Saturday, October 17, 2009

आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

.
दिवाळीच्या दिवसांत तेव्हा गुलाबी थंडी पडायची
आई उटणं लावायची तेव्हा अंगात शिरशिरी यायची
थंड वार्‍याची ती मंद झुळुक अंगाला आता झोंबत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

तेव्हा दाराबाहेर असायची एखादीच लुकलुक चांदणी..
टांगलेला शंखाचा कंदील कुठे कुणाच्या तरी अंगणी
झगझग दिवे लखलख तरी त्या तेजाची संगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

ते उटणे चंदनी सुगंधी, अभ्यंगस्नान ते मलमली
दरवळून जाई आसमंत, ती पहाटी असे मखमली
फर्स्टअटेम्प्टमधे कार्टंही अंगठ्याने दुभंगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

फुलबाजी कशी अगदी झिरमिरी पेटायची
फुटू की नको म्हणत बिचारी लवंगी फुटायची
कर्णकर्कश सारे आता पूर्वीची ती गम्मत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

चकली करंजी शंकरपाळी लाडू नी चिवडा मस्त
फराळ भरलेले ताट तेव्हा मिनिटांत होई फस्त
रोजची पिझ्झा टेस्ट आता जीभेवरून पांगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही

वर्षातून एकदा दिवाळीला मिळायचे कपडे नवे कोरे
आता महिन्यातून दोनदा शॊपमॊलमधे होतात फेरे
अप्रूप को-या कपड्याचे आता कोणी कोणास सांगत नाही
आताशा दिवाळी पहाट तेव्हासारखी रंगत नाही
.
.
झालंय अस्सं की दिवाळी न दसरा
आताशा रोजचाच होऊन गेला
पण ’तो नवा कोरा आनंद’ मात्र
आता आठवणीतच राहून गेला


सौ. अनुराधा म्हापणकर