Friday, June 18, 2010

बेस्ट ऒफ फ़ाइव्ह

अरे वा ! ९३ - ९५ - ९८ टक्के
मार्कांच्या राशी.. एडमिशन पक्के!

कीप इट अप .. वेल डन..
खूप छान.. अभिनंदन..!

आता एकच भीती... फक्त
आयुष्यात यापुढेही सगळं..
अस्सच... अगदी अस्सच
"बेस्ट ऒफ फाइव्ह" मिळेल ?

: अनुराधा म्हापणकर.

Wednesday, June 16, 2010

देवकी

हे कान्हा…
तू माझा की यशोदेचा
मला प्रश्न नाही पडलेला
माझ्या मातृत्वाचा श्वासही
तुझ्यासाठी नाही अडलेला

तरीही काही प्रश्न आहेत..
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

न मागताही तुझ्यासम दैवी रुप उदरी आलं
म्हणून भाग्याने मी उजळायचं,
की
तुला जन्म देऊनही वांझोटपणच पदरी आलं
म्हणून दैवावर मी उसळायचं...
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

"राम" म्हणून तू जन्म घेतलास तेव्हाही..
"कृष्ण" म्हणून माझ्या उदरी आलास तेव्हाही
तू त्राताच होतास..
कर्त्यव्य तत्पर.. जगाचा, युगाचा
उद्धारकर्ता होतास ...

तेव्हा वनवासात गेलास ते,
पित्याच्या वचनपूर्तीसाठी..
की रावणाच्या पापविनाशासाठी..?
आताही जन्म घेतलास तो
कंसाच्या दुष्कृत्याच्या विनाशाचे
लिखित होऊनच..!

कारण कुठलेही असो..
तेव्हाही.. तसेच..
कौत्सल्याराणीचे पुत्रवियोगात रडणे
आणि आताही
देवकीचे तुझ्यासाठी व्याकुळ होणे
प्रत्येक वेळी ..
आईची कूसच का पणाला लावलीस
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?


: अनुराधा म्हापणकर

Wednesday, June 9, 2010

पहिला पाऊस

आला पहिला पाऊस
धरा झाली चिंब ओली
कोणा सुचली कविता
कोणी लिहीली चारोळी

कोणी प्रेमी झाडामागे
होते झालेले बेभान
तिचे ओलेते सौंदर्य
आज आले मोहरून

तापलेली वसुंधरा
शांत थंड झाली थोडी
नभातूनी बरसली
धार अमृताची गोडी

आली निश्चिंती निवांत
आता भरतील तळी
अशी फुलली म्हणोनी
जनसामान्याची कळी

तरी जीवा नाही थारा
आहे घोर परी चिंता
कशी उडालेली दैना
एक सर येता येता

त्रेधा चालताना पाय
खड्डयांत अडखळती
कुठे पाण्यांची डबकी
कधी भिंती कोसळती

कशी ट्रेन लेट आली
कुठे रुळ उतरले
आणि सबवेत पाणी
उगा ट्राफिक फसले

तो आहे "मुंबईकर"
नाही नशिबी सुटका
ऊन असो की पाऊस
त्याला सदैव फटका
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर