधा म्हापणकर

उध्वस्त !

.
उध्वस्त मन..
युद्धात बेचिराख झालेल्या शहरासारखे
मनात सर्वभर भग्नावशेष..
जळून गेलेल्या काळ्याकुट्ट घरांसारखे
एकदोन अस्वस्थ विचार रांगणारे
बेचिराख शहरात वाचलेल्या एकदोघांनी
उठण्यासाठी धडपडावं असे
.
.
ते एकदोन विचार आता जगवायला हवे
बेचिराख शहरातल्या माणसांना
उठवायला हात द्यावा तसे
ते बेचिराख शहर ....
पुन्हा वसवायला हवंच ना !!
.
अनुराधा म्हापणकर

Friday, June 29, 2012

मेणबत्ती
तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं

तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं

तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं  तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस

जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!

माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!

अनुराधा म्हापणकर

Monday, June 18, 2012

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला


घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला


चाले कशास आता हे श्वास मोजणे की
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला


शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला


ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला


अनुराधा म्हापणकर

Wednesday, January 11, 2012
मिळूनही सारं हुकल्यासारखं
कुठं तरी सारं चुकल्यासारखं

सा-या सुखातही - काही दुखणारं
राहून राहून काहीसं रुखरुखणारं

अनाकलनीय गूढ कुठलीशी उणीव
सल काट्याचा - दुखरीशी जाणीव

आता कुठेशी एक वेदना तुटणारी
आर्त मनाची भावना तटतटणारी

सारं सारं असूनही नसलेलं
सर्वकाही जमूनही बिनसलेलं

सुख म्हणावे की आभासाचे वलय हे
कळते ना कळते...गुंतता हृदय हे