Thursday, May 21, 2009

सुखाचा संसार

.
तो म्हणाला,
आकाशातून तो चंद्र आणतो उचलून
ती म्हणाली, वाट अडवून
नको, चंद्राला हेवा वाटेल मला पाहून

तो म्हणाला
ओंजळीत घेतो चांदणं, तुझ्यावर उधळतो
ती लाजली, म्हणाली इश्श्य..
नजरेच्या चांदण्यानेच जीव मखमाली होतो

तो म्हणाला
तुझ्यासाठी बांधेन संगमरवरी ताज महाल
ती म्हणाली, लटक्या रागात,
दहा बाय दहाची खोली झाडताना होतात हाल

तो म्हणाला
तुझ्या वाटेवर फुलांच्या पायघड्या घालू का
ती हसली, ओठांच्या पाकळ्यात
कशाला? उगाच फुलांना वाटेवर सांडू नका

जगावेगळं काही तिच्यासाठी
करण्यासाठी तो धडपडत राहिला
ती अडवत राहिली.. नेहमी
आणि संसार सुखाने भरुन वाहिला


:सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment: