Monday, February 15, 2010

अगतिक..

हातातून एकाएकी सारं निसटावं
तसं सारं सुटून जात होतं
पायातलं सारं बळ गळून जावं
तसंच तिला वाटत होतं

भरल्या नजरेतून पाणी वाहिलं
त्याक्षणीही तिला आठवत राहिलं
.
.
तिच्या बाळाचं बारसं - त्याचं बालपण
असामान्य हुशारीने चमचमणारं शिक्षण
त्याच्या सर्वांगिण वाढीसाठी
तिने वेचलेला आयुष्यातला क्षणन क्षण
त्याच्यासाठी अहोरात्र झटताना
तिचं स्वत:च झिजून जाणं कण कण
सदैव यशाच्या शिखरावर असताना
त्याच्यात प्रयत्नपूर्वक जपलेलं माणूसपण

तिने घडवले त्याला.. सुसंस्कारही दिले..
फक्त.. "अपयश कसं पचवायचं ?"
हे शिकवायचे मात्र राहून गेले.......
.
.
आता मांडीवर त्याचं थंड होत चाललेलं डोकं..
आणि हातात त्याचं रक्ताळलेलं मनगट धरून
बसली आहे अगतिक.. हॊस्पिटलच्या वाटेवर... !!!!
.
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment