Friday, February 15, 2008

बाबा.. तुम्हाला श्रद्धांजली...


बाबा.. तुम्ही गेलात...
आणि.. कळून चुकलं..
तुमच्यासाठी दोन शब्द लिहायचीही..
तुम्हाला श्रद्धांजली वाहायचीही..
लायकी नाही आमची..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

खुजे आम्ही.. तुम्ही वट वृक्ष होतात..
आम्ही पारंब्यानाही तुमच्या कधी धरले नाही
उन्मळलात आता - तरी पाळेमुळे रुजलेली खोलवर
स्वत:चे पायही जमिनीवर आम्ही नीटसे रोवले नाही

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत.. आम्ही इतुके थिटे..

दु:खिताना आनंदवन देणारे तुम्ही..
स्वत:च्या घरातही आम्ही अद्याप आनंद फुलवलेला नाही..
पिडितान्चे पितृत्व खांद्यावर घेणारे तुम्ही..
आणि आमच्याच मातृपित्याला वृद्धाश्रमि धाडणारे आम्ही..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे..

स्वत:च्या अंगी प्रयोग म्हणून
विषाणू घेतलेत महारोगाचे टोचून..
लोभ, कपट, अहंकार, मत्सर.. नामक
किडे कीटक मिरवतो आम्ही शरीरातून..

तुम्ही खूप मोठे होतात.. आम्ही खूप छोटे..
मान उंचावुनही तुम्ही दिसणार नाहीत आम्ही इतुके थिटे

घुडगे टेकून नतमस्तक तुम्हापुढे..
उरले एकच परी मागणे..
आनंदवन अपुल्या घरापुरते तरी
शक्य होऊ दे आम्हा जपणे.........
.
.

:आनंदवनात माझ्या..
:मी..
:सौ. अनुराधा म्हापणकर.

1 comment:

  1. अतिशय सुंदर लिहिलय तुम्ही, शब्द आणि शब्द आतून आलेला जाणवतोय...

    आणि त्याच बरोबर या महामानवापुढे आपण खरोखरच किती लहान-थिटे आहोत हे ही प्रकर्षाने जाणवले.
    आता आपल्यात योग्य बदल घडवून आणणे हीच या महामानवाला खरी श्रद्धांजली ठरेल.

    -- सुधीर हर्डीकर

    ReplyDelete