Thursday, September 9, 2010

बाप्पा म्हणाला, आठव टिळक
म्हटलं, गुगलवर बघू,
पटते का ओळख..

बाप्पाने मागितला, इकोफ्रेन्डली मखर
समजावत म्हटलं.. फॆड आहे रे सगळं
थर्माकोलच वापर

बाप्पाला हवी, शाडूची मूर्ती
छे छे.. म्हटलं, काहीतरीच !
अरे, नाजूक फार ती..

बाप्पाने म्हटलं, नको बॆन्डबाजा
मागवलाय म्हटलं त्याला
नाशिकचा ढोल ताशा

बाप्पा म्हणे, वीज जाळू नको फार
कशाला रे काळजी म्हटलं
जनरेटर्सही आहेत चार

बाप्पा वैतागला, लाऊडस्पीकर नको
आरतीचंच असेल रे रिमीक्स
अज्जिबात फिकर नको

बाप्पा म्हणाला उकडीचा मोदक हवा
म्हटलं, अरे चाखून पाहिलाय..
कालचाच आहे खवा

नवसाला पाव रे म्हणत,
त्याच्यावर नारळांचं तोरण चढवलं
पळ काढत म्हणाला बाप्पा
प्लॆस्टरच्या मूर्तीत माझं देवपणच हरवलं


: अनुराधा म्हापणकर

Wednesday, September 8, 2010

चेहरा

ओळखूनही, मला अनोळखी जो भासला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

आरशातही कितीदा, पाहुनी मला जो हसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

न ओळखता मी त्याला, थोडा जो हिरमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

अजाणता "स्व"हस्तेच होता मी जो पुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

"स्व" उमगले ना कधी, विचार त्याचा कसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

वाट पाहुनी अखेरी, स्फुंदुनी जो मुसमुसला
दुसरा न कुणाचा, तो चेहरा माझाच होता

: अनुराधा म्हापणकर

साक्षात्कार..!!

बहुधा सुखाचा मला भार झाला
अन वेदनेचा, साक्षात्कार झाला

उफाळून आली जी होती तळाशी
कसा कोण जाणे, हा उच्चार झाला

होतेच जगणे चाललेले बरेसे
कोठोनी कळेना, हा चित्कार आला

अता उमजेना कसे तिस लपवू
कळे सर्व लोकी, हा बाजार झाला

सारेच जमले सांत्वनास माझ्या
उपदेश सल्ला - भडीमार झाला

राहिली वेदना ती बाजूस एका
उगा जीव माझा, हा बेजार झाला

पुन्हा बापुडीला कोंडले उराशी
कातावला जीव, थंडगार झाला

पुन:श्च आता, जगणे सुखाने
नव्याने सुखाचा, साक्षात्कार झाला

सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, September 2, 2010

पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवारपूर हा प्रकोप सारा, कोसळतो रे कान्हा
तुजवाचूनी व्याकूळ रे, देवकीचा पान्हा

यशोदेला दावी पुन:, विश्वाचे ते रुप
तुजसाठी साठविलेले, दही दूध तूप

वृंदावनी राधा झुरते, ख-या प्रीतीसाठी
एकवार लाव कान्हा, सानिकेस ओठी

शंभर येथ दु:शासन, अन सहस्त्र ते दुर्योधन
भरसभेत किती द्रौपदीचे, नित्याचे वस्त्रहरण

कुरूक्षेत्री पुन्हा आज, महाभारत पेटले
असुर-कौरवाचे सैन्य, रणांगणी लोटले

घे धाव पुन्हा कान्हा, दे छाया तो गोवर्धन
असुरांना मारण्याला, सोडी चक्र ते सुदर्शन

उद्धारण्या विश्वा, ये श्रीविष्णुचा अवतार
पुन:श्च घेई रे जन्म, हे कृष्णा एकवार


: अनुराधा म्हापणकर