Monday, January 18, 2010

जन्म रहस्य?

थांबणार का कधी रे
हेटाळणारे ते हास्य
कळेल का कधी रे
मम जन्माचे रहस्य

कोण मी कुठला आहे
ब्राह्मण, म्हार दलित
कोण आहे मायबाप
कोणाचे बीज फलित

भाळी प्रायश्चित्त लेख
न घडलेल्या पापाचे ?
हसा लेको हसा तुम्ही
लावता नाव बापाचे

"सूतपुत्र" ज्या कथिले
सूर्यबिंब तो साक्षात
वीराहूनी कूळ श्रेष्ठ
अशी दुनियेची रित

मातृत्वाचा तो उच्चार
त्या सूर्यपुत्रही वंचित
नियतीला शरण मी
क्षुद्र मनुष्यनिर्मित ..!


: सौ अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment