Tuesday, December 23, 2008

शिट्टी.....!

.
धगधगतय.. की..
काहीतरी उकडतंय आत..?
कोंडलेली वाफ.. तप्त ज्वाळा
सोसवेना झाल्या ह्या उष्ण झळा
उकळतंय की शिजतंय रटारट
असह्य होतेय आता ही घुसमट
कसं आणि कुठून बाहेर पडावं
की उठावं आणि फुटून यावं..

"शिट्टी" वाजली..
गैस मालवला..
"कूकर" उतरला..
शांत झालं सारं..!!

धगधगत्या.. वाफाळत्या
तापल्या .. कोंडल्या..
घुसमटत्या मनाची मात्र
अजिबात "शिट्टी" होत नाही..
त्याला काय करावं..?
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

क्षणात.. फक्त अंधार.. !

काहीतरी विपरित घडतय..
जीव वाचवायचा एवढंच कळतय..
सगळीकडे माजलाय गोंधळ
जीवाच्या आकांताने धावपळ
सुसाट एक गोळी तेवढ्यात ...
माझाच वेध घेत येते..
नियती चुकत नाही
माझी हसत भेट घेते..
समोर येतात चेहरे
बायको माझी बाळं
आईवडील म्हातारे
दिसते मग रक्ताची धार
आणि क्षणात.. फक्त अंधार.. !
.
अस्पष्ट शुद्ध येते..
तिथेही धावपळ असते..
तो देवदूत येतो जवळ..
एकवटतो मी सारं बळ..
डॉक्टर मला वाचवा...
प्लीज- प्लीज- मला जगवा..
पण शब्द ओठातच थिजतात
तशातही पापण्या भिजतात..
पण कोणीही थांबत नाहीत
माझ्याकडे बघतही नाहीत..
बिनचेह-याचा एक आवाज येतो
"इथे काही होप्स नाहीत....
लीव्ह धिस केस.. पुढचा बघा.."
.
जड पापणी मिटत असते
उघडू म्हणता उघडत नाही
माझ्या मरणावर रडायलाही
माझ्याकडे वेळ उरत नाही..!!


सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, November 28, 2008

नोंद..!

माहीत नाही कुठे.. पण
होतेय नोंद माझ्या सत्कर्मांची..!

कुठल्याशा वहीत..
होतोय माझा पुण्यसंचय..!

एका अज्ञात पोतडीत
ठेवतंय हिशोब माझ्या जमेचा..
कुणी अकाउंटंट..!

माझ्यातलं माणूसपण
कुणाला तरी कळलंय..!

न विकलेल्या मूल्यांची किंमत
कोणीतरी केलीय..!

म्हणूनच फिरलेय कदाचित माघारी
त्या ठळक होत चाललेल्या सीमारेषेहून..
निर्धोक.. सुरक्षित..!!!


सौ. अनुराधा म्हापणकर

जमाखर्च

.
व्यवहार भावनांचा कागदावर सांडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

रक्तांचीच काही नाती
नवी काही जोडलेली
आतड्याच्या ममतेने
आतूनच ओढलेली

नात्यांचा नाजूक रेशमी बंध जोडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

घडली हातून सेवा
थोडा केला परमार्थ
जगण्याचा त्यात माझ्या
गवसला मला अर्थ

व्यर्थ अहंकार माझा स्वत:हून मोडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

खर्चले फक्त शब्द
गोड आणि मुग्ध
सुख भरुन वाहिले
सारे जमेत राहिले

समाधान तृप्तीचा घडा अखंड ओसंडला मी
आयुष्याच्या मध्यान्ही जमाखर्च मांडला मी

सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, November 24, 2008

बिनअर्थाचे काही शब्द

बिनअर्थाचे काही शब्द
माझ्याकडे आले एकदा
’मला कवितेत घे’ म्हणत
सा-यांनी लावला तगादा

कधी नव्हे ते स्पष्ट बोलले
म्हटलं-अज्जिबात नाही जमणार
निरर्थक बिनबुडाची कविता
मी कध्धी कध्धी नाही करणार

चिडले - रुसले- माझ्यावर
अगदी फुरगटूनच बसले
त्यातले काही शब्द तर
हट्टाने पेटूनच उठले

म्हणाले - बघ विचार कर
वापर तुझी सद्सदविवेक बुद्धी
नाहीतरी तुझ्या कवितांची
अलिकडे फार वाढलीय रद्दी

"कोंबडी पळाली लंगडी घालून"
"ढिपाडी ढीपांग"- ऐकलंस ना
निरर्थक शब्दांचेही होते गाणे
आणि त्यातही असते भावना

गीतकार होणे गाणे लिहिणे
तुला कध्धीच नाही जमणार
आयुष्यभर म्हणे फक्त फक्त
तू "कविता"च करत रहाणार..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, November 19, 2008

विलपॉवर..!

.
"शी इज क्रिटीकल"..!
काळजाचा ठोका चुकला..
कित्ती कित्ती सोप्पंय म्हणणं
वैताग आलाय जगण्याचा..
पण समोर येतं साक्षात-
तेव्हाच साक्षात्कार होतो
आपण आपल्या जगण्यावर
फार फार प्रेम करतो
दिसत रहातात भोवताली
अश्रू गिळलेल्या पापण्या..
भेदरलेली नजर पिल्लांची..
काही हरत चाललेले हात..!
.
मग जागी होते एक आंतरिक शक्ती
एक प्रबळ इच्छा.. जगण्याची उर्मी..
तीच ती .. विलपॉवर..!
खेचून आणण्याचं सामर्थ्य तिच्यात..!
आणि मग पुन्हा येतो तोच आवाज..
"आऊट ऑफ़ डेंजर नाऊ"..!!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

उत्तर..

.
का विचारतोस असं..
माझ्या डोळ्यात डोळे रुतवून..
अजूनही आवडतो का तुला मी?..
तेवढाच..!

तू म्हणालास..
विझलीस.. का निजलीस..?
मी मात्र.. पापण्याआड
तुझं रुप साठवत राहिले
तुझे माझे क्षण आठवत राहिले

उत्तर द्यायला क्षणात
उघडले होते रे डोळे..
थोडं थांबला असतास तर
माझ्या डोळ्यातच तुला
तुझं उत्तर मिळालं असतं..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

गर्ल फ्रेंड..!

.
सहा वर्षांचं पिल्लू माझं
खेळता खेळता मैत्रिणीला घरी घेऊन आला
आजोबा म्हणाले.. कोण रे ही..??
झटक्यात उत्तर..
माझी गर्ल फ्रेंड..!
कित्ती निरागस उत्तर..
’माझी मैत्रिण’ - या शब्दाचं भाषांतर फक्त..!
पण मला हसू आवरता आवरेना..
आणि त्याचं काय चुकलं
त्याला काही कळेना..
त्याच्या मैत्रिणीचा छान गालगुच्चा घेतला..
म्हटलं.. काही नाही रे.. पळा खेळायला..!!
.
.
थोडी वर्षं आहेत अजून
मग पुन्हा म्हणेल.. माझी गर्ल फ्रेंड..!!
.
त्यावेळी सुद्धा असंच हसू यायला हवं..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

सारे स्वत:चे..!!

.
पाण्याचा रंग घेतला
हवेचा संग घेतला

पाणी कसं मिसळतं कोणातही
हवा कशी गंध घेते कोणाचाही..

पण मग सरभेसळ झाली..
माझ्या सात्विक रंगात
भलतीच मिसळ झाली..

माझा दरवळ लपला..
भलताच दर्प आला

उगारलेल्या रंगाने
त्या उग्राट दर्पाने

जागी झाले
भानावर आले

पाण्याबाहेर आले
हवेला दूर केले


माझे अस्तित्व.. मीपण माझे
गंध माझा.. आणि रंग ही माझे
जगते घेऊन आता सारे स्वत:चे..!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

सी - सॉ.............

.
ते दिवस असे होते
आई बाबांबरोबर आम्ही बागेत जायचो..
घसरगुंडी.. सी-सॉ..
मग हिरवळीवर बसून सुकी भेळ खायचो..
आता ती बाग..
त्या बागेतली सारी हिरवळ सुकून गेलीय..
तो हलणारा सी-सॉ
ती झूम घसरगुंडी पार तुटूनमोडून गेलीय..
कारण आमची
रविवारची संध्याकाळ आता मॉलमधे हरवलीय
व्हिडीओ गेम.. सिनेमा..
पिझ्झा..आइसक्रीमची जीभेला चटक लागलीय
जगण्याची स्टाइल बदलली..
आणि आनंदाची व्याख्याही..!
मन कधी कधी
सी-सॉ सारखं हिंदकळतं...
दुखून कधीतरी
आतल्या आतच.. कळवळतं..
घसरगुंडीच्या एका बाजूने वर चढतोय..
का.... दुस-या बाजूने घसरत जातोय...
खरंच... कळतच नाही..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

Monday, November 10, 2008

एक पूर्ण वर्तुळ..

.
रशिया चायना.. आफ्रिका..
उत्तर आणि दक्षिण अमेरिका..
भूगोलाचे एकेक नकाशे
पोलपाटावर आकारता साकारता
कधी कंपास लावून गोल करावा
आणि त्रिज्या जुळाव्यात तश्शी
अगदी गोssल पोळी केली पहिली..
आणि मग...
शिकले.. लग्नाची झाले..
सारेच कसे जुळून येत गेले..
.
हल्ली.. माझी लेक..
पोलपाटावर असेच नकाशे काढू लागलीय..
तिला कित्ती म्हणते...
थांब ग राणी..! वेळ आहे ग अजून..!!
तरी.. किती घाई तिला..!!
एक वर्तुळ पूर्ण व्हायला पहातय..!
दुनिया गोल आहे म्हणतात.. म्हणूनच का?
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, November 1, 2008

जगण्याचा तो धागा

.
दिवस कस्सा..
धावपळ.. नुसती..
घाईगर्दी.. गडबड नसती..

चिवचिवाट मुलांचा
घरभर पसारा..
युनिफ़ॉर्म.. कज्युअल्स..
कपड्यांचा ढिगारा

रेशन.. प्रोविजन..
ठेवायचा चोख हिशोब सारा
डाळ तांदूळ भाजीपाला
ब्रेकफास्ट जेवणं-रेसिपींचा मारा

फडफडणारे पेपर्स
फ़ाइल वेळेवर करा
मख्ख चेह-याचे आकडे
रिटर्न्स वेळेतच भरा

विस्कटल्या घराची
पुन्हा पुन्हा लावते घडी
पाठ टेकवताना गादीवर
असते अर्धमेली कुडी
.
तुझ्या खांद्यावर मान
शीण सारा जावा सरूनी
विषय वासने पल्याड
असा तुझा स्पर्श संजिवनी

हक्काची एकमेव जगात
ती सिक्युअर्ड आहे जागा
पकडून चालते मी ज्याला
माझ्या जगण्याचा तो धागा
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

कारण..

.
.
काही अंतरी उमाळे
काही हुंदके उसासे
अडविले मी श्वासात
थांबलेले कसेनुसे

तुझे रोखुनी पहाणे
गळाले रे अवसान
विरघळूनी सांडले
कसे राहिले ना भान

आता कसं काय करु
अश्रू कसे रे आवरु
बांध फुटला तुटला
कसे स्वत:ला सावरु

काय करु मी बहाणा
चहुबाजूनी मरण
तुझ्या नजरेत प्रश्न
काय देऊ मी कारण

काय झाले काही नाही
डोळ्यामधे काही गेले
अश्रु आसवे नाही रे
डोळा पाणी थोडे आले
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

पायवाट..

.
आसवांना वाट करून दिली..
मनसोक्त म्हटलं वाहून घ्या एकदाचं..!
मग.. डोळ्यांनीच दटावलं त्यांना..
चिडत म्हटलं.. आता हे वाहाणं शेवटचं..!!
तेव्हापासून घाबरलेत..
डोळ्यांत आता त्यांची गर्दी होत नाही..
मात्र अलिकडे वरचेवर सर्दी होत असते..
कशाने?.. काही कळत नाही
नाकातून सूँ..सूँ.. करत
वहात रहातं पाणी.. अविरत
पोल्युशन हो!.. धुळीची अँलर्जी..!
मी बिनधास्त ठोकून देते..
.
पण कळलय कारण खरं..
अश्रूंनी.. त्यांची..
रोजची पायवाट बदललीय..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

शून्य..

.
.
मुखड्यातच ओंकार
पूर्णत्वाचाच आकार
तरीही अपूर्ण..
काहीच बाकी नसलेलं
कुणी हात धरला
तरच अर्थ...
नाहीतर अवघं
अस्तित्वच व्यर्थ..!!
.
तसंच काहीसं
माझंही अस्तित्व..
नादमयी ओंकारलेलं..
परीपूर्ण साकारलेलं..
तरीही..
तुझ्याशिवाय अपूर्ण..
तू हात सोडलास तर..
बाकी शून्य..
फक्त एक शून्य...!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, September 6, 2008

एक आस एकुलती..

तू मनांच्या कप्प्यात
तू स्वप्नांत सत्यात
एक बांधलेली वीण
तुझ्यामाझ्या रे नात्यात

तूच श्वास प्राणवायु
हृदयातले स्पंदन
तूच गंध रे कायेचा
तूच चंदन चंदन

तूच प्रिय प्राणसखा
माझ्या प्रीतीचा उच्चार
तुझे आयुष्यात येणे
माझ्या जीवनाचे सार

एक आस एकुलती
तुझ्या रंगात रंगता
मम आयुष्याची ह्वावी
तुझ्या मिठीत सांगता

Monday, September 1, 2008

माझे जळणे तीळतीळ..

.
माझे जळणे तीळतीळ
जगणे रोजचेच झाले माझे
तू देत रहा चटके खुषाल
सोसणे रोजचेच झाले माझे

मी सुगंधी घेतला वसा
दरवळत राहील आसमंत
आयुष्य सरते रे सरूदे
कसली ना मजला खंत

सरेन मी मरेन मी
राख होऊनी उरेन मी
कणा कणात रक्षेच्या
चैतन्य होऊनी भरेन मी

टेकवशील ना बोट तू
तुझ्या कपाळी मिरवेन मी
विभुती होऊन करेन रक्षण
चटके नियतीचे जिरवेन मी


.
सौ. अनुराधा म्हापणकर

देव आज मूडमधे नाही..

तिन्ही सांजेची वेळ
देवघर दिव्याने उजळवलं..
देवाला हात जोडले..
रोजचच मागणं मागितलं

पण आज कदाचित देव मूड मधेच नसावा..

माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं
म्हटलं असेल काही.. मीही लक्ष नाही दिलं..

काही केल्या माझ्याकडे देव जेव्हा बघेना
मलाही मग तेव्हा अजिबातच राहवेना..
म्हटलं बाबा.. तुझ्या मूडला आज काय बरं झालं..
सांग ना रे.. माझ्याकडून काय चुकीच घडून गेलं
तरी देव गप्पच.. !! घुश्श्यातच बसलेला..
कधीच नव्हता खरतर माझ्यावर असा रुसलेला

आठवत राहिले मग.. नक्की आज काय चूक झाली
की पूर्वीच्या कुठल्या चूकीची देवाला आठवण झाली

नाही म्हणायला चुकले खरी.. आज चिडचिड केली फार
आदळाआपटही केली थोडी.. आज शब्दांनाही होती धार

आजचे मागणे माझे.. म्हणून नामंजूर झाले
आज थोडी जास्तच कारण मगरूर मी झाले

कधीची देवाच्या दारात
ताटकळत उभी मी हात जोडून..
म्हटलं नको आज काही..
पण एकदा माझ्याकडे बघ तरी वळून..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

ठरवलय मी..

ठरवलय मी- आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

डोळ्यातून सांडलेले खारट पाणी..
ती तुझ्या तोंडची कडवट वाणी
सारं पुन्हा पुन्हा आठवत रहायच..

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

प्रेमाची ती साखर पेरणी..
मस्का लावणारी मनधरणी
लाड.. हट्ट सारं पुरवून घ्यायचं

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

चेहर्‍यावर लावेन राग लटका
जीभेवर ठेवेन तिखट चटका
मूक शब्दाने तुला बोलतं करायचं

ठरवलय मी -आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं

माहितेय मला पुन्हा मी हरणार आहे
तुझं प्रेम मला पांगळं करणार आहे
पांगळं होताना तरीही ताठ उभं राहायचं

ठरवलय मी - आज तुझ्यावर मनसोक्त रुसायचं
कितीही मारलीस हाक तरी फुरगटून बसायचं
:
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

आता पश्चाताप..

जिंकलो आम्ही दोघे
मुलगा डॉक्टर होऊन आला..
एम.बी.बी.एस. नाही नुसता
एम.एस. सर्जन होऊन आला

बालपणीच रुजवलेली
त्याच्या मनात ही जिद्द
त्याच्या शिक्षणासाठी
आम्ही कष्ट केले बेहद्द

पण हे काय.. विपरित?
म्हणतो -इथे राहाणार नाही
परदेशातून आले बोलावणे
इथे प्रक्टिस करणार नाही

समजावले- किती विनवण्या
हातही जोडून पाहिले
आईबाप असूनही मुलापुढे
लाचार होऊन पाहिले

ईमेल आले काल
आज अपॉन्टमेंटचे पाकीट येईल
व्हिसाही मिळेल आता
आणि एअर टिकीट येईल

चूक त्याची नाही
त्याला आम्हीच घडवले होते
महत्वाकांक्षाना त्याच्या
आम्हीच तर रूंद केले होते

मोठं करताना त्याला
जिद्द-ईर्षेचे पंख लावले होते
लक्षातच आले नाही कधी-
त्याच्यातले "माणूस"पण खुंटले होते

आता पश्चाताप..
ज्याचा काडी मात्र उपयोग नाही
त्याच्यासोबत म्हातारपणीचे दिवस..?
आमच्या पत्रिकेत तो योग नाही..:सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, August 6, 2008

न्युक्लीअर फॅमिलीमाणसं हवीशी वाटली कधी तर आरशात स्वत:ला पाहतो
कारण आम्ही किनई .. एका न्युक्लीअर फॅमिलीत राहतो

आमचा एकुलता एक आणि आम्ही दोघं- राजाराणी..
मस्त मोकाट भांडू शकतो अडवायला नाही कोणी..

एकदाच सकाळी डायनिंग टेबलवर चहासाठी होते भेट
अगदीच काही अर्जंट असेल तर- असतच ना इंटरनेट..

मुलाला शुभंकरोति शिकवायला आजी आजोबा नसतात
टिव्ही कॉम्प मोबाईल आय पॉड सोबत त्याला करतात

स्वत:भोवती गुरफटलेलं विश्व आमचं.. नाही जमत शेअरिंग
आजारपणात एकमेकांना जपतो ना.. तेवढेच आम्ही केअरिंग

कध्धीतरी मूड आला तर आमच्या घरातही होतो स्वैंपाक
नाहीतर इंस्टंट फ़ास्ट फ़ूड पार्सलचा रोज असतो खुराक

तस्सं कध्धीच कोणी आमच्याकडे येत जात नाही..
शेजारीसुद्धा उघड्या दारातून डोकावून पाहात नाही

वाढदिवस.. लग्न.. फॅमिली सोहळे.. तिथे सगेसोयरे असतात
रक्ताच्या नात्याचे बदललेले चेहरे खूप दिवसांनी तेव्हा दिसतात

तेव्हा मात्र गप्पा मारायला तो अख्खा दिवस पुरत नाही
देशाच राजकारण.. शेअर बाजार एकही विषय उरत नाही

एकमेकांची मुलं "कितवीत"? .. इतकी आवर्जून मात्र चौकशी
आमच्या घरी एकदा अवश्य या.. आमंत्रणेही होतात अशी..

पार्टी संपली पाटी कोरी.. लैचकीने दार उघडायचे
आत येतानाच सारे सगेसोयरे दाराबाहेरच सोडायचे

दारापलिकडे आपलं घर.. एक त्रिकोणी कुटुंब त्यात वसलेलं
खरतर लॉजिन्ग बोर्डिंग फक्त.. फ़ाइव्हस्टार अमेनिटीज असलेलं

न चुकता आत शिरताच.. टिव्हीचं बटण ऑन करायलाच हवं..
न्युक्लीअर डीडचं काय झालं.. आपल्याला बुवा कळायलाच हवं..!
.
.
:एका न्युक्लीअर फॅमिलीत.. मीही..!
:सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 29, 2008

थांब ना रे..

.
शेवटचा थेंब डोळ्यात अजूनही बाकी आहे
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..

देऊन जा थोड्या जखमा-व्रण
आणखी थोडेसे व्याकूळ क्षण
थोडा विरह.. थोडी वेदना..
जीवाला आणखी थोडी यातना देऊन जा
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..


घेऊन जा हा बहर सारा
आणिक देहाचा हा शहारा
फुल कोमेजूदे थोडे आणखी..
निर्माल्य होउदे.. विसर्जनाला मग घेऊन जा
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..


घाई कसली.. वेळ फार नाही
खांद्यावर तुझ्या आता भार नाही
शेवटेचा श्वास एकच बाकी..
प्राण कुडीतून माझा अलगद सोडवून जा..
.
थांब ना रे.. थोडे आणखी रडवून जा..
.
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

टिपिकल बायको

.
वेडी ग वेडी.. किती काळजी करतेस
खरं सांगू.. हल्ली ना फारच अती करतेस
डोळ्याखाली बघ तुझ्या किती काजळी धरली
तारुण्याची आणखी पाच वर्षं- बघ तुझी सरली

कशाला इतके प्रश्न तुझे -
कुठे आहेस - कधी येणार
जेवलास.. की घरी जेवणार

कशाला भाराभर सूचना-
जपून जा बरं का.. गाडी सावकाश चालव
उशीर होणार असेल तर वेळच्यावेळी कळव
वाट पहाते - जेवायला थांबते
वाटेवर तुझ्या जीवाला टांगते

केवढं ते घाबरणं -
अग बाई - सर्दी झाली
काढा करून देऊ..?
अंग दुखतय की डोकं चेपू
डॉक्टरची अपॉइंटमेन्ट घेऊ..?

सतत आपलं अवती भवती
बावरल्या चेहर्‍यानं वावरायचं
कसं ग तुला कळत नाही
वेड्या भावनांना आवरायचं

नको ग अशी टिपिकल बायको म्हणून राहू
अनंतकाळची माता बनून तर कध्धीच नको येऊ

त्यापेक्षा एका संध्याकाळी ये ना प्रेयसी होऊन
लग्नाआधीचे ते नवथर क्षण ये ना पुन्हा घेऊन..!!
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

येणार ना परत..?

.
पेपर उघडला
माहितीची बातमी..
काल लाइव्ह पाहिलं टीव्ही वर
आज पेपरात स्टील फोटोज..
रोज नवे ठिकाण
स्फोटांची आणि मृतांची
संख्या बदललेली
हाय अलर्ट सगळीकडे..
आज कोणावर कोसळेल
हा मानव निर्मित प्रपात..?
.
चला .. फार उशीर झाला
९.०४ ची लोकल गाठायचीय
संध्याकाळी.. येताना.. ६.२४
पण.. येणार ना परत..?
की.. आज ही वीज..??
जाऊदे.. वाण्याची लिस्ट
घेऊन जायला हवी..
आणि येताना उद्यासाठी
भाजीही आणायला हवी..!!


:सौ. अनुराधा म्हापणकर

डिझास्टर मॅनेजमेंट

.
चला .. चला
उभारू नवे झोपडे.. नदीच्या सुकल्या पात्रात भरभर
चला .. चला
वाहुदे निर्माल्य सारे.. नदीचे थांबले ओहोळ निर्झर
चला .. चला
टाकू कचरा सडका.. गटाराचे उघडे झाकण
चला .. चला
भाग घेऊ "झोपडपट्टी बचाव" .. एक नवे आंदोलन
चला .. चला
बांधू रस्ता नवा - ढकलून नदीला अगदी अलगद
चला .. चला
बांधू एक नवा टॉवर .. बूजवून सारी ओली दलदल
चला .. चला
नव्या फ्लॅटचे बुकिंग- टॉवर मधे.. विसाव्या मजल्यावर
.
पाऊस आला- मुसळधार धो धो
पूर प्रपात… खवळला सागर
.
चला .. चला
ओबी वॅन चॅनेलवाल्यांची आली
चला .. चला
उतरू सारे लिफ्टने खाली
आणि सांगू व्यथा पूराची
ठेवू नावे पालिका प्रशासनाला

म्हणू.. एक सूरात सारे..
.
डिझास्टर मॅनेजमेंट फेल्ड..!!
डिझास्टर मॅनेजमेंट फेल्ड..!!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, July 24, 2008

हरवलेले ते क्षण

हरवलेले ते क्षण माझे - कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे - कुणी परत मला देईल का..

हरले मी - हरवले मी - माझे मला कळलेच नाही..
कळले तेव्हा - मला जेव्हा - माझी मी उरलेच नाही
हरलेले ते मी पण माझे कुणी परत मला देईल का
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

जळले मी - गळले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - राख जाहली - पुन्हा मी उठलेच नाही
राखेचा तो कणन कण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

झुरले मी - कुढले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - वसंतातही जेव्हा पुन्हा मी फुललेच नाही
वसंत बहराचा तो एक सण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

रुसले मी - मुसमुसले मी - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - डोळ्यानाही तेव्हा रडायचे सुचलेच नाही
अश्रुचा तो थेंब शेवटला कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

काव्य माझे मरूनि गेले - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - दु:खातही जेव्हा काव्य मला स्फुरलेच नाही
शब्दांची ती अखेरची गुंफण कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

सांज सरली - रातही सरली - माझे मला कळलेच नाही
कळले तेव्हा - पहाटेनेही तेव्हा दव बिंदू शिम्पडले नाही
पहाटेचा ओलावा दवाचा - कुणी परत मला देईल का..
हरवलेले ते क्षण माझे कुणी परत मला देईल का..

सरले संपले - सारे काही - माझ्यापाशी उरलेच नाही
श्वासही संपला-थांबले स्पंदन-हृदय पुन्हा धडधडलेच नाही
संपलेले आयुष्य माझे कुणी परत मला देईल का..?
मला जगायचय हो पुन्हा - कुणी जन्म मला देईल का..??


:सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 22, 2008

एकावर एक फ़्री...!!!!

.
आज मॉल मधे गेले..
का..?.. उगाच...??

बाहेर पोस्टर लावलं होतं..
एकावर एक फ़्री..
असंच काहीस लिहिलं होतं..

तशी एकाचीही गरज नव्हती..
पण..त्या क्षणी अक्कल गहाण होती..

आत शिरले.. फिर फिर फिरले..
काही बाही.. असेच..
काहीच अडले नसलेले
घरात त्यातले थोडे
आधीच पडले असलेले

घेतले सारे..
काही एकावर एक
काही दोनावर एक

एकच त्यातल्या त्यात
हवी असलेली वस्तू..
जी दोनावर एक फ़्री म्हणून
पहिल्या दोन्ही उगाच घेतल्या

जीवाच्या आकांताने सरकवली ट्रॉली
भरमसाठ बील.. क्रेडिट कार्डं वापरली

बाहेर पडले.. पिशव्या संभाळत..
उरा पोटावर ती ओझी पकडत..
.
.
गल्लीच्या तोंडावर.. माझे वाण्याचे दुकान
बिच्चारा.. !!!!
एका फोनचा अवकाश.. घरपोच द्यायचा मला..
अगदी अर्ध्या तासात.. !!
हं... पण एकावर एक फ़्री नाही ना दिलं त्याने कधी..!!!
.
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, July 20, 2008

ओढ तरी ती पूर्वीचीच

.
सरत्या वयाचं ओझं
हिशोब मांडत बसलोय
सरणात गेली लाकडं
तरी अजून भांडत बसलोय

आताशा भांडणाला पण
पूर्वी सारखा रंग चढत नाही
मी तुझ्याशी - तू माझ्याशी
पूर्वी सारखे आता लढत नाही

दातांची कवळी निसटेल म्हणून
शब्द तोंडातून निसटत नाही
कवळी ठेवावी काढून तर
शब्दच नीट उमटत नाही

तरीही काही निरर्थक
अखंड बडबडत रहायचं
माझ्या कुठल्याही प्रश्नाला
तू कुठलही उत्तर द्यायचं

गुढगे दुखी, सांधे दुखी..
जाड भिंगांचा चष्मा
बोचरी थंडी, निसरडा पाऊस
सहन होईना उष्मा

आजही तरी दुखलं खुपलं
मला तू आणि तुला मीच
स्वर्गाच्या उंबरठ्यावर दोघे
ओढ तरी ती पूर्वीचीच


: सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, July 19, 2008

सुखसुद्धा बोचतं.........

जास्त झालं की
सुखसुद्धा बोचतं
जागेपणी झोपेतही
सुईसारखं टोचतं

ओसंडून वाहिलेलं सुखसुद्धा
जीवाला मानवत नाही
सुखाचही होतं ओझं
मनाला ते पेलवत नाही..

काही हवं असतं उगाच
मनात कुठेसं खुपणारं
भाजलेल्या फोडासारखं
आतल्याआत ठुसठुसणारं

एक हवी असते हुरहुर
काळजी काही चिंता
थोडा उगाचच आयुष्याचा
वाढवायचा असतो गुंता

झेपेल इतकी जीवालाही
हवीच असते यातना
सुखाला तोलून धरेल
इतकी हवीच एक वेदना

तेव्हाच कुठे संवेदनेला
सुखाची ओळख पटते
आणि वेदनाही सुखाचे
मग वस्त्र नेसून नटते..

: सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 15, 2008

बॅंड-एड

.
माझ्या हातून झालेली जखम
भळभळत ठेवण्यातच किती आनंद मिळतो ना तुला..
नाही म्हणता नाहीच खपली धरू देत तू त्यावर..
स्वत:च्याच हातानं वर मीठ चोळत असतोस अजून..
मी फुंकर मारलेली तरी कुठे चालते तुला..?
.
पण त्या एका जखमेच्या बदल्यात
तू दिलेल्या अनेक जखमांचा हिशेब मी ठेवते कुठे..
त्या जखमा कधीच भळभळतानाही दिसत नाहीत
मुकाट सोसताना डोळ्यातून अश्रुही वाहत नाहीत
पदराखाली झाकून घेते मी एकेका व्रणाला
त्यावर खपली धरते की नाही.. माझं मला तरी कुठे कळतं..
मी आपली बॅंड-एड घेऊन तुझ्या मागे मागे फिरत असते ना..
.
.
: सौ. अनुराधा म्हापणकर

ई-मेल..

उजवीकडे तारीख..
मग मायना..
नंतर मजकूर..
बुद्धीबळातल्या उंटासारखा
तिरका वाकडा धावणारा..
तसं बर चाललय आयुष्य
असं पानभर सांगणारा..
खाली डावीकडे लिहिलेलं
कळावे.. लोभ असावा..
तळटीप.. ता.क. उगाच..
काहिसं निरर्थक.. पण
पत्राचा स्कूल पैटर्न पूर्ण करणारं..
.
.
आज ती सारी पत्र..
कपाटातून बाहेर सांडली..
आणि.. समजलं
त्या निरर्थक भावनेलाही
किती अर्थ होता..
त्या पत्राला सखे,
तुझ्या हाताचा स्पर्श होता..
.
.
आज सातासमुद्रापलिकडून
रोज येतात तुझी फ़ॉर्वर्डेड ई मेल्स
पण.. त्यात.. तू कुठे ग दिसतेस..
.
ह्याला विज्ञानाचा
शाप म्हणावं की वरदान..
संभ्रमात मी आहे थोडी..
निर्णय पक्का झाला की..
मीही तुला ईमेलच करणार आहे..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, July 11, 2008

मागणं..

ज्यावर माझी ही अचेतन काया..
हे अंथरूण आहे की मृत्यु शय्या..?

की मला पांघरलेल्या चादरीतच
अडकलाय माझ्या कुडीतला प्राण
न जाणो किती वर्ष सरली इथेच
हा शय्येवर खिळलेला देह निष्प्राण

अर्ध्या देहाची जळून गेली संवेदना
आणि जळत्या मनाच्या असह्य वेदना

त्या खिडकीच्या छोट्या चौकटीतून
बाहेर दिसणारं ते तुकडाभर आभाळ
तिथेच डोळे लावून बसतो मी रोज
कोण जाणे असच, अजून किती काळ

करणारे सेवा करतात.. मेला जीव जगवतात..
माझा जीव जगवताना स्वत:चा जीव मारतात

पण हे न येणारं मरण आता नाही सोसवत..
लेकाचं हे तीळ तीळ मरणं आता नाही बघवत

पुरे झालं रे श्रावण बाळा.. पितृ ऋण सारं फेडलस
इतकी केलीस सेवा ..की बापालाच ऋणात ओढलस
.
.
एकच दान मागतो.. माझं अखेरचं मागणं..
देता आलं तर देऊन जा- इच्छा मरणाचं देणं..

:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर

एक निळं आभाळ..


एक निळं आभाळ..असं तुझ्या डोळ्यात आलं दाटून
की समुद्राची निळाई तुझ्या डोळ्यात गेली साठून
चवसुद्धा तीच खारट त्या निळ्याशार पाण्याची
का अशी ओढ त्याला अविरत वहात रहाण्याची
लाटामागून लाटा.. ही भरती ग कुठली..
पटली ग पटली- तुझ्या प्रेमाची खूण पटली


चला.. जा बाई..
डोळे पुसायचं निमित्त
सारखे गालाला करताय स्पर्श..
साखरपुडा केला आता
आणि लग्नाला लावताय वर्ष..


अग हो.. हो.. हो.. किती अधीर उताविळ होशील..
आजची आठवण म्हणून, सांग ना ग- मला काय देशील?


इश्य... काहीतरीच आपलं तुमचं.. हट्ट धरून बसायचं
लग्नाआधीच तसलं काही- मला नाही बाई जमायचं..

वेडे.. तुझ्याच मनात येतात- विचार असले खट्याळ
मी मागतोय फक्त तुझ्या डोळ्यातलं निळं आभाळ
टिपलेस ज्याने अश्रु.. आणि पुसलेस ज्याने गाल
जाताना देऊन जा तुझा तो -सुगंधी हात रूमाल
.

.
: सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, July 3, 2008

ब्युटी-पार्लर...

ती कळकट थोडी.. रापलेली उन्हाने..
असावी गव्हाळ ती .. मूळची रंगाने..
दोन्ही डोळ्याखाली.. वर्तुळं काळी..
चेहर्‍यावर सुरकत्यांची अस्पष्ट जाळी..
केससंभार गुंतलेला.. भुरभुरलेला..
दुष्ट वार्‍याने पार विस्कटलेला..
एक मळभ तिच्या अस्तित्वावर दाटलेली
की धूळ होती ती.. तिच्यावर साचलेली..?

