Monday, July 27, 2009

उद्यापासून..

.
सक्काळची धावपळ
नऊ चारची लोकल
मधला लेडिज डबा..
आणि ठरलेली जागा
सीटसाठी क्लेम रोजचा
जमणारा फड गप्पांचा
कुणी अळू वडी..
गरम थालिपिठ
इडली कोणी उप्पीट

धावत गाठलेलं मस्टर
सही करतानाच सुस्कारा
रोजची केबिन, टेबल-खुर्ची
कळकट फाइल्सचा ढिगारा

संध्याकाळी ठरलेली वेळ
५.४० ची रोजची गाडी
स्टेशनात शिरतानाची
ती सफाईदार उडी

कधी पेपरावर, हलकी नजर
वाचन थोडे, ज्ञानात भर
मटार सोलताना गप्पा कधी
गुंड्यातली कधी विणली लोकर

सारं कसं मस्त.. होतं..
आयुष्या हसत सरत होतं
घराबाहेरही आपुलकीचं
माझं एक कुटुंब होतं

उद्यापासून.. मात्र...
हे सगळं अचानक थांबून जाईल

कारण
ऑफ़िसातून येताना आज
मी शाल श्रीफळ घेऊन येणार आहे
पस्तिस वर्ष केली नोकरी
आणि आज रिटायर मी होणार आहे


सौ. अनुराधा म्हापणकर

3 comments: