Tuesday, August 31, 2010

कितितरी दिसांत तो, आज दिसला ग बाई

कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
पानांआडून खट्याळसा
आज हसला ग बाई

..................त्याच्या येण्याने ग अशा
..................उजळल्या दाहि दिशा
..................त्रिभुवनाची बघ कशी
..................हसली ग रेषा रेषा
.
काळा काजळी काळोख
त्याने पुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................सखे, मनात ग तुझ्या
...................भलभलते विचार
...................नाव कुणाचे पुसशी
...................उगा असे वारंवार
.
बघ तोही मजवरी
आता रुसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
...................डोंगराच्या पलिकडे
...................त्याचे आहे एक गाव
...................तुझ्या कानात सांगते
...................गडे "सूर्य" त्याचे नाव
.
एक माणूस कस्सा ना
आज फसला ग बाई
कितितरी दिसांत तो
आज दिसला ग बाई
.
.
अनुराधा म्हापणकर
ऒगस्ट २८, २०१०
A Bright Sunny Day
after a Long time, in Mumbai !

Thursday, August 19, 2010

एक उसासा फक्त


एक उसासा फक्त

बरंच काही बोलून गेला

किती हळव्या भावनांना

एका श्वासावर तोलून गेला


.

आता शब्दांना काही

बोलणे स्फुरलेच नाही

तरी ते बोलिले बापुडे

अर्थ त्यात उरलेच नाही


.

विरला तो उसासा हवेत

उगा श्वासात बोटे खुपसू नका

पसरले शब्द - भास खोटे

उगा भाव त्यातूनी उपसू नका


.

सारे आता शांत संथ

श्वासांनाही साधलेली लय आहे

शब्द आणि श्वास… !

त्यांची रोजचीच ही सवय आहे


.

अनुराधा म्हापणकर


Wednesday, August 18, 2010

श्रावण..!


















उन्हे उलटता, सांजवेळी
श्रावण ओल्या घनात
दाटून आले आभाळ सारे
पावसाच्या काय मनात


रिमझिम रिमझिम झिरमिरती
इवलेइवले तुषार
हळूच मागून खोडी काढी
वारा किती हुशार


उघडीप झाली मेघाआडूनी
तळ्यात चमचम बिंब
तिरिप कोवळी पिवळीपिवळी
पानांत टपटप थेंब


श्रावण सा-या चराचरांत
नवचैतन्याचा पूर
अलगद जैसे मनात कोणी
छेडत राही सूर


: अनुराधा म्हापणकर