Monday, February 15, 2010

तिची अट ..


आज पुन्हा कांदे पोहे..
गुण जुळलेली पत्रिका
स्वैपाक नोकरी आवडीनिवडी
मॊड्युलर प्रश्नपत्रिका

ती पुन्हा साडी सावरत
वाफाळणारा चहा घेऊन
प्रत्येक प्रश्नाला तिचं उत्तर
नजरेला नजर देऊन

देखणी हुशार शिकलेली
नोकरी कायम पगारी
गृहकृत्यदक्ष अदबशीर
ती सुसंस्कृत व्यवहारी

अघळपघळ गप्पांत
चहाचा कप सरला
"पसंत आहे मुलगी"
त्यांनी ’हो’कार भरला

तिचा चेह-यावर तटस्थ
को-या निर्विकार भावना
डोळ्यात होती अस्पष्ट
खुपणारी एक वेदना
.
.
"विचार करुन कळवतो"
ते म्हणाले, बैठक उठली
अपेक्षित तिला होते तशी
गाठ जुळताजुळता सुटली
.
.
.
ध्यानीमनी तिच्या नसता
त्या रात्री अघटीत घडलं
तिच्या विधवा गरिब आईने
स्वत:ला संपवून टाकलं

जाता जाता इतकंच म्हटलं
"लग्न करुन सुखी हो बाळा..
माझ्या जबाबदारीतून तुला मी
आता कायमचं मोकळं केलं......"


: सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment:

 1. हि कविता वाचताना सुरवातीला बस स्वताचे आयुष्य , अनुभव, स्वप्न असेच विचार होते आणि शेवटच्या चार ओळीत काळजात धस्स झालं .... आयुष्यातील हि अशी पहिलीच कविता , ... एका भल्या मोठ्या पुस्तकाला चार ओळीत मात दिलीत ..... उरलेला ब्लॉग जरूर वाचेन ..
  जन्मभर लक्षात राहील ....
  .......
  ◄♪♫ संदिप पाटील ♫♪►
  ♥ ♦ मुंबई ♣ ♠

  ReplyDelete