Monday, December 21, 2009

ऊठ ना..रे....

ऊठ ना रे - बघ ना - किती वाजले
त्याच्या कानात, तिचे शब्द कुजबुजले

कूस परतत म्हणाला- थांब ग
अम्मळ थोडं निजू दे
पहाटेच्या ओल्या दवाने
तुझं अंग अंग भिजू दे

ती रुसली-मुसमुसली- म्हणाली
अस्सं रे काय - आज का आळस ?
लगबग झाली चहुदिशां परी
सा-या देवळांचे अंधारलेले कळस

रोज उठतो ना ग वेळेवर
सोमवार शनिवार रविवार सुद्दा !
एकदा आला कंटाळा मला
तर किती ऐकवशील अद्वातद्वा !

ती आली काकुळतीला
म्हणाली, नाही रे - तस्सं नाही,
मला किनई मनापासून
तुला अजिबात त्रास द्यायचा नाही

बघ, रुसलास ना ! …………
अनादि काळ तुझ्यामागे रुंजी घालतेय
आणि तुझ्याभोवताली अथक फिरतेय..
मान्य मला..
तुझ्याशिवाय वेगळाले अस्तित्व नाही
माहीत आहे तुझ्याविना -
माझ्या असण्यालाही महत्व नाही

म्हणूनच म्हणते…हे सूर्यनारायणा,
माझ्यासाठी तरी आता ऊठ ना रे…

अनावर झोपेचा मोह
जरी आवरता आवरेना
पृथ्वीचा लाडिक हट्ट..!
त्याला मोडता मोडवेना

आपल्या सहस्त्रबाहूंनी त्याने
तिला आलिंगन देऊ केले..
आणि दाहिदिशा उजळून निघाल्या..!


: सौ. अनुराधा म्हापणकर


डिसेंबर २१, २००९
(आज सूर्य उशीराच उगवला !)

Monday, December 14, 2009

खरं ना ??

खरं सांगू का
तसं.. फारसं कंटाळवाणं नाही आयुष्य !

तस्स रुटिन.. कामाला जुंपलेलं
तरी विकेन्डला विरंगुळा जपलेलं

एखादं हटके नाटक, सीसीडीतली कॊफ़ी
मल्टिप्लेक्समधे नुकता रीलीज्ड मूव्ही

मॊल, हॊटेलीन्ग, शॊपिन्ग्ज..
वर्षाकाठी गेट टूगेदर्स, गॆदरिन्ग्ज

झालीच तर एखादी प्लॆन्ड सहल
अगदीच नाहीतर निदान वर्षासहल

लग्न.. मुंज.. सण समारंभ
नव्या प्रोजेक्टचा झोकात आरंभ

चाललंय तस्स उत्तमच !
कुठे काही उणं धुणं.. नाहीच !

पण तरी कोणजाणॆ का … काही खुपतच !
कुठेतरी आतल्याआत.. काहीतरी दुखतच !

कदाचित सोशल खूप झालोय..!
बाहेरच्या गर्दीत मिसळून गेलोय ..!
आणि…
जीवाभावाच्या माणसांशी मात्र..
संवाद हरवून बसलोय़ !
खरं ना ??


सौ.अनुराधा म्हापणकर

Tuesday, November 10, 2009

स्पीड

----------

थोडंसं हळू रे..
आपण खूपच वेगात आहोत
खिडकी बाहेर बघ ना
सरसर मागे पडणार्‍या
क्षणात दृष्टीआड होणार्‍या
अनेक चित्र चौकटी...
एकावरही नजर ठरत नाही

हो..
खरच स्पीड पकडलाय खरा
जाणवतात मलाही त्या
मागे मागे पडणार्‍या फ्रेम्स.. पण
प्रत्येक चौकटीवर नजरेनं ठरावं
हा अट्टाहास कशासाठी
भविष्याच्या वाटेवर..
भूतकाळाचा ध्यास कशासाठी

आणि बाहेर पहाशील तर..
बघ ना.. नीट..
नव्या नव्या कितीक फ्रेम्स..
येताहेत नव्याने वाटेवर
आणि..
अनेक अनेक जण असेच पळताहेत
वेगात..!!!
हेच जगणं आहे..

बाहेरची प्रत्येक फ्रेम..
तुझ्या नजरेत यावी
म्हणून स्पीड कमी करेन तर
सगळे ओव्हर टेक करतील ग
आणि.. आता..
इतक्या स्पीडला ब्रेक लावला तर...?
.
.
..........................!!!!!सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, October 17, 2009

आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

.
दिवाळीच्या दिवसांत तेव्हा गुलाबी थंडी पडायची
आई उटणं लावायची तेव्हा अंगात शिरशिरी यायची
थंड वार्‍याची ती मंद झुळुक अंगाला आता झोंबत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

तेव्हा दाराबाहेर असायची एखादीच लुकलुक चांदणी..
टांगलेला शंखाचा कंदील कुठे कुणाच्या तरी अंगणी
झगझग दिवे लखलख तरी त्या तेजाची संगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

ते उटणे चंदनी सुगंधी, अभ्यंगस्नान ते मलमली
दरवळून जाई आसमंत, ती पहाटी असे मखमली
फर्स्टअटेम्प्टमधे कार्टंही अंगठ्याने दुभंगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

फुलबाजी कशी अगदी झिरमिरी पेटायची
फुटू की नको म्हणत बिचारी लवंगी फुटायची
कर्णकर्कश सारे आता पूर्वीची ती गम्मत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

चकली करंजी शंकरपाळी लाडू नी चिवडा मस्त
फराळ भरलेले ताट तेव्हा मिनिटांत होई फस्त
रोजची पिझ्झा टेस्ट आता जीभेवरून पांगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

वर्षातून एकदा दिवाळीला मिळायचे कपडे नवे कोरे
आता महिन्यातून दोनदा शॊपमॊलमधे होतात फेरे
अप्रूप को-या कपड्याचे आता कोणी कोणास सांगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही
.
.
झालंय अस्सं की दिवाळी न दसरा
आताशा रोजचाच होऊन गेला
पण ’तो नवा कोरा आनंद’ मात्र
आता आठवणीतच राहून गेला


सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, September 7, 2009

सायलेन्ट लेटर्स

'Know' तल्या 'K' सारखे
काही उद्गार सायलेन्ट असावेत..
'Know' मधे 'K' आहे
ते माहित असतंच ना सार्‍यांना..
पण त्याचा उच्चार 'क्नो' झाला तर ?
तो खटकतोच ना..!

तस्सच... आहे आयुष्य..!
प्रत्येक वेळी मनात येतं
ते बोलायलाच हवं.. असं नसतं..
न सांगता न बोलता
त्या सायलेन्ट 'के'चं असणं
समोरच्यालाही कळत असतं..

पण तो उच्चारला की खटकतो..!
म्हणून काही 'के' .. असेच..
मनात ठेवायचे.. ओठांत शिवायचे..(मनात आला विचार..
आणि लिहिलं काही बाही !
कवितेच्या नावावर
हे गद्य खपवणार नाही )
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, August 14, 2009

हू केअर्स..!!

आज फ़ीवर आहे...
इनडीपेन्डस डे फ़ीवर..

आज लोड होतील अनेक
पेट्रिऑटिक व्हिडीओज..
प्रोफ़ाइल्सचे बदलतील कँप्शन्स..
फुटतील देशभक्तीचे धुमारे..
गाडी गाडीवर.. हातात सुद्धा
इवले इवले कागदी झेंडे
आणि..

परवा तोच तिरंगा..
असेल कुठेतरी, धूळ खात
कोपर्‍यात.. अडगळीत
किंवा... कुठेही..
अगदी कुठेही..

आणि
मनातली देशभक्तीसुद्धा
तशीच अडगळीत.. कोपर्‍यात
किंवा निद्रिस्त..

हू केअर्स..!!
शोधू ना पुन्हा तो तिरंगा
आणि नवे व्हिडीओज..
२६ जानेवारीला..!सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, August 6, 2009

तटस्थ मी.. त्रयस्थ मी..

एखादं मोठ्ठं बिझिनेस डील
नोकरीत मिळवली बढती वाढ
आठवतंच नाही शेवटचे केले कधी
माझ्याचे लेकीचे मी भरभरून लाड

ओव्हर नाइट रोज लेट सिटींग्ज
कॉन्फ़रन्सेस अन ऑफ़िस मिटीन्ग्ज
लक्षात ठेऊनही द्यायचे राहूनच गेले
सख्ख्या बहिणीला बर्थडे ग्रीटिन्ग्ज

जातायेताना आई समोरच दिसते
क्वचित कधी दबक्या आवाजात खोकते
"औषध घेतेस ना वेळेवर" विचारेन तर
आठ चाळीसची ठरलेली लोकल चुकते

विकली रिपोर्ट्स अगदी वेळेत दिले
परफ़ॉर्मन्सने बॉस अगदी खुष होऊन गेले
सहा महिने माझी वाट पाहून शेवटी
रुटिन चेक-अपला बाबा एकटे जाऊन आले

बाहेर पडताना दिसतात शेजारचे काका
हल्ली काठी घेऊन बिचारे फिरत असतात
नेहमीसारखा माझ्या कानाला मोबाइल
दाताच्या कवळीतून तरी ते हसून बघतात

किती दिवसात स्वत:च्याच घरी
समोरच्या भिंतीवर पोपडा पाहिलाच नाही
या पावसात गळतंय सीलिन्ग पण
माझ्यात मायेचा ओलावा राहिलाच नाही

प्रत्येक सरत्या क्षणाला कँश करुन घेताना
माझ्यात गुंतलेले कितीक धागे तुटताना
तटस्थ मी.. त्रयस्थ मी..
खूप पुढे निघून गेलोय.. खूपच पुढे..!
खूप उशीर होण्याआधी
एकदातरी मागे वळून पहावं का..?


: सौ. अनुराधा म्हापणकर

Sunday, August 2, 2009

संदर्भासहीत स्पष्टीकरण

.
शाळेच्या प्रश्नपत्रिकेत
हमखास असायचा हा प्रश्न..
धड्यातलं एखादं वाक्य
आणि त्याचा संदर्भ देत
द्यावं लागायचं स्पष्टीकरण..
..संदर्भासहीत स्पष्टीकरण!

आता
रागात.. वादात..
अस्सच निघून जातं
एखादं बेसलेस वाक्य..!

आणि मग..
शांत झाल्यावर..
थोडंसं धुम्मसताना
मी तुला आणि
तू मला द्यायचे
'त्या ' 'त्या' वाक्यांचे संदर्भ
आणि.. मागायचे..
स्पष्टीकरण..!
संदर्भासहित.. स्पष्टीकरण!

शाळा संपली.. तरी
प्रश्नपत्रिका काही सुटत नाही..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Monday, July 27, 2009

उद्यापासून..

.
सक्काळची धावपळ
नऊ चारची लोकल
मधला लेडिज डबा..
आणि ठरलेली जागा
सीटसाठी क्लेम रोजचा
जमणारा फड गप्पांचा
कुणी अळू वडी..
गरम थालिपिठ
इडली कोणी उप्पीट

धावत गाठलेलं मस्टर
सही करतानाच सुस्कारा
रोजची केबिन, टेबल-खुर्ची
कळकट फाइल्सचा ढिगारा

संध्याकाळी ठरलेली वेळ
५.४० ची रोजची गाडी
स्टेशनात शिरतानाची
ती सफाईदार उडी

कधी पेपरावर, हलकी नजर
वाचन थोडे, ज्ञानात भर
मटार सोलताना गप्पा कधी
गुंड्यातली कधी विणली लोकर

सारं कसं मस्त.. होतं..
आयुष्या हसत सरत होतं
घराबाहेरही आपुलकीचं
माझं एक कुटुंब होतं

उद्यापासून.. मात्र...
हे सगळं अचानक थांबून जाईल

कारण
ऑफ़िसातून येताना आज
मी शाल श्रीफळ घेऊन येणार आहे
पस्तिस वर्ष केली नोकरी
आणि आज रिटायर मी होणार आहे


सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 21, 2009

'जनरेशन नेक्स्ट'

नको जबाबदारी नको बंधन
मंगळसूत्राची गेली आहे फ़ँशन
कशासाठी हवंय हे लग्न
आहे ना लिव्ह इन रिलेशन

थोडे दिवस मस्त एकत्र राहू
एव्हरी नाइट इज अ सेलिब्रेशन..
रेन्टल आहे फ़्लैट सुद्धा
रेशन कार्डाचंही नको टेन्शन..

मुलं बाळं पोरं ढोरं
एडमिशन्स आणि डोनेशन
नको असलेली प्रेग्नन्सी
आहे ना आय पील चे ऑप्शन

'जनरेशन नेक्स्ट'म्हणताना
आयुष्याला दिलीच नाही कमिटमेन्ट
भांडी बुडकुली, भिंतीशीही
कधी झालीच नाही अटाचमेंट

सारे तरी हे निर्जीव तसे
आता मनांचे गुंतणेही सरले
उगवत्या नव्या पिढीसाठी
आम्ही निवडुंगाचे बीज पेरले


सौ.अनुराधा म्हापणकरकुणाला पटतं.. कुणाला पटत नाही
तरी वाद घालावा, असं मला वाटत नाही

लग्न करुन तरी आयुष्यं कुठे मिळतात
लग्न केल्याने तरी मनं कुठे जुळतात

लग्न टिकली तरी त्यालाही असतो.. "पण"
खरतर असायलाच हवी मनांची गुंफण

ओनरशिपच्या फ्लॅटमधला संसार
आणि कायम एकत्र रहाण्याचा करार

प्रत्येक नाईट नसेलही सेलिब्रेशन
नव्या दिवसाला लागतं नवं रेशन

तरी प्रश्न मला पडतोच........

तडजोड म्हणून केलेला
"लिव्ह इन" चा तात्पुरता संसार ?
की संसारातली तडजोड आणि
"लाइफ टाइम" एकत्र राहण्याचा करार ?

कधी ती चुकते.. कधी तो..
पण तरी करार तुटत नाही
एवढ्या तेवढ्या कारणांनी
संसारातली साथ सुटत नाही

सोय म्हणून संसार मांडायचा
आणि गैरसोय होतेय म्हणून
सोयिस्करपणे मोडायचा..
की
संसार मांडून एकमेकांची
सोय पाहायची..
हा ज्याचा त्याचा प्रश्न..!!
नाही का ?...............

अनुराधा म्हापणकर

Thursday, July 2, 2009

स्विच..!!

तुझं आपलं बरंय..
तुझं आपलं बरंय..

लाडात येत मधेच
तुला रोमँटिक होता येतं
मग अचानक सणक येऊन
कामातही बुडता येतं

मला सावरताना तुला,
माझं टॉनिक होता येतं
स्वत:ला आवरता येत नाही,
आणि पँनिक होता येतं

स्विच ऑन.. स्विच ऑफ़..
कधीही..
तुला हवं तेव्हा..!

देशील का तो स्विच
हातात माझ्या..?
ऑन आणि ऑफ़, मग
मला हवं तेव्हा..!!


:सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, May 21, 2009

सुखाचा संसार

.
तो म्हणाला,
आकाशातून तो चंद्र आणतो उचलून
ती म्हणाली, वाट अडवून
नको, चंद्राला हेवा वाटेल मला पाहून

तो म्हणाला
ओंजळीत घेतो चांदणं, तुझ्यावर उधळतो
ती लाजली, म्हणाली इश्श्य..
नजरेच्या चांदण्यानेच जीव मखमाली होतो

तो म्हणाला
तुझ्यासाठी बांधेन संगमरवरी ताज महाल
ती म्हणाली, लटक्या रागात,
दहा बाय दहाची खोली झाडताना होतात हाल

तो म्हणाला
तुझ्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालू का
ती हसली, ओठांच्या पाकळ्यात
कशाला? उगाच फुलांना वाटेवर सांडू नका

जगावेगळं काही तिच्यासाठी
करण्यासाठी तो धडपडत राहिला
ती अडवत राहिली.. नेहमी
आणि संसार सुखाने भरुन वाहिला


:सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, May 15, 2009

तुझंही तस्संच

खूप गम्मत वाटते मला
क्षितिजावर टेकलेला सूर्य पहाताना
त्याच्या डोळ्यात थेट डोळे रोखताना

एरव्ही काय बिशाद
नजर उचलून पहायचीही
त्या तेजात नजर मिसळायचीही

पण धरेला स्पर्शताच कसा थंडावतो ना!

तुझंही तस्संच.. त्याच्या सारखं!
एरव्ही झंझावात तू..! पण..
माझ्या परिघात आलास की कसा..
मंद झुळूक होऊन वाहतोस ना..!

Friday, May 1, 2009

अशी भेट झाली..

.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..
मृगाची सर जणु ती
धरिणी चिंब न्हाली

तो स्पर्श ओळखीचा
ती नजर रोखलेली
खट्याळ त्या नजरेने
पापणी झुकून गेली....
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..

तो शब्द रोजचाच
स्तुति सुमने फुललेली
उधळताच आज का "ती"
पुन्हा मोहरून गेली
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..

आभाळीची सांजछटा
रंगून यावी गाली
लाजरी ती अबोली
आज मूक पुन्हा झाली....
.
तुझी नि माझी
अशी भेट झाली..
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, April 14, 2009

संवाद

मी खूप अडवलं
मी खूप थांबवलं
कोणीही ऐकत नाही
खरतर माझं
कोणालाच पटत नाही
खूप म्हटलं..
बोलून होऊ दे नं..
नका मधे मधे बोलू..
हसले सगळे..
चल.. वेडी कुठली.. म्हणाले
असं स्वत:शीच कोणी बोलतं का?
पण बोलायचय ना मला..
माझ्या मनाशीच.. !
नका ना डिस्टर्ब करु..?
छे...!
कोणी ऐकतच नाही..
बोलतच रहातात माझ्याशी
सारखं सारखं...! मधे मधे..!
खूप दिवस झाले..
मनाशी संवादच साधला नाही..!
.
.
खरतर..
मला स्वत:चं स्वरुप नाही समजून घ्यायचं
किंवा त्याला एखादं नवं रुपही नाही द्यायचं

थोडा तुटूदे तुटला तर
बाहेरल्या जगाशी संवादही नको
कुठल्या विराट अन् प्रगल्भ..
स्वच्छंद संवादाची सादही नको

माझं मनच साद घालतय.. कधी पासून
त्यालाच आधी प्रतिसाद देईन म्हणते..!
थोडा वेळ.. थोडाच वेळ..
थोडं स्वत:शीच बोलून घेईन म्हणते..!
.
.
कुठल्याही वैचारीक गप्पा नाही
कुठला आध्यात्मिक टप्पा नाही
साचून राहिलेला एकेक कप्पा आहे
तोच मोकळा करणे आहे..
बरेच दिवस जे घेतले नाही
ते क्षेम कुशल विचारणे आहे


कधी शोधते मी एकांत निवांत..
एखादा एकाकी कोपरा.. शांत शांत
पण फार अवाजवी मागणं आहे
कळतय मला..!

कदाचित म्हणूनच कधीतरी..
असंही करुन बघणार आहे
घराखालच्या बसस्टॊपवर
उगाच बसमधे चढणार आहे
पार शेवटच्या स्टॊपच तिकिट
आणि पुन्हा परतेन तशीच

ते दोन तीन तास..!
खिडकीत बसायचं..
डोळे बंद.. कानाला इअरफोन
मोबाइल स्विच ऒफ़्फ़..!
सभोवतालच्या गर्दीतही मग
अगदी एकटी असेन मी..
पोटभर बोलेन म्हणते, स्वत:शीच..!
खूप दिवस झाले..
मनाशी संवादच साधला नाही..!
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, March 28, 2009

वायरस

काल गुढीपाडवा..
त्या निमित्ताने कालच सिस्टीमवर हात मारला होता
अपडेटेड एन्टी वायरससुद्धा सिस्टीममधे पेरला होता

नको त्या जुन्या फ़ाइल्स डिलीट करून टाकल्या
काही नव्या उघडलेल्या छान एडीट करून ठेवल्या

म्हटलं आता थोडे दिवसतरी
पीसी दणक्यात चालेल..

आज पीसी ऒन केला…
छे..!

आज हवेतच कंटाळ्याचा वायरस आहे
सगळ्ळ कस्सं नको इतकं सिरीयस आहे

ओह..!
काल फुटलेल्या कोवळ्या पालवीच्या
फाइल्स सुद्दा उडल्यात
’उत्साह’ एन्टी वायरसच्या सा-या
सिक्युरीटीज त्याने तोडल्यात

शी…!!!!
आज सिस्टीम पुन्हा मरत मरत चालतंय..!


:सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, March 24, 2009

नवरा - बायको

.
लग्न होतं तेव्हा
तो असतो नवरा
ती असते नवरी

पावलावर पाऊल
चालतात सप्तपदी
हाती हात धरून
चढतात विवाहवेदी

स्वागत समारंभ
बुके बुफे थाटमाट
पाठवणीचे हुंदके
उंब-यावरचे माप

ज्या क्षणी नवरी
ओलांडून माप येते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते

कारण
त्याची नवरेशाही मग
आयुष्यभर पुरते
नवरीची नवलाई मात्र
विवाहवेदीवरच सरते

लग्नातल्या ’नव-या’चा रुबाब
संसारातही टिकून राहतो
लग्नातल्या ’नवरी’चा आब
संसारातच पिकून जातो

’नव-या’ची घोडदौड सुरू
’नवरी’चे रास्ता रोको होते
तो असतो 'नवरा'च..!
’नवरी’ मात्र बायको होते


:सौ. अनुराधा म्हापणकर

.
समस्त "बायको" वर्गाकडून एक घोषणा पत्रक :

ही कविता वाचून जे नवरे उत्तर देणार नाहीत
त्यांना ह्यातील मते पटली असे समजण्यात येईल

ही कविता वाचून नुसतेच "नो कमेन्ट्स" म्हणतील
त्यांनी सपशेल शरणागती पत्करली आहे असे मानण्यात येईल

ही कविता वाचून जे वादाला उभे रहातील..!
अर्थात .. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतो नाही का ? ह्यांच्या नवरेशाहीलाही असेल..!!

(आता सारे नवरे ग्रीन कॆटेगरीतले असतील नाही..??)

Saturday, March 14, 2009

पुन्हा सांजवेळी..

पुन्हा सांजवेळी
क्षितिजी सूर्य मावळत होता
आपले तेजबाहू
दशदिशांतून कवळत होता

रुंजी घालत सभोवती
त्या तेजोवलया विनविते
ये काकुळतीला ती धरती
पुन्हा पुन्हा ती मनविते

ही कातरवेळ,
जीवा लागे हूरहूर
दाटते दाहिदिशा
एक काहूर काहूर

आज अवसेची रात
चांदण्यांची साथ नाही
तुझ्यासवे साजरी
अशी एक रात नाही

बाहुपाशातून का रे
झाले अशी मी दूर
पाखरांचेही लोपले रे
ते गोड गोड सूर

झाडांपानांतून इशारे
मेघांनी अडवेन मी वाट
बघ धरला हात तुझा
सागराची होऊन मी लाट
पाहून धरेचा तो आवेश
निमिष एक सूर्यही गडबडला..
काय करावे बरे आता
आपल्या मनाशीच बडबडला
नको नको ग अडवू वाट
नको मोडूस माझी वहिवाट
निज तूही रात प्रहर
हा आलोच मी, होताच पहाट

तिमिराला भितो मी
वाढला तो -जातो मी
समुद्रस्नान घेतो मी
भल्या पहाटे येतो मी

आज नाही चांदणी
पहा सोबत माझी संधीप्रभा
नसेन जरी समीप तुझ्या
असेल परी माझी आभा
जाताजाता अलगद त्याने
सहस्त्रबाहुंनी तिज कवटाळले
आसवांचे थेंब दोन
अथांग सागरी त्या ढाळले

नित्यप्रमाणे भुलली ती
तेजात अशी झुलली ती
मिठीत विसरे देहभान
सांजवेळी अशी खुलली ती

क्षणात होई तो दिसेनासा
पाण्यात असा विरघळला
रक्तिमा तिच्या गालावरला
क्षितिजरेघेवर ओघळला

सौ. अनुराधा म्हापणकर

Saturday, March 7, 2009

क्रिटीकल

ती ही क्रिटीकल
आणि मीही..!

एकच गंभीर आजार
दोघींनाही..!

पण..
मला माहितेय..
मी सर्वाइव्ह होणार..
तिचं मात्र माहीत नाही..

