Friday, August 14, 2009

हू केअर्स..!!

आज फ़ीवर आहे...
इनडीपेन्डस डे फ़ीवर..

आज लोड होतील अनेक
पेट्रिऑटिक व्हिडीओज..
प्रोफ़ाइल्सचे बदलतील कँप्शन्स..
फुटतील देशभक्तीचे धुमारे..
गाडी गाडीवर.. हातात सुद्धा
इवले इवले कागदी झेंडे
आणि..

परवा तोच तिरंगा..
असेल कुठेतरी, धूळ खात
कोपर्‍यात.. अडगळीत
किंवा... कुठेही..
अगदी कुठेही..

आणि
मनातली देशभक्तीसुद्धा
तशीच अडगळीत.. कोपर्‍यात
किंवा निद्रिस्त..

हू केअर्स..!!
शोधू ना पुन्हा तो तिरंगा
आणि नवे व्हिडीओज..
२६ जानेवारीला..!सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, August 6, 2009

तटस्थ मी.. त्रयस्थ मी..

एखादं मोठ्ठं बिझिनेस डील
नोकरीत मिळवली बढती वाढ
आठवतंच नाही शेवटचे केले कधी
माझ्याचे लेकीचे मी भरभरून लाड

ओव्हर नाइट रोज लेट सिटींग्ज
कॉन्फ़रन्सेस अन ऑफ़िस मिटीन्ग्ज
लक्षात ठेऊनही द्यायचे राहूनच गेले
सख्ख्या बहिणीला बर्थडे ग्रीटिन्ग्ज

जातायेताना आई समोरच दिसते
क्वचित कधी दबक्या आवाजात खोकते
"औषध घेतेस ना वेळेवर" विचारेन तर
आठ चाळीसची ठरलेली लोकल चुकते

विकली रिपोर्ट्स अगदी वेळेत दिले
परफ़ॉर्मन्सने बॉस अगदी खुष होऊन गेले
सहा महिने माझी वाट पाहून शेवटी
रुटिन चेक-अपला बाबा एकटे जाऊन आले

बाहेर पडताना दिसतात शेजारचे काका
हल्ली काठी घेऊन बिचारे फिरत असतात
नेहमीसारखा माझ्या कानाला मोबाइल
दाताच्या कवळीतून तरी ते हसून बघतात

किती दिवसात स्वत:च्याच घरी
समोरच्या भिंतीवर पोपडा पाहिलाच नाही
या पावसात गळतंय सीलिन्ग पण
माझ्यात मायेचा ओलावा राहिलाच नाही

प्रत्येक सरत्या क्षणाला कँश करुन घेताना
माझ्यात गुंतलेले कितीक धागे तुटताना
तटस्थ मी.. त्रयस्थ मी..
खूप पुढे निघून गेलोय.. खूपच पुढे..!
खूप उशीर होण्याआधी
एकदातरी मागे वळून पहावं का..?


: सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, August 2, 2009

संदर्भासहीत स्पष्टीकरण

.
शाळेच्या प्रश्नपत्रिकेत
हमखास असायचा हा प्रश्न..
धड्यातलं एखादं वाक्य
आणि त्याचा संदर्भ देत
द्यावं लागायचं स्पष्टीकरण..
..संदर्भासहीत स्पष्टीकरण!

आता
रागात.. वादात..
अस्सच निघून जातं
एखादं बेसलेस वाक्य..!

आणि मग..
शांत झाल्यावर..
थोडंसं धुम्मसताना
मी तुला आणि
तू मला द्यायचे
'त्या ' 'त्या' वाक्यांचे संदर्भ
आणि.. मागायचे..
स्पष्टीकरण..!
संदर्भासहित.. स्पष्टीकरण!

शाळा संपली.. तरी
प्रश्नपत्रिका काही सुटत नाही..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर