Saturday, June 14, 2008

एक बातमी तीच तीच..

कोणाचे कोसळे छप्पर..
कुठे कोसळली भिंत
पाऊस कोसळतो ऐसा
त्याला नसे रे उसंत

ओल्या आडोश्याला घरटे
त्याला प्लास्टिकची चादर
त्याची फाटलेली लुंगी
तिचा ओला ग पदर

भुईवर तळे, त्यावरी गळे
फाटके डोईवरले छत..
हाय आभाळ फाटले
त्याला वार्‍याची सोबत

देवा आक्रित घडले..
कसे उडाले रे छप्पर
शेजारले हे गटार
तेही येई वर वर

नशिबाने केली दैना
वाहिली झोपडी-घरटे
डोळ्यालाही येई पूर
उघडा संसार झाकते
.
.

एक बातमी तीच तीच
टीव्ही चैनल पुन्हा दळते
मिलन सबवे ला भरले पाणी
आणि ट्रेन उशिराने पळते

सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

  1. Excellent !!!

    Virodhabhas khup sundar varnan kelay...

    ReplyDelete