Thursday, March 25, 2010

अग्नीपरिक्षा

जानकीस म्हणे श्रीराम, प्रिये, भूतली पहा जरा
जन्मदिन माझा आजि, उत्साहे होतो साजरा

पहा चहुकडे सारा, पसरला संतोष आहे
मंदिरात राऊळीही, माझा जयघोष आहे

मानवाने सागरात, उभारिला उंच सेतू
जैसा मीही रचिलेला, विसरलीस काय तू

माझ्या जन्मप्रीत्यर्थे, आज सेतूचे उद्धाटन
कितिक थोर जनांस, तेथ केले पाचारण

पुन:श्च वाटे जन्मावे, धरणीवरी अवतरावे
याचि देही याची डोळा, सारे ते अनुभवावे

ऐकोनी श्रींची वचने, जीव जानकीचा थरथरला
म्हणे नाथ कशासाठी, हा भलताचि हट्ट धरला

नाथा होईल अनर्थ, क्षणभरी विचार करा
कलियुगे जन्मापरी, तो वनवास होता बरा

एकटाच तो मायावी, होता रावण लंकाधिपती
मात्र कलियुगात या, रावणाचीच आहे भरती

तुम्ही साक्षात परमेश्वरी अंश, तुम्हांस न अशक्य काही
रावणराज्यात परि सीता पुन्हा,अग्नीपरिक्षा देणार नाही

सौ. अनुराधा म्हापणकर

8 comments:

 1. माझ्या जन्मप्रीत्यर्थे, आज सेतूचे उद्धाटन
  कितिक थोर जनांस, तेथ केले पाचारण
  "कितिक चोरास कि हो,तेथ केले पाचारण" असं म्हंटलं असतं तर बरं झालं नसतं का?
  http://savdhan.wordpress.com

  ReplyDelete
 2. अप्रतिम लेखन!!

  ReplyDelete
 3. स्त्रीहट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट ह्यापुढे कोणाचेही काही चालत नाही म्हणतात.
  सीतेने मायावी सुवर्णमृगाचा हट्ट धरिला नसता तर रावणकाण्ड घडले नसते हा विचार नक्की महत्वाचा आहे.. :-)

  ReplyDelete
 4. तुम्ही साक्षात परमेश्वरी अंश, तुम्हांस न अशक्य काही
  रावणराज्यात परि सीता पुन्हा,अग्नीपरिक्षा देणार नाही
  .
  .
  .
  इथेच तोडलंयस