Thursday, March 18, 2010

"ती"....

जगण्याचा ध्यास ती, मूर्त स्वप्नभास ती
मूक शब्दा गवसलेला, मंजुळ स्वरभास ती

आयुष्याच्या मध्यांतरी, परतलेले शैषव ती
अल्लड अवखळ चंचला, मृदु कधी मार्दव ती

उसळणारा प्रपात कधी, अन खळाळता झरा ती
डोळ्यांतूनी उगा बरसत्या, कधी श्रावणधारा ती

कोसळताना सावरणारी घट्ट एक आधार ती
विस्कटताना आवरणारी लयबद्ध आकार ती

तिचेच देणे, जगण्यास आले, माझ्या जे, पूर्णत्व ती
माझाच वारसा लाभलेले, पारंपारिक स्त्रीत्त्व ती

कोण म्हणोनी काय पुसता, माझेच प्रतिबिंब ती
चांदणरात्री झळाळणारे, पूर्ण ते चंद्रबिंब ती

नाही दुजी अन्य कोणी, तिच्यासम एक ती
आहे माझ्या लाडाची, एकलुती एक लेक ती

अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment