Friday, June 29, 2012

मेणबत्ती
















तसं पसंत होतं मला
असं मेणबत्ती होऊन जगणं
तसं फारसं होतंच कुठे
माझं आयुष्याकडून मागणं

तुझ्यापुरतं पेटणं
तुझ्यापुरतंच पेटून उठणं

तू..
तू हवं तेव्हा काडी लावलीस
तू..
तू हवं तेव्हा मला पेटवलंस
आणि तुला नको वाटलं  तेव्हा
माझं अस्तित्व तू मिटवलंस

जळताना कळतं होतं
कळताना जळतंही होतं
"मी" ... संपतेय....
"मी" ........... संपतेय ... !!

माझ्या प्रकाशाने तुला उजळवणं
हेच माझं प्राक्तन..
कारण माझा जन्मच मेणबत्तीचा !
.
शेवटी ..
कुणाचे डोळे दिपवून टाकायला
मी सूर्य थोडीच होते ???

वाटलं ते इतकंच..
वा-यावादळाततरी माझ्याभोवती
तुझ्या हातांची ओंजळ धरली असतीस तर !!

अनुराधा म्हापणकर

Monday, June 18, 2012

आता उगा कशाला हा पूर आसवाचा
तो पदर रेशमाचा जेव्हा भिजून गेला


घटिका जगावयाची उरलीच नाही हाती
क्षण थांबले ते सारे, केव्हा थिजून गेला


चाले कशास आता हे श्वास मोजणे की
डोळ्यांत प्राण माझ्या जेव्हा विझून गेला


शृंगार साज तेव्हा वायाची गेले सारे
चेहरा कलेवराचा फुका सजून गेला


ही चंदनी सुगंधी रचिली चिता कशाला
हा देह चंदनाचा जेव्हा झिजून गेला


अनुराधा म्हापणकर