कारण
न परवडणारा
खर्चिक आजार आहे हा

मी विकत घेईन डॉक्टर
आणि प्रत्येक मेडिकल एड

ती मात्र.. कदाचित
एकेका श्वासासाठी
देवाला आळवत राहिल

तिचा आजार महाग
आणि तिचा जीव स्वस्त आहे
माझं मरण मात्र
तिच्या वाटेवर व्यस्त आहे


:सौ. अनुराधा म्हापणकर

Friday, March 6, 2009

इंद्रधनुष्य

ती रुबाबदार कमान
आभाळात डौलाने झुकली
सप्त-रंग होते त्यात
पण प्रत्येक रंग
एकमेकांत मिसळलेला
एकही रंग दुसर्‍यापासून
वेगळा करणं अशक्य
तरी प्रत्येक रंगाने
टिकवून ठेवलं होतं
स्वत:चं वेगळं अस्तित्व
त्या इंद्रधनुकडे
अनिमिष डोळ्यांनी
किती वेळ पहात राहिले
कुठेतरी वाटत राहिलं मग-
.
माझ्या माणसांत विरघळताना
मीही हवी होती का जपायला
माझीही वेगळी ओळख..?


: सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, March 5, 2009

ऑनलाइन आहेस?

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हां चाळा होता
ह्या प्रश्नाचं उत्तर
येणार
नाही तरीही
स्क्रैपची
दखल कोणी
घेणार
नाही तरीही
लिहायचं अन् पुसायचं, ऑरकुटचा तो फळा होता

ऑनलाइन आहेस?.... प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
दिसायची होमपेजवर
पुन्हा पुन्हा ती नावे
उत्तर द्यायची पद्धत
नसावी त्यांच्या गावे
माझ्या उत्कंठेचा तरी स्टँमिनाच निराळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
माझ्याही फळ्यावर काही
अनुत्तरीत प्रश्न थकले
कितीदा तरी स्वहस्तेच
पुसून ते मी टाकले
दोष देण्याचा अधिकार म्हणून मला विरळा होता

ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता
अंगवळणी पडली रीत
हे जगच आहे व्हर्च्युअल
बोलाचीच नाती सारी
काहीच नसते एक्च्युअल
साक्षात्कार माझा मला झाला किती वेळा होता

तरी.. ऑनलाइन आहेस? प्रश्न तसा खुळा होता
पण मला लागलेला रोजचाच हा चाळा होता


: सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, January 22, 2009

लक्झरीज..!!

.
आईग्ग..
पाय दुखताहेत ग खूप्प.... रिक्षा..!

नो ग प्लीज
बसने नको नं जाऊया... टॆक्सी..!

ओह.. मम्मा
कित्ती कित्ती ग गरम होतय.. फॆन..!

शी ग्ग...!
फॆनखाली सुद्धा उकडतय.. एसी..!

मम्मा ग
ताटात पोळी थंड झाली.. मायक्रो..!

ईई नक्को ग
कशाला डाळभाताचा कूकर.. पिझ्झा..!

स्कूल प्रोजेक्ट्स..
कुठे ग पेपरात शोधतेस.. इन्टरनेट..!

श्रम नको..
त्रास नको..
सहनशक्ती नाही उरली..
लक्झरीज..!!
लक्झरीयस आयुष्याची
रक्तात सवय मुरली ..!
.
पण,
तुझी चूक नाही बाळा...!
मला तरी कुठे बसवतय फॆनविना..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

Thursday, January 15, 2009

पिग्गी बँक

.
लहानपणीचा स्टडीटेबलावरचा
तो मातीचा ओबडधोबड पिग्गी..!

पाच पैशापासून रुपयापर्यंत
तळव्यावर पडलेलं कुठलंही..
अगदी कुठलंही नाणं चालायचं
खण्णकन वाजत त्यात ते पडायच
तेव्हा कित्ती आनंद व्हायचा..

ती गच्च भरलेली पिग्गी बँक
तश्शीच आहे अजून टेबलावर
त्यातल्या नाण्यांची खणखणही
त्यात जपलेले आनंदाचे कणकणही

अलिकडेच कधी घेतलेले एफडीज
कितीदा घेतले आणि..
कितीदा मोडले...
गणितच नाही..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर