Monday, December 21, 2009

ऊठ ना..रे....

ऊठ ना रे - बघ ना - किती वाजले
त्याच्या कानात, तिचे शब्द कुजबुजले

कूस परतत म्हणाला- थांब ग
अम्मळ थोडं निजू दे
पहाटेच्या ओल्या दवाने
तुझं अंग अंग भिजू दे

ती रुसली-मुसमुसली- म्हणाली
अस्सं रे काय - आज का आळस ?
लगबग झाली चहुदिशां परी
सा-या देवळांचे अंधारलेले कळस

रोज उठतो ना ग वेळेवर
सोमवार शनिवार रविवार सुद्दा !
एकदा आला कंटाळा मला
तर किती ऐकवशील अद्वातद्वा !

ती आली काकुळतीला
म्हणाली, नाही रे - तस्सं नाही,
मला किनई मनापासून
तुला अजिबात त्रास द्यायचा नाही

बघ, रुसलास ना ! …………
अनादि काळ तुझ्यामागे रुंजी घालतेय
आणि तुझ्याभोवताली अथक फिरतेय..
मान्य मला..
तुझ्याशिवाय वेगळाले अस्तित्व नाही
माहीत आहे तुझ्याविना -
माझ्या असण्यालाही महत्व नाही

म्हणूनच म्हणते…हे सूर्यनारायणा,
माझ्यासाठी तरी आता ऊठ ना रे…

अनावर झोपेचा मोह
जरी आवरता आवरेना
पृथ्वीचा लाडिक हट्ट..!
त्याला मोडता मोडवेना

आपल्या सहस्त्रबाहूंनी त्याने
तिला आलिंगन देऊ केले..
आणि दाहिदिशा उजळून निघाल्या..!


: सौ. अनुराधा म्हापणकर


डिसेंबर २१, २००९
(आज सूर्य उशीराच उगवला !)

2 comments:

  1. व्वा ! अगदी कुसुमाग्रजांची आठवण करून दिलीस !

    ReplyDelete