Monday, July 27, 2009

उद्यापासून..

.
सक्काळची धावपळ
नऊ चारची लोकल
मधला लेडिज डबा..
आणि ठरलेली जागा
सीटसाठी क्लेम रोजचा
जमणारा फड गप्पांचा
कुणी अळू वडी..
गरम थालिपिठ
इडली कोणी उप्पीट

धावत गाठलेलं मस्टर
सही करतानाच सुस्कारा
रोजची केबिन, टेबल-खुर्ची
कळकट फाइल्सचा ढिगारा

संध्याकाळी ठरलेली वेळ
५.४० ची रोजची गाडी
स्टेशनात शिरतानाची
ती सफाईदार उडी

कधी पेपरावर, हलकी नजर
वाचन थोडे, ज्ञानात भर
मटार सोलताना गप्पा कधी
गुंड्यातली कधी विणली लोकर

सारं कसं मस्त.. होतं..
आयुष्या हसत सरत होतं
घराबाहेरही आपुलकीचं
माझं एक कुटुंब होतं

उद्यापासून.. मात्र...
हे सगळं अचानक थांबून जाईल

कारण
ऑफ़िसातून येताना आज
मी शाल श्रीफळ घेऊन येणार आहे
पस्तिस वर्ष केली नोकरी
आणि आज रिटायर मी होणार आहे


सौ. अनुराधा म्हापणकर

Tuesday, July 21, 2009

'जनरेशन नेक्स्ट'

नको जबाबदारी नको बंधन
मंगळसूत्राची गेली आहे फ़ँशन
कशासाठी हवंय हे लग्न
आहे ना लिव्ह इन रिलेशन

थोडे दिवस मस्त एकत्र राहू
एव्हरी नाइट इज अ सेलिब्रेशन..
रेन्टल आहे फ़्लैट सुद्धा
रेशन कार्डाचंही नको टेन्शन..

मुलं बाळं पोरं ढोरं
एडमिशन्स आणि डोनेशन
नको असलेली प्रेग्नन्सी
आहे ना आय पील चे ऑप्शन

'जनरेशन नेक्स्ट'म्हणताना
आयुष्याला दिलीच नाही कमिटमेन्ट
भांडी बुडकुली, भिंतीशीही
कधी झालीच नाही अटाचमेंट

सारे तरी हे निर्जीव तसे
आता मनांचे गुंतणेही सरले
उगवत्या नव्या पिढीसाठी
आम्ही निवडुंगाचे बीज पेरले


सौ.अनुराधा म्हापणकरकुणाला पटतं.. कुणाला पटत नाही
तरी वाद घालावा, असं मला वाटत नाही

लग्न करुन तरी आयुष्यं कुठे मिळतात
लग्न केल्याने तरी मनं कुठे जुळतात

लग्न टिकली तरी त्यालाही असतो.. "पण"
खरतर असायलाच हवी मनांची गुंफण

ओनरशिपच्या फ्लॅटमधला संसार
आणि कायम एकत्र रहाण्याचा करार

प्रत्येक नाईट नसेलही सेलिब्रेशन
नव्या दिवसाला लागतं नवं रेशन

तरी प्रश्न मला पडतोच........

तडजोड म्हणून केलेला
"लिव्ह इन" चा तात्पुरता संसार ?
की संसारातली तडजोड आणि
"लाइफ टाइम" एकत्र राहण्याचा करार ?

कधी ती चुकते.. कधी तो..
पण तरी करार तुटत नाही
एवढ्या तेवढ्या कारणांनी
संसारातली साथ सुटत नाही

सोय म्हणून संसार मांडायचा
आणि गैरसोय होतेय म्हणून
सोयिस्करपणे मोडायचा..
की
संसार मांडून एकमेकांची
सोय पाहायची..
हा ज्याचा त्याचा प्रश्न..!!
नाही का ?...............

अनुराधा म्हापणकर

Thursday, July 2, 2009

स्विच..!!

तुझं आपलं बरंय..
तुझं आपलं बरंय..

लाडात येत मधेच
तुला रोमँटिक होता येतं
मग अचानक सणक येऊन
कामातही बुडता येतं

मला सावरताना तुला,
माझं टॉनिक होता येतं
स्वत:ला आवरता येत नाही,
आणि पँनिक होता येतं

स्विच ऑन.. स्विच ऑफ़..
कधीही..
तुला हवं तेव्हा..!

देशील का तो स्विच
हातात माझ्या..?
ऑन आणि ऑफ़, मग
मला हवं तेव्हा..!!


:सौ. अनुराधा म्हापणकर