.
ब्युटी पार्लर नावाच्या पाटीखाली ती शिरली..
आणि उन्हात चांदणं पडावं तशी बाहेर पडली..
.
मळभ दूर झालेली.. की धूळ होती झटकलेली..
स्वच्छ ऊन पडावं तशी लख्ख ती उजळलेली..
वळणदार कमानीखाली.. दोन टपोरे डोळे..
दिसेनासे झाले.. सुरकुत्यांचे अंधुक जाळे..
केस मऊ शार सुंगधी.. वार्‍याला न भिणारे..
गालावर बट एखादी.. बाकी मानेवर रेंगाळणारे
.
ती.. आता एका विचारात फक्त..!
मनावरची मळभ थोडी दूर व्ह्यायची राहिलेय..
विचारांवर साचलेली धूळ थोडी झटकायची राहिलेय..
आता कुठे जावं बरं...?

:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर.

Thursday, June 26, 2008

एबनॉर्मल..??

तू हल्ली नीट बोलत नाहीस..
पूर्वी सारखी खुलत नाहीस..
सांग ना ग.. काय झालं
बघ डोळ्यात पाणी आलं
.
नाही रे कुठे काही..
काहीच तर झालं नाही..

.
हेच तर तुझं बदललेलं रूप
वेडे.. ओळखतो मी तुला खूप
पूर्वीची असतीस तर डोळ्यातून वाहिली असतीस
तुझी व्यथा माझ्या डोळ्यात पाहिली असतीस
पण आता सारं डोळ्यातच लपवून ठेवतेस
का ग जीवाला माझ्या असा घोर लावतेस
.
मीही म्हणू शकते ना रे ... असच काही बाही
आधी मनातलं तुला न सांगताच समजून जाई
सांग.. आताच तुला का मग सारं विचारावसं वाटलं..
माझ्या डोळ्यातलं आभाळ का तुझ्या डोळ्यात नाही दाटलं..?
जाऊदे.. नको आता उत्तर शोधत राहू ..
नसलेल्या प्रश्नांना अडगळीत टाक पाहू..
गप्प आहे आज तर होईन उद्या नॉर्मल..
नाहीतरी आहेच ना मी थोडीशी.. एबनॉर्मल..??
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

विस्कटलेले आयुष्य..

कुठे आयुष्य कसे सरले
की थोडे आणखी उरले..
आयुष्यभर कोणाला पुरले
कशासाठी उगा झुरले..

किती सोसली वेदना
किती कोंडली भावना
किती प्रेम ओसंडून राहिले
किती प्रेम भांडून वाहिले

किती केला तत्वांचा बाजार
किती भावनांचा मांडला व्यापार
कितीदा तत्व 'स्व'त्व विकले
कितीदा नशिबापुढे मी झुकले

किती मांडला संसार सारा
किती सांडला व्यर्थ पसारा
कितीदा सारे सावरून झाले
कितीदा नव्याने आवरून झाले

विस्कटलेले आयुष्य थोडे
त्याचे कोडे सुटेना झाले..
उचकटलेले मळके रंग
कसे बरं मिटेना झाले..
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, June 14, 2008

एक बातमी तीच तीच..

कोणाचे कोसळे छप्पर..
कुठे कोसळली भिंत
पाऊस कोसळतो ऐसा
त्याला नसे रे उसंत

ओल्या आडोश्याला घरटे
त्याला प्लास्टिकची चादर
त्याची फाटलेली लुंगी
तिचा ओला ग पदर

भुईवर तळे, त्यावरी गळे
फाटके डोईवरले छत..
हाय आभाळ फाटले
त्याला वार्‍याची सोबत

देवा आक्रित घडले..
कसे उडाले रे छप्पर
शेजारले हे गटार
तेही येई वर वर

नशिबाने केली दैना
वाहिली झोपडी-घरटे
डोळ्यालाही येई पूर
उघडा संसार झाकते
.
.

एक बातमी तीच तीच
टीव्ही चैनल पुन्हा दळते
मिलन सबवे ला भरले पाणी
आणि ट्रेन उशिराने पळते

सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, June 13, 2008

पावसात भिजत गाणं कसं बरं गुणगुणायचं..?

पाऊस पाहून मोहरायचे दिवस आता गेलेत..
सरी कोसळताना बहरायचे दिवस आता गेलेत..
.
आता .. पाऊस म्हणजे..
वैताग.. दोरीवर न सुकणारे कपडे..
भिंतीवर..छतावर गळके कुरुप पोपडे..

काचा तावदानं बंद.. मारते पाण्याची झड
घरात होते घुसमट.. हवासुद्धा येईना धड

रस्त्यावर चिखल.. साचलेली तुडुंब डबकी..
तुंबलेली गटारं चोहीकडे..कोंदट आणि सडकी..

रस्त्यावरच्या खड्ड्यांचे करुन मस्त बहाणे,
चालताना अंगावर चिखल उडवतात वाहने..

घोंगावणार्‍या माश्या.. डेंग्यू मलेरियावाले डास
डायरिया.. ताप.. आणि नको त्या आजारांचा त्रास

अगदी ब्रान्डेड छत्रीसुद्धा वार्‍यापुढे टिकत नाही..
रेनशीटर घालावं तर आमचं धड पूर्ण झाकत नाही..

ट्रेन लेट.. रूळावर पाणी.. ट्रैफ़िक जाम.. मग लेट मार्क
ओले कपड्यात हुडहुडी.. कप्पाळ कामात दिसणार स्पार्क

अस्सा हा पाउस.. त्याला छान कसं बरं म्हणायचं..?
पावसात भिजत भिजत गाणं-कसं बरं गुणगुणायचं..?

तेवढ्यातच कुठूनशी..
नरिमन पॉइन्टच्या कट्ट्यावर फेसाळती लाट येते
छत्री उलटी पालटी करत त्यात- सर चिंब भिजवते..

नाही नाही म्हणतानाच मनही कसे ओले चिंब ओघळते
"रिमझिम गिरे सावन" म्हणत मग-चक्क मी सुद्धा निथळते


सौ. अनुराधा म्हापणकर.

Thursday, June 12, 2008

लाइफ़ इज ब्युटीफुल

लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे
कारण..
मला तुझी..
तुला माझी..
सोबत.. अष्टौ प्रहर आहे..

कधी व्यक्त..
कधी अव्यक्त..
भावनांचा आवेग
प्रेमाचा फुलला बहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

सुखात हसताना
एकमेकांत रमताना
ओठांवर तुझ्या
माझ्या आनंदाची लहर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

अडथळ्यांची शर्यत
दु:खाचे उंच डोंगर
तुझे अश्रु पुसायला
रेशमी माझा पदर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे

ऊन.. कधी पाऊस
कधी बोचरी थंडी
तुला लपेटणारी
माझ्या ऊबेची चादर आहे
.
लाइफ़ इज ब्युटीफुल
हे जीवन सुंदर आहे..!!
:
:
:सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, June 4, 2008

थेंब अश्रुंचे दोन गालावरती..

थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.
सांगितले बरेच काही..आनंदाश्रु अन काही बाही..
अर्थ सुकल्या आसवाचा, परी लावायचा तो लावून गेले..
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
पुसले डोळे, हसून खोटे, चाचपले मी किती मुखवटे
मुखवट्याला चेहर्‍यावरती परी चढवायचे राहून गेले
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
हसून आता, विसरून सारे, वावरते जणू उनाड वारे
हसता हसता भरले डोळे, पापणीतूनी अश्रू वाहून गेले
.
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..
.

थेंब अश्रुंचे गालावरती पुसायाचे राहून गेले..
लपविलेले दु:ख माझे चार चेहरे पाहून गेले..

.

सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, May 29, 2008

नकोस बोलू शब्दांनी तू..

नजरेत वाचते मी
तुझ्या मनीची भावना
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

तुझा चेहराही बोलतो
सांगतो अंतरीच्या खुणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

अधीर स्पर्शातूनी पाहिले
मनावर उठलेल्या व्रणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना
.
.
बघ डोळ्यानीच माझ्या
गोंजारते तुझी भावना
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

चेहर्‍यास चेहर्‍याचा आरसा
टिपतो सार्‍या खाणाखुणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना

स्पर्शाचीच फुंकर मारते
हळुवार झाकिते तुझ्या व्रणा
नकोस बोलू शब्दांनी तू
तुझी हळवी ती संवेदना
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, May 28, 2008

जन्नत की सैर..


काश्मिर फिरून आले..
पावला पावला वर एकच..!
काश्मिर वर एक कविता..
म्हणे तू करून टाकच..!
.
ते सौंदर्य अस्मानीचे..
स्वर्ग खरोखर-आली प्रचिती..
आस्वाद घ्यायचा निव्वळ
अशीच निसर्गाची कला-कृती

जे अनुभवले.. नजरेने.. ते सारे
कलेन्डर मधेच पाहिले होते..
याचि देही याचि डोळा पहावे
असे खरच पहायचे राहिले होते

इंद्रधनुष्यातही मावणार नाहीत
इतक्या रंगाची भवताली उधळण
त्यावर कडी .. फुलांचा बहर
रंगात रंगांची पखरण

आपल्या हातात हात गुंफून
तिथे चालते खळाळते पाणी..
शुभ्र फेसाळते.. झरझर निर्झर
तुषार उडवती मनाच्या अंगणी

नजर अडविती पर्वत रांगा..
शुभ्र हिम-शिरपेच त्यांच्या डोई
शांत पहुडले दाही दिशांना
ढगांची ओढूनी मस्त दुलई

सूर्य किरण त्यावरी नाचरे
टाकती सोनेरी नेत्र कटाक्ष
स्वयें जणु मी ब्रह्म पाहिले
माझ्या मनास पटली साक्ष

गार बर्फ़.. मी त्यावरी चालते..
की चंद्रावर टाकले पाऊल
स्वर्ग स्वर्ग तो हाच नक्की..
पुन्हा पुन्हा लागते चाहूल

सोनमर्ग.. गुलमर्ग.. पहेलगाम
दृश्य इंद्र्यि जणु तृप्त शांत झाली
दाल लेक वर हाऊसबोट-शिकारे..
मने जणु त्यावर तरंगूनी आली

डोळ्यांच्या इवल्याशा खाचात दोन
मावू म्हणता सारे मावत नाही..
शब्दात बांधायचा मग का हा हट्ट
काय करावे.. पण रहावत नाही...!!

अपूरे सारे.. शब्दांनाही मर्यादा,
सौंदर्य वाचून समजायचे नसते
अमर्याद विखुरलेले ते सौंदर्य
स्वत:च अनुभवायचे असते..!

:सौ. अनुराधा म्हापणकर.

बिसलेरी..

उन्हाळा मी म्हणतो..
आम्ही तापतो.. तहानतो.. तळमळतो..
मग एसीची काळी काच सरकवतो..
एका दुकानासमोर नोटा भिरकवतो..
बिसलेरीच्या बाटल्यावर बाटल्या रिचवतो..
आम्हाला त्यावर लिम्का लेमोनेडही लागतो..
.
तेव्हाच..
तहानला एक जीव रस्त्यावरही असतो..
सार्वजनिक नळाला तो झोंबताना दिसतो..
ओंजळ हातांची करून पाणी घटाघटा पितो..
.
तो जीव मग शांत .. तृप्त...
मिजास खोर आम्ही खरच...!
.
आमची तहान कध्धी भागतच नाही...!!
:
:
: सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, April 30, 2008

फुले पाने चंद्र चांदण्या...

फुले पाने चंद्र चांदण्या
समुद्र नद्या झरे वारे..
माझ्या कवितेच्या विश्वात
एकदा तरी डोकवून जा रे..!

माझ्या शब्दांशी का बरं
जुळत नाही तुमची सोयरीक
का कधी त्यांच्याकडूनच
घडली आहे अक्षम्य आगळीक

तुम्हाला सोबतीला घेऊन
कविता सर्वांच्या कशा खास
तुमच्या विना माझे शब्द
कसे निरस.. आणि भकास

तुमची वाट पाहून मग मी
माणसा माणसांतच कविता पहाते
जीवन सारच सारे जमवून
कवितेतून माझ्या वहाते

तरीही
आजही माझी कविता बिच्चारी
तुमची वाट पहात आहे
कधीतरी तुम्ही येणार..
वेड्या आशेवर रहात आहे


सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 29, 2008

डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..

वर्षं संपलं .. तशी डायरीही संपली..
थर्टी फ़र्स्ट नाइट ला हलकेच तिला मिटली..

अशा कित्येक डायर्‍या.. आणि कित्येक वर्षं सरली..
त्या सरल्या फाटक्या पानांवर सरसर नजर फिरली..

मी तर कदाचित आत्म चरित्रच लिहिले होते..
नेहमी एकाच चष्म्यातून जगाकडे पाहिले होते..

आजवर मी कध्धी कध्धीच चुकले नव्हते..
माझ्या तत्वांना कध्धीच मी विकले नव्हते..

सार्‍यांनीच माझ्यावर केलेला अन्याय होता..
मी मात्र प्रत्येक वेळेस केला तो न्याय होता..

यश मिळाले जे त्यावर माझा अधिकार होता..
अपयश जे वाट्याला आले तो दैवाचा वार होता..

खूप दु:ख केवळ माझ्याच पदरात आले
सुख फारच थोडे हुलकावणी देऊन गेले..

कष्ट.. संघर्ष करून मी जरा कुठे स्थिरावले..
जगायला तेव्हा कुठे मी थोडी थोडी सरावले..

अस्सा गेला एकेक दिवस- महिने..वर्षं सरून गेली..
डायरीच्या पानावर माझी आत्मकथा उरून गेली..


:सौ. अनुराधा म्हापणकर.

Monday, April 28, 2008

पुन्हा डायरी..

डायरी लिहिली .. माझी मीच वाचली..
नको ती आठवण.. पुन्हा डोळ्यात साचली..

नको ते मला अस तीचं रोज रोज दिसणं
भुतकाळाच ते माझ्या वर्तमानात असणं

सारखं सारख दिसून.. ते मला असं खिजवणं
भरत आलेल्या जखमेला तिचं रोज ते खाजवणं

फाडून टाकलं मग एकेक पान टरा टरा..
केराच्या टोपलीत फेकून दिलं भरा भरा..

आता नाही ना पुन्हा मला ती त्रास देणार..?
आजच्या क्षणाना.. सरलेल्या क्षणांचा भास देणार?

पण मनातले आठव.. त्याला कसे बरं पुसावे..
डोळे केलेत ना बंद.. तरी स्पष्ट सारे का दिसावे..

डायरी फाडली खरं मी
पण मनातली पाने काही फाटत नाहीत..
दिवस.. वारच काय.. वेळ सुद्धा आठवतेय..
मनातली ही डायरी, मिटू म्हटलं तरी मिटत नाही..

:सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, April 26, 2008

कविता मला स्फुरलीच नाही

.
कुठलीही संवेदना का
माझ्यापाशी उरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

शब्द होते साचलेले
पण काव्यपंक्ती मुरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

आतुर माझी लेखणी फार
शाई त्यातुनी परी झरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

मनास उधाण जणु आलेले
पोकळी त्याची परी भरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
.
.
मूक शब्दांचे ते वाहत जाणे
काठावर बसोनी मी पाहते
दुखरी एक वेदना मनाची
अव्यक्तच बापडी राहते..

ठसठसते ती जखम बिचारी
खपली त्यावरी धरलीच नाही
खरच..!!.. कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, April 16, 2008

आई आहेस तू.. पण...

आई आहेस तू..
पण किती ग ओळखतेस.. कुशीतून निपजलेल्या मुलाला
नऊ महिने पोटात वाढवलसं त्या आपल्या बाळाला
तो.. त्याचा स्वभाव.. त्याच्या मूड.. त्याची आवड निवड..
वेळेवर न मिळालेल्या नाश्त्यासाठी त्याने केलेली ओरड
त्याच्या बर्‍या वाईट सवयी.. त्याची गादी त्याची उशी..
तव्यावरची गरम पोळी.. त्याच्या विटमिनची गोळी
दिवसभर नुसती राब राब राबतेस..
शब्द त्याचा पडू नये म्हणून हवेतच झेलतेस..
.
.
पण काय ग..
घरातून बाहेर पडल्यावर... तो काय काय करतो..
कुठे कुठे जातो आणि कोणा कोणाला भेटतो..
लोकलच्या दाराला म्हणे हल्ली तो लटकतो..
लेडिज डब्याकडे पहात एक शिट्टी सुद्धा वाजवतो..
कॉलेजात गेल्यावर लेक्चर सारी बंक करतो..
बाहेरच्या पानवाल्याकडे झुरके म्हणे ओढतो..
एम एम एस आणि सिडीज ची अदला बदल करतो..
रोज नव्या "आयटम" ला घेऊन जुहु बीच फिरतो..
.
.
घरी येतो सातच्या आत.. तू मागे पुढे करतेस..
कित्ती दमला बाळ माझा.. म्हणून घाम सुद्धा पुसतेस..
साजूक तुपातल्या शिर्‍याची बशी समोर धरतेस..
काय करू रे जेवण? म्हणून पुन्हा पुन्हा विचारतेस
.
.
कधी विचार ना ग अधून मधून...काय शिकवलं रे आज कॉलेजमधे...
आठवतंय... न चुकता विचारायचीस तू.. जेव्हा जायचा तो शाळेमधे..!!
.
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 15, 2008

ओंजळीतलं आयुष्य..?

एका ओंजळीत आयुष्य घेऊन जगते मी
आणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा
तसं आयुष्यही निसटून जातं क्षणा क्षणाने
किती काही करायचं राहिलय..
आणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..
कसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..
किती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..
कमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला
रात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला

ओंजळ कित्ती घट्ट केली
मी मूठही वळून पाहिली
कित्येक दिवसरात्रींची
मग धार होऊन वाहिली

येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय
ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय

किती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..
असूदेत कितीही.. तमा कशाला..
आता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, April 11, 2008

पिंजर्‍याची मला सवय झाली..

.
.
एक मोकळा श्वास घ्यावा
तर कितिक बंधने भोवताली
का आता मलाच माझ्या
पिंजर्‍याची सवय झाली....

जरा कुठे तोडू म्हटलं तर
पायातली बेडी तुटत नाही
हं.. पैजण म्हणतात खरं तिला
पण पाऊल जड.. उचलत नाही..

खिडकी बाहेर डोकावून कधी
मंद झुळुक घेते अंगावर
कधी झेलते तुषार थेंबांचे
निस्तेज फिक्या गालावर..

ते करतानाही मनावर माझ्या
मोरपीस आता फिरते कुठे
मरून गेलेल्या संवेदनाना
हौस मौज तरी उरते कुठे....?

सवयीनेच सारे लादले आहे
दोष कोणाचाच मी मानत नाही
की निरिच्छ मनालाही काही असेल हवं
जे माझं मीच जाणत नाही..??
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Wednesday, April 9, 2008

नवरी..

भरला चुडा.. हातात
हिरवा कंच काचेचा
रंगलेला नक्षीदार
हात माझा मेंदीचा

पिवळे रेशमी वधुवस्त्र
पिवळे तेज हळदीचे
पैजण छुनछुन पायी
जोडवे नाजुक चांदीचे

मुंडावळ्या मोगरीच्या
गजरा कुंद सायलीचा
हाती अधीर पुष्पहार
गुलाबी टपोर्‍या कळीचा

आंतरपाटाचे वस्त्र मधे
पलिकडे विश्व खुणावणारे
नजरेत ओसंडतो विश्वास
दोन डोळे ते बोलावणारे

पडे अक्षतांचा पाऊस
"शुभ मंगल सावधान"..
भरली लग्न घटिका
विसरले देह भान

आंतरपाट दूर होतो
वरमाला मी घालते
हाती हात देऊनी
नव-वधु मी लाजते

हाती हळकुंड, ती सप्तपदी
मंगळसुत्राचा पहिला स्पर्श
झेलते मी नजरेनीच ते
अवखळ तुझे नेत्र-कटाक्ष

नव्या कोर्‍या शालूचा
कसा नवा कोरा वास
पेटवलेल्या होमाचा
आगळा वेगळा सुवास

आज एक नवा जन्म..
नवा अध्याय.. नवे जीवन..
सौभाग्याचे दान लाभले
सुखाने उमलूदे सहजीवन
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 8, 2008

एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा..

एकदा चेंज म्हणूनच असेही कधी करुन पहा
रोजच्यापेक्षा वेगळे एक जीवन कधी जगून पहा

स्वत:च्या प्रेमात तर नेहमीच असता..
एकदा दुसर्‍यावरही प्रेम करून पहा
स्वत:च्या भावनेला कुरवाळने रोजचे
दुसर्‍याच्या मनीचेही कधी जाणून पहा

स्वत:च्या मर्जीला सारखेच केलेत खरे
दुसर्‍याची मर्जीही कधी राखून पहा
दु:खभार स्वत:चे नित्य मिरवता खांद्यावर
पर दु:खाचीही झोळीही कधी उचलून पहा

स्वत:च्या अपेक्षांचे ओझे लादलेत सगळ्यांवर
दुसर्‍याच्या अपेक्षानाही कधी पूर्ण करून पहा
भांडत वाद घातलात तत्वासाठी स्वत:च्या
दुसर्‍याच्या तत्वाचीही कधी कदर करून पहा
.
.
त्या दिवसाच्या संध्याकाळी खरंच खूप बरे वाटेल
सारी नाती... सार्‍यांचे प्रेम अचानक सारे खरे वाटेल

आजवर पुकारलेले सारे वाद उगाच केलेले बंड वाटेल
आजवर जपलेली सारी तत्वं अचानक एक थोतांड वाटेल

न सांगताच सार्‍या अपेक्षांना पूर्णत्व आलेलं असेल
न वाटताच तुमचं सारं दु:ख हलकं झालेलं भासेल

आयुष्यातला हा एकच दिवस.. खूप काही देऊन जाईल
जाताना कदाचित बरेचसे.. भ्रमाचे भोपळे फोडून जाईल
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, April 7, 2008

एकदाचं अगदी रितं रितं ह्यायचय..

.
मलाही सारं काही बोलून टाकायचंय
मनाचे बंध सोडून
एकदाचं अगदी रितं रितं ह्यायचय..

माझ्यापाशी येऊन
तूही होतोस ना पूर्ण रिकामा..
उद्या पुन्हा भरण्यासाठी
रिता करतोस ना तुझा अंतरात्मा..

तसंच कधी तरी मलाही होऊदे ना मोकळं
सांगू दे ना मलाही अगदी सगळं सगळं..

एकदाच फक्त करते रे
मनाचा गाभारा रिता
ऐकशील का रे सारं
तू काही न बोलता..?

माझ्या भावना वेड्या.. तुझ्यापर्यंत पोचतील न पोचतील..
माझे शब्द हळवे सारे.. तुला कळतील न कळतील..
तरीही एकदा मला बोलू दे..
आयुष्यभरासाठी पुढच्या..
आयुष्यभराचं साचलेलं..
एकदाच फक्त वाहू दे..

.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, April 5, 2008

माझंच काही चुकतंय का..

वेड्यासारखी हल्ली कुठेही मी कविता करत असते
मुलं खेळण्यात रमावी तशी शब्दांशी खेळत बसते

किचनमधे तडतडून जेव्हा डाळीला देते फोडणी
आह..! कशी उस्फूर्त! शब्दांची जुळून येते मांडणी

मंडईत.. मैफ़िलीत.. गर्दीतही मी गुंग स्वत:त
गर्दीचे शब्द माझ्या मनापर्यंत कुठे पोचतात

आसपासच्या सार्‍यांनीच वेड्यात मला काढलंय
म्हणे हीचं खूळ आजकाल जास्तच जरा वाढलंय

कोणी मेल्यावरसुद्धा हल्ली काव्य हीला स्फूरतं
कविता करुन का कधी पोट कोणाचं भरतं ..?

माझंच काही चुकतंय का.. कधी कधी मला वाटतं
तरी पुन्हा पुन्हा मन माझं शब्दातच गुंतून राहतं..

माझ्या शब्दांची महती सांगायला शब्द मला स्फूरत नाही
खरं सांगायचं तर बोलायला शब्दच माझ्याकडे उरत नाही

कसे समजावू- चार दिवस कदाचित ऑक्सिजनशिवायही राहीन
पण कवितेला सोडुन माझ्या - एका निष्प्राण देहाला मी वाहीन

जाऊदे- माहितेय मला-
कविता करणार्‍याला व्यवहारी जगात किमंत उरत नाही
तुम्ही कितीही म्हणा हो.. "वा वा.. अप्रतिम.."
कारण रसिकहो.. नुसतं म्हणायला खरच पैसे पडत नाही
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, April 4, 2008

रूप-गर्विता

ती :
मी कुरुप आहे रे वेड्या
माझ्या मधाळ आवाजावर जाऊ नको
माझे शब्द करतात घायाळ पण
त्यात रुपाला माझ्या पाहू नको

ऐकायला वाटते छान खरंय
श्रवणीय आहे मी थोडी
पाहशील मला प्रत्यक्षात
तेव्हा सरून जाईल ही गोडी

सामोरा येशील कधी काळी
शोधशील एखादी पळवाट
म्हणशील हाय का पडली
हिची नि माझी इ-गाठ
.
.
तो :
वेडी आहेस ग खूप
भोळी भाबडी.. निरागस
तुझं रुप पाहिलं ग शब्दात
तेच आहे फार लोभस

तू कशी काळी की सावळी
की नाकी डोळा विरुप
माझ्यासाठी तू रूप गर्विता
सौंदर्याचे मूर्त रुप

रुप रंग गौण मला
मी भाळलो तुझ्य शब्दावर
शब्दातून जे व्यक्त होतं
त्या नितांत सुंदर मनावर
.
तरीही विचारायचं खरतर
एक गेलंच आहे की राहून
समोर गच्चीत मी पांढर्‍या शर्टात
तूही घे ना एकदा मला पाहून..!!
.
.
.
:कल्पना विलास
सौ. अनुराधा म्हापणकर

वटपौर्णिमा..

या वर्षीही मी वटपौर्णिमा करणार आहे
दरवर्षीप्रमाणे उपवाससुद्धा धरणार आहे
वडाला नित्यासारखे फेरेही घालणार आहे
जन्मोजन्मी तुलाच देवाकडे मागणार आहे
.
पण यंदा देवाला काही अट घालणार आहे
अट घालूनच मग मी वट पूजणार आहे

नाही रे तसं नाही .. तू नाही झालेलास मला वर्ज्य
थोडा हवाय बदल फक्त म्हणून करणार आहे अर्ज

सांगेन -येणारे सारे जन्म मला, तुझा नवरा होता यावे
आणि बायको म्हणून किनई तुझे, माझ्याशी लग्न ह्वावे

तुला मग माझी नवरेशाही मस्त दाखवीन म्हणते
या जन्मीचा सारा हिशोब चोख चुकता करीन म्हणते

वट पूजशील ना जेव्हा तू.. माझा शब्द तुला स्मरेल
बायको होणं सोप्पं नसतं बरं ..तुला तेव्हाच ते कळेल..!
.
.
टिपिकल बायको..!
सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, March 30, 2008

पेपरवेट...

समोरच्या फडफडणार्‍या कागदावर एक हात
पेपरवेट सारखा ठेवून बसलीय मी कधीची
ना पेनातून सरसरून शाई झरु पहाते
ना कागदावर ती शब्दांची रांगोळी नेहमीची

बाहेर पडताना येताहेत
शब्द असंख्य कोलमडलेले
एकेका शब्दाला उभे करत
कसे बसे मी सावरलेले

का आज अशी शब्दांची वेल माझ्या
हिरमुसलेली .. उदास आहे...
क्षणिक म्हणावे हे सारे की
चिर:कालिन हा र्‍हास आहे..?

समोरच्या कागदाची
ती असहाय्य फडफड
आणि माझ्या निरिच्छ मनाची
ती केविलवाणी तडफड....!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर .

Thursday, March 27, 2008

विसरशील का..??

माझेच शब्द कानात घुटमळताहेत.. माहितेय मला..
त्या लडीवाळ शब्दांना अबोल करशील का..

मी समोर नकोशी झालीये तुला.. पण
डोळ्यासमोर मात्र तुझ्या.. माझाच चेहरा अहोरात्र
ती प्रतिमा कायमची पुसशील का

माझा स्पर्श टाळशील रे.. पण
मनाला मी स्पर्शून गेलेय तुझ्या...
तो स्पर्श पुरता परतवशील का

दूर जा म्हणतोस खरा.. पण
प्रत्येक श्वासात तुझ्या.. माझाच गंध आहे
उश्वासाबरोबर त्याला मुक्त करशील का..

मीच आहे रोमा रोमात.. अणु रेणुत
रक्तात .. नसा नसात भिनलेली.. पूर्ण अस्तित्वात...
माझे अस्तित्व तुझ्यापासून वेगळे करशील का

सारे सारे जमून जाईल.. पण..
विसरशील का? सांग.. मला तु विसरशील का..??
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, March 24, 2008

एक टिंब..

एक टिंब.. खरतर त्याहूनही छोटं माझं अस्तित्व..
पण शुद्ध हरपताना कळलं...
मी टिंब न्हवे.. बिंदू आहे..
आणि बिंदूही नव्हे.. केंद्र बिंदू आहे
सार्‍याच्या केंद्र स्थानी स्थित मी..
सभोवती सारे माझ्या.. फेर धरलेले
एका ठराविक अंतरा वरून .. त्यांनी मला घेरलेले
मलाच नव्हतं जाणवलं त्यांचं सभोवती असणं..
माझ्या परिघात मला त्यांचं दाही दिशांनी जपणं ..
.
भान हरपतानाच अशी भानावर आले जेव्हा
परिघ जवळ करत सारे एकत्र होते जमत
आपल्या केंद्र बिंदूला जपायला सारे होते धड़पडत..
कदाचित त्यांनाही तेव्हाच.. हा साक्षात्कार झाला आहे..
त्यांना टिंब वाटत असलेली मी.. त्यांचा केंद्र बिंदूच आहे..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, March 21, 2008

फ़ॉर्वर्डेड एसएमएस नका पाठवू मला..

फ़ॉर्वर्डेड एसएमएस नका पाठवू मला..
नको ती इमेल्स सेँड टू ऑल केलेली
एखादी सुद्धा चालेल खुषालीची ओळ
पण माझ्याचसाठी असावी लिहिलेली

निमित्त कसलेही नसताना बोलायला
कधी करा फोन सहजच एका संध्याकाळी
कामासाठी फक्त नका आठवू मला
मिस्डकॉल तर नकोच कधीही आडवेळी

दोन ओळीचे सुद्धा चालेल पत्र
दोन दिवसांनी क्षेम- कुशल सांगणारे
स्पर्श ज्याला असतो आपल्या माणसाचा
त्या हळव्या भावना अलगद पाझरणारे

प्रेम करा थोडसंच.. चालेल..!
पण नाटकी नी बेगडी नको..
आतड्यातून करा माया..
इंटर नेटच्या जाळ्यातून नको..
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, March 18, 2008

बायपास

डबडबलेला घाम.. छातीतली धडधड
श्वासासाठी चालली दोन मिनिटांची धडपड

डोळे उघडले तेव्हा नाकात खुपसलेला प्राणवायु
आणि समोरच्या काचेवर लिहिलं होतं आय सी यु

काचेपलिकडून डोकावणारे अनेक धीर गंभीर डोळे
त्यातच दोन बायकोचेही पण त्या सर्वांपेक्षा वेगळे

डॉक्टर आणि नर्सेस सार्‍यांची उडालीये तारांबळ
बहुतेक मला जगवण्यासाठीच चाललीये ही धावपळ

मॅसीव होता झटका तरी आता स्टेबल आहे म्हणतात
कोण जाणे कशासाठी मग पळापळ एवढी करतात

एन्जोग्राफीत म्हणे सापडलेत तीन तीन ब्लॉक्स पक्के
परीक्षेत नाही जमले पण इथे सगळ्यात नव्वद टक्के

आता फक्त बायपास.. त्याशिवाय नाहीच उरला उपाय
जीवंत मला रहायचं असेल तर एवढा एकच आहे पर्याय

आज माझी बायपास.. बायकोला म्हटलं नको करून घेऊ त्रास
हां आलोच मी थोड्या वेळात, वाटेतल्या मृत्युला करून बायपास..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, March 13, 2008

मातीत पाय रोवून...

मातीत पाय रोवून
घट्ट उभी राहिले..
वाळुसारखी ती
सरसर निसटून गेली
मला दूरवर मागे ठेवून..
तरी अधांतरी
लटके पाय सावरत
मी पुन्हा स्वत:ला
उभी ठेवते घट्ट..
.
त्या मातीत कधी न कधी
उभी राहीनच मी पाय रोवून..
.
.
संस्काराचे बाळकडु
मुलाना पाजताना सुद्धा
निसटून जातात हातातुन..
माझी दोन पिल्लं
अशीच त्या वाळुसारखी..
अंधातरी लोंबकळणारे हात
आणि.. लटक्या संवेदना
दोन्ही सावरत..
मी उभी रहाते पुन्हा घट्ट..
.
माझीच माती ती...
कशी जाईल निसटून..!!!!
.
.
.
.
माती माय
सौ. अनुराधा म्हापणकर

जातोस ना.. जा...

जातोस ना.. जा...
अजिबात.. थांबु नकोस ..
जाताजाता साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..
निरोपाचा अर्धा हातसुद्धा हलवू नकोस..
कसली अपेक्षा नाही..
आणि आता तर
कसली इच्छासुद्धा नाही..
.
आई होण्याची किंमत
मोजेन मी एकटीच..
एकांताला माझ्या आता
वाचा फोडू नकोस..
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस..
.
.
तुझ्या आवडी निवडीसाठी
झिजत राहिले अखंड
स्वत:साठी जगेन उरलेले
हे स्वप्न तरी आता मोडु नकोस
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
.
.
जग तुझ्यावर हसेल..
कुपुत्र म्हणुन हिणवेल..
तरी डोळ्यांवरची झापडं
दूर सारु नकोस..
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
.
ऐक एकच शेवटचे..
पुन्हा त्रास नाही देणार
अशीच एके दिवशी मी
शेवटला श्वास घेणार..
कुडीतून सोडताना प्राण
तुला क्षमासुद्धा करणार
.
पण..
शपथ आहे तुला बाळा..
पाजलेल्या त्या दुधाची..
बेवारस राहुदे.. कलेवर माझे...
लोक लज्जेस्तवही मला
अग्नी द्यायला तू येऊ नकोस....
.
जातोस ना.. जा...
अजिबात थांबु नकोस ..
जाताना साधा वळूनसुद्धा पाहू नकोस..

.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, March 8, 2008

महिलादिनाची पोचपावती..

बाईपणाचे आज माझ्या - कौतुक तुमचे करणे नको
कर्तृत्वाचे आज माझ्या - वजन तुम्ही तोलणे नको
भरारीची आज माझ्या - झेप तुम्ही मोजणे नको
आजपुरतेच मला तुमचे डोक्यावर घेऊन नाचणे नको

नको आहे उदो उदो माझ्या स्त्री-आत्म् शक्तीचा..
नको आहे आरक्षणाचा- राखीव नियम सक्तीचा

बाईपण माझे - ते तुमचे मला जपणे नको
अबला सबला.. चिकटवलेली विशेषणे नको

उंच उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको
अमर्याद कर्तृत्वाच्या पायात बाईपणाची बेडी नको

उमलुदे फुलुदे ..नैसर्गिकच- संकरित कलमी फुलणे नको
आज खुलताना मनभरुन.. एरवीचे मन मारुन ते कुढणे नको
आज मखरात सजताना.. रोजचे अडगळीतले सडणे नको
आज मुक्त वावरताना -उद्या ते भर रस्त्यातले अडणे नको

महिलादिनी सलाम ठोकुनि वर्षभर उट्टे काढणे नको
आजच्या पुरते पाय धरून.. वर्षभर पाय ओढणे नको

पुरूष दिन केलात का साजरा कधी
मग महिलादिनाचीही महती नको
माणूस म्हणूनच जगू दे फक्त..
एकाच दिवसापुरती ही पोच पावती नको..
.
.

:मी फक्त एक माणुस..
सौ. अनुराधा म्हापणकर
:महिलादिन.मार्च ८, २००८

Thursday, March 6, 2008

'नवरा विरुद्ध बायको' ..?

नवरा हा नवराच असतो
बायको ही बायकोच असते
हक्काचे आणि प्रेमाचे
दोघांचे एकच जग असते

तिची धाव जरी माहेरच्या कुपणापर्यंत
तरी घरातल्या वीटेवीटेत तिचे अस्तित्व असते
तिच्या अस्तित्वानेच येतो घरी ओढल्यागत
जरी मित्राच्या घरी रंगलेली रात्र असते

लग्न करतात दोघे तेंह्वा
तो उताविळ नवरा आणि ती लाजरी नववधु
दोघही एकमेकां वर करत असतात
आंधळं प्रेम आणि नजरेनं जादू..

तालावर नाचवाताना ती
संसाराची लय सोडत नाही
नाचतो तो ही गप गुमान
तिची साधलेली लय बिघडवत नाही

कधी तो कधी ती
चुका दोघही करतात
तो चूकतो तंव्हा आणतो गजरा
ती चूकते तेंव्हा येते लाडात

मोलकरणीवर गेलेलं लक्ष
तिला आवडत नाही
आणि तिच्याकडे कोणी पाहिलं
तर त्यालाही खपत नाही

तिच्या तोंडी माहेरचा गोडवा
तो म्हणतो माझ्या आईच्या हातची चवच न्यारी
दोघांनाही असतात
आपापल्या माहेरची माणसं प्यारी

घरात असले दोघे
पेटलेलं भांडण असते
एक कोणी नसेल तर
न सोसणारी आठवण असते

जन्म दिलेल्या बाळांचे
त्यांना मिळालेले पालक्त्व असते
त्यांचे नाते ह्यामुळेच
अधिकच झाले परिपक्व असते

संकटातही दोघांना
एकमेकांची साथ सोबत असते..
कारण तुझं वेगळं-माझं वेगळं
अशी संकटांची वाटणीच नसते

कधी तांडव कधी मांडव
कधी तप्त ऊन कधी थंड छाया
आसुसलेल्या त्याच्या स्पर्शासाठी
तिची रसरसलेली काया

'नवरा विरुद्ध बायको'
कधी न संपणारं हे भांडण आहे
खरतर दोघांचही अस्तित्व
एकमेकांशिवाय अपुर्ण आहे

-सौ. अनुराधा सचिन म्हापणकर..
माझ्या नव-याशिवाय अपुर्ण..

अमृतांजन.....

झिरझिरित तलम साडीत ती कोमलांगी
मऊशार हिरवळीवर नाजूक पदन्यास करीत
एकेक पाऊल टाकत ती जवळ येऊन बसली
माझं डोकं हळुवार आपल्या मांडीवर घेत
आपली लांबसडक निमुळती बोटं
माझ्या केसांत फिरवत राहिली
माझ्या चेह-यावर झुकलेला
तिचा तो आरक्त चेहरा...
स्वर्ग सुख म्हणतात ते हेच का..?
तो रेशमी स्पर्श.. ते मधाळ हास्य..
आणि श्वासाश्वासातून बेभान करणारा
तो बेधुंद .. तिचा गंध...

.
.
.
भानावर आलो तेव्हा..
खोलीभर पसरलेला तो अमृतांजनचा वास..
आणि शेजारच्या उशीवर अमृतांजन चोपडणारी बायको..
.
.
मी गपकन डोळे मिटले..
आणि झपाझप त्या हिरवळीच्या दिशेने चालू लागलो...
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

...अभिनेत्री...

पापणीच्या कडेचा तो ओलावा
अलगद टीपत नाहीसा केला..
डोळ्यांचं लायनरही बिघडलं नाही
नी त्यावरची आय शॅडोही..
नवी पुटं चेहर-यावर चढवत
झुळुझुळत्या रेशमी साडीत
मी अशी काही वावरले..
खळी गालावरची सारखी करत
खळखळुन नुसती हसले
पुढच्याच क्षणी म्हणाले डायरेक्टर
मॅडम.. शॉट ओके.. !!
.
.
कळलं आत्ताच त्याच रोलसाठी
अवॉर्ड मला मिळालय
बेस्ट कॉमेडियन कॅटेगरीत
अव्वल मला ठरवलय
.
ऐकताच पुन्हा एकदा
भरून मला आले
ग्लिसरीनशिवायच डोळ्यात
अश्रू जमून गेले..
अपयशी ते.. प्रेम माझे ..
यशाचं माप पदरी टाकून गेले
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, February 22, 2008

भ्रष्ट...??

लाच ?.. छे हो छे.. अज्जिबात मी घेत नाही..
घेत तर नाहीच नाही आणि देतसुद्धा कध्धी नाही..

आजपर्यंत - खंडोबाची आन
कुणाकड़े काहीच नाही मागितले
म्हणाले बरेच.. तुमचा रेट सांगा
तरी कध्धीच नाही हो सांगितले

मग त्यानीच दिले खुषीने जे
मिठाईचे पुडे फक्त मी स्विकारले
खंडोबाचा प्रसाद तो..
म्हणुन नाही कध्धी हो नाकारले

हं.. पाजली कोणी वाईन शाम्पेन
तेव्हा कंपनी आपली नुसती दिली
आयच्यान सांगतो हो ..
फक्त तीर्थ म्हणुन अगदी थोडीशीच पिली..!

प्रेमाने दिली हो सोन्याची चेन
मन मोडवेना.. म्हणुन ठेवून घेतली
नाय हो नाय..माझ्या नाय
लेकाच्या गळ्यात प्रेमानेच घातली

कुणी दिले हि-याचे घड्याळ
अहो घड्याळ म्हणुन घेउन टाकले
वक्तशीर ना मी हाडाचा
म्हणुन हाताला माझ्या बांधून टाकले

मोबाइल दिला कैमेराचा कुणी
कित्ती नक्को नक्को तेव्हा म्हटलं
पार्टी रागावली म्हणुन घेतला
मला वाईटच की हो खुप वाटलं

भ्रष्ट या जगात सा-या
सत्यवान एकटा मी- तत्वे पाळतो
विकायला काढला हो देश भxxxनी
जीव माझा कसा तीळ तीळ जळतो..

.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

.........किंमत!!

'लव्ह एट फर्स्ट साईट' म्हणतात
ते झालं मला प्रेम..
पलीकडे त्यालाही तसच
वाटलं सेम टू सेम ..

तो तसा धेड़गुज़री
मीही अर्धवट वयातली
मला भासला तो राजकुमार
त्याला मी परी.. स्वप्नातली

कोलेजच्या नावाखाली मग
रोजच लागलो भेटायला
समुद्रासमोरच्या खड़कामागे
प्रेम लागलं फुलायला

आईबाबांच्या बाजूला बसून
चैटिंग केलं ऑनलाइन
वेब-कैम मधूनही भेटलो
देतघेत एकमेकाना लाइन

नशा होती ..कैफ होता
तारुण्याचा मस्त उन्माद होता
जन्म दाते .. नी सा-या जगाशी
पुकारलेला मी वाद होता

आई-बाप हतबल ..मग
विनवण्या झाल्या.. बंधन आले
साम दाम दंड भेद - त्यांचे
सारे उपाय करून झाले

आली ती रात्र तेव्हा
डोक्यावर चढलेली धुंदी होती
गहाण पड़लेली अक्कल माझी
आणि झाडापासून तुटलेली फांदी होती

मिट्ट काळोखात उम्बरा ओलांडताना
माझी पापणीसुद्धा ओली झाली नाही
हं.. मोजतेय त्याचीच किंमत अजून
आयुष्यात सकाळच पुन्हा झाली नाही..!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, February 15, 2008

बाबा.. तुम्हाला श्रद्धांजली...


बाबा.. तुम्ही गेलात...
आणि.. कळून चुकलं..
तुमच्यासाठी दोन शब्द लिहायचीही..
तुम्हाला श्रद्धांजली वाहायचीही..
लायकी नाही आमची..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

खुजे आम्ही.. तुम्ही वट वृक्ष होतात..
आम्ही पारंब्यानाही तुमच्या कधी धरले नाही
उन्मळलात आता - तरी पाळेमुळे रुजलेली खोलवर
स्वत:चे पायही जमिनीवर आम्ही नीटसे रोवले नाही

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

दु:खिताना आनंदवन देणारे तुम्ही..
स्वत:च्या घरातही आम्ही अद्याप आनंद फुलवलेला नाही..
पिडितान्चे पितृत्व खांद्यावर घेणारे तुम्ही..
आणि आमच्याच मातृपित्याला वृद्धाश्रमि धाडणारे आम्ही..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे..

स्वत:च्या अंगी प्रयोग म्हणून
विषाणू घेतलेत महारोगाचे टोचून..
लोभ, कपट, अहंकार, मत्सर.. नामक
किडे कीटक मिरवतो आम्ही शरीरातून..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे

घुडगे टेकून नतमस्तक तुम्हापुढे..
उरले एकच परी मागणे..
आनंदवन अपुल्या घरापुरते तरी
शक्य होऊ दे आम्हा जपणे.........
.
.

:आनंदवनात माझ्या..
:मी..
:सौ. अनुराधा म्हापणकर.

Wednesday, January 30, 2008

गणितच सारे चुकलेले..

त्या वळणावर त्याची नि माझी
अवचित घडली भेट
माझ्या चेह-यावर रुतलेली
त्याची नजर थेट..

उगाच घुटमळलेली आणि
थबकलेली ही पावले
नको म्हटले तरी का पुन्हा
भुतकाळात मी धावले

ती बोचरी नजर चुकवणारा
चेहरा माझा बावरा
मुलाला कडेवर घेतलेला
सोबत माझा नवरा..

ओळख कशी करून द्यावी
काय सांगू नव-याला..?
मुलाला माझ्या काय शिकवू
मामा की काका म्हणायला..?

वाटले सारे मी विसरलेले
संसारात होते रुळलेले ..
येताच तो सामोरा मात्र
का गणितच सारे चुकलेले..?
.
.
.
कल्पना विलास..
सौ. अनुराधा म्हापणकर
30-01-2008.

Monday, January 21, 2008

आई होण्या आधी ......

आई.....मला तुला काही सांगायचय..
मी सांगितलेलं तुला कळलं की नाही..
ते तुझ्या डोळ्यात वाचायचय
तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून
तुला जीवापाड जपायचय..
तुझ्या कुशीत शिरून स्वत:ला विसरायचय
तुझ्या असंख्य ऋ णांचं ओझं खांद्यावरुन मिरवायचय
आणि ते कधीच फेडता येणार नाही म्हणून स्वत:ला लाजवायचय..
जगातलं सारं सुख तुझ्या पायाशी लोळवायचय
तुला समाधानाने हसताना पुन्हा पुन्हा पाहायचय
तुझ्याच साठी शब्दांना काव्यात बांधायचय
आणि हे काव्यपुष्प तुझ्या चरणी अर्पायचय
देवा आधी तुझ्यापुढे नतमस्तक व्हायचय
तुझ्या मनातल्या स्वप्नांना सप्त रंगात रंगवायचय
तुला खरं नाही वाटणार कदाचित
पण तुझ्यासाठी खूप खूप काही करायचय..

विश्वास ठेव आई..
जरी संसारात पडले आणि पतिप्रेमात गुंतले..
नोकरीत अडकले आणि जगरहाटीत मिसळले..
तरी मी तुझीच तुझ्याच कुशीत अंकुरले..
तुझ्या मायेने लाडावले.. तुझ्या सात्विक आहाराने दृढ झाले
तुझ्या धाकात वाढले ..तुझ्या संस्कारात सुसं स्कृत झाले
तुझ्या पोटी जन्म घेऊन अगदी धन्य धन्य झाले..
.
तू खूप काही दिलस.. तरी आज पुन्हा तुझ्याकडे मागायचय
तू चालवलेलं हे मातृत्वाचं व्रत मलाही आता चालवायचय...
म्हणुनच आई.. आई होण्या आधी तुझ्या आशीर्वादाला वाकायचाय..

.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

चुक तशी माझीच होती..

फूल देताच हातात तू
आई ग .. का टचकन टोचला काटा..?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
टोचून घेण्याची सवय माझी तशी फार जुनीच होती..

स्तुतीसुमने उधळताच तू
बाई ग.. का म्हटलं मी पुरे तेव्हा.. ?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
कौतुकाचे शब्द माझ्यासाठी?.. वेळ तशी पहिलीच होती..

दिलेस हाती हात जेव्हा..
हं!.. का सोडवुन घेतले मी हात माझे..?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
संस्कार बिंबवलेल्या मनाची तशी तयारीच कुठे झाली होती

विचारलेस मला.. लग्न करशील का माझ्याशी..
अरे देवा!.. का थिजले ओठातच शब्द.. ?
नाही रे .. तुझी नाही ..चुक तशी माझीच होती..
स्वप्नांची पूर्तता होताना शुद्धच माझी हरपली होती...
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर.

"पती परमेश्वर.. ?"

.
लग्नानंतर नव-याला जेव्हा
नावाने मारली हाक
बाया बापड्यानी सासरच्या
मुरडले तेव्हा नाक

शिकवले काही नाही म्हणे
हिला आईच्या घरी
नवराही बायको अशी
चालवून घेतो बरी..?

माहेरच्या संस्कारांपुढे
पडलं होतं प्रश्न चिन्ह..??
ऐकून ते सारे आरोप
मन झालं होतं सुन्न

काही झालं तरी मला मात्र
अजिबात नव्हते झुकायचे
सखा-प्रियकर झालेल्याला
नवरा नव्हते बनवायचे

एक काकू म्हणाली मला
पती असतो ग परमेश्वर..
एकेरीचा उल्लेख करताना
थोडातरी विचार कर

ठीक म्हटलं.. मान्य काकू..
नवरा माझा देव आहे..
देवाचाही उच्चार पण
एकेरीच ना सदैव आहे..?

तेव्हापासून काकू माझ्याशी
थोडं अंतर ठेवूनच वागत असतात
"श्रीधर"पंताना मात्र "श्री" च म्हणत
काकू म्हणे हल्ली लाजत असतात...
.
.
.
.
.
सौ. अनुराधा सचिन म्हापणकर

वांझोटी....

मी एक शापित स्त्री..

हो..शापच आहे मला
नियतीने दिलेला..

नशिबानं सारंच अगदी भरभरून मला दिलय..
मात्र मातृत्वाचं दान मला नाकारण्यात आलय..

फुटक्या नशिबाचं माझ्या.. कळलं खरं कारण
जिवंतपणीचं ओढवलं तेव्हा.. माझ्यावरच मरण

लादलं गेलं माझ्यावर .. माझ्या नव-याचं अपुर्णत्व
नियतीनं म्हणुनच मला.. नाकारलं होतं मातृत्व

नव-याला हल्ली माझ्या सहानभूती फार मिळते..
मी मात्र हताश ... एका वांझोटीचं जीणं जगते..

.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, January 12, 2008

चालतच राहा...पण...

मुलगी वर्षाची झाली
माझं बोट सोडून चालू लागली..
एक एक पाऊल टाकू लागली..
म्हटलं बाळे .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल..
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
लाडके .. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगी सोळा वर्षाची झाली..
हा हा म्हणता वयात आली..
शाळेच बालपण सोडून
कॉलेज कुमारी झाली..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
प्रत्येक नजर पारखून घे..
प्रत्येक स्पर्श चाचपून घे..
.
स्वत:च जपायचं स्वत:च पावित्र्य..
काचेसम जपायचं स्वत:च चारित्र्य..
कारण
अडखळणं धडपडणं
आता मानवणार नाही..
न भरणा-या जखमेचा व्रण
तुला सोसवणार नाही..
.
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
लाडके .. चालतच राहा... पण जपून...!!
.
.
.
.
मुलगा वर्षाचा झाला
माझं बोट सोडून चालू लागला..
एक एक पाऊल टाकू लागला..
म्हटलं बाळा .. चालत राहा..
थांबू नकोस.. पावले टाकत राहा..
अडखळशील धडपडशील..
आपल्याच पायात अडकून पडशील..
लागेल.. दुखेल..
पण जखमेवर खपली धरेल
राजा .. थांबू नकोस.. चालतच राहा...
राजा.. थांबू नकोस.. चालतच राहा...
.
.
मुलगा सोळा वर्षांचा झाला..
हा हा म्हणता वयात आला..
शाळेतच बालपण सोडलं होतं..
कॉलेज कुमार होताच नव्याने तरुण झाला..
म्हटलं सावकाश जपून..
एक एक टाक पाऊल..
नजरेत स्वत:च्याच घसरू नकोस ..
स्पर्शाने घृणा पसरू नकोस..
.
प्रत्येकाचं जपशील जर पावित्र्य..
निष्कलंक राहिल तुझंही चारित्र्य..
कारण
अडखळेल.. कोणी पडेल जर तुझ्यामुळे
तुझं तुलाही मग सावरता येणार नाही..
न भरणा-या जखमेचे व्रण देऊ नकोस हं कुणाला
तुझी चूक मग तुलाच सुधरणार नाही..
.
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
राजा .. चालतच राहा... पण जपून...!
.
.

सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, January 8, 2008

त्या पाच जणी .. मैत्रिणी..

त्या पाच जणी..
सख्या मैत्रिणी..
कॉलेज कट्ट्यावर त्यांनी..
गायिली होती गाणी...
खळखलून उगाच हसताना
डोळ्यातून येई पाणी...
.
.
कॉलेज संपलं .. संपला तो सहवास..
संसार.. नोकरी.. सुरु झाला नवा प्रवास..

सुन-बायको-आई..रूपं करावी लागतात धारण..
हसण्यासाठी आताशा शोधावं लागतं कारण ..

रोज नवी समस्या हात जोडून असते उभी ..
सोडवताना वापरायची नित्य नवी खुबी..

पाची दिशाना सा-या आता -कुठे ते भेटण..?
अल्लड थिल्लर उनाड आता कुठे ते वागण..?
.
.
तरी दहा वर्षानी तो योग महत्प्रयासाने आला जुलुन..
फोन ईमेल झाले पन्नास- तेंव्हा गेल्या सा-या जमून..

दहा वर्षाचं साचलेलं हसू .. मग उगाच त्या हसल्या..
कॉलेजचे ते उनाड दिवस पुन्हा पोटभर एकदा जगल्या..

चार घटका एकत्र..सा-याचं एक आयुष्य होतं..
पुढच्या काही दिवसांसाठी मिळाल टॉनिक होतं..
.
.
हसता हसताच निरोप घेताना ..गळा त्या भेटल्या ..
पाच वेग़ळी आयुष्य जगायला मग.. वाटेला त्या लागल्या ...!!!
.
.
.
एक मैत्रीण..
मी..त्यांच्यातलीच..
सौ. अनुराधा म्हापणकर.

तू धरशील हात.. म्हणुन

तू धरशील हात
म्हणुन झोकून दिलं बिनबोभाट
तू धरलं नाहीस..
आणि..
पडतानाही सावरलं नाहीस

तू पुसशील डोळे
म्हणुन आवरली नाहीत आसवे..
तू डोळे पुसले नाहीस..
आणि..
ओघळणारे अश्रुही पाहिले नाहीस

तू असशील सोबत
म्हणुन राहीले जगत
तू साथ दिली नाहीस
आणि
मला सोबतही घेतले नाहीस

असाच जन्म गेला वाया
तुझी वाट पहाता पहाता
आणि मग..
जगता जगता एक दिवस संपुन मी गेले..
पण ..
माझे संपणेही गेले व्यर्थ..
माझे 'नसणे'ही तुला कळले नाही...........:सौ. अनुराधा म्हापणकर

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

ईमेल वर पाठवतो ई-ग्रीटिंग्स
कोणाच्या गाठीभेटी मात्र घेत नाही
ओर्कुटवर पाठवतो कलर स्क्रॅप्स
समोर आलो कधी- तर ओळखतसुद्धा नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

औन लाइन चाटवर आम्ही सदैव हजर
ओह.. क्रॅप.. समोर आलो तर मात्र बोलत नाही
बोलाचीच कढी.. नेट्वर आणि बोलाचाच भात
भेट.. गिफ्ट्स प्रत्यक्षात आम्ही कधीच देतघेत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

पत्रा-बित्राचा जमाना गेला कधीच
पोस्टाला (ऊप्स.. ते काय असतं) आम्ही त्रास देत नाही
फोनवर बोलायला आहे कुणाला वेळ
"न्यू यीअर विश"चा फोनही आम्ही करत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..

'थर्टी फर्स्ट'ला मात्र रात्रभर चालते आमची पार्टी
एखादं वर्षही अजिबात चुकवत नाही..
वेळ काढून मुद्दाम एसएमएस करतो ना फॉरवर्ड
सेंड टू औल झटपट.. एकाचे नावही सुटत नाही

सध्या आम्ही खूप बिझी असतो हो..
कुणाकडेच आम्ही जात येत नाही..
.
.
.
एकदमच बिझी..
सौ. अनुराधा म्हापणकर

विळखा......

ते वादळ अक्राळ विक्राळ..
समोर उभा ठाकलेला प्रत्यक्ष काळ..
उसळलेला महापुराचा तो भयाण डोह..
आणि त्यात वहाणारे अनेक अचेतन देह..

त्या तांडवातही एक झाड
जमिनीला अगदी घट्ट धरून
त्यालाच विळखा घालून तीही
जीवनाची शेवटची कास पकडून..

घरात दारिद्र्य अठरा विश्व
रोजचं पाहिलं मरण
मनातल्या मनातच कितीदा रचलं
आपणच आपलं सरण..

आज घर पाहिलं वाहताना..
बहुदा आय- बा नि भैणही
दूर दूर पर्यंत आहेच कुठे
वाचवणारी साधी वेलही..

बधीर सा-या संवेदना
मन झाल होतं सुन्न
तरी ही धडपड कशासाठी
तिलाच पडला होता प्रश्न..?

मरणप्रायच होतं जगणं जरी
जगायलाही नव्हते काही कारण
हाताची पकड तरी करून घट्ट..
मरणाचं नाकारलं तिने आमंत्रण..!!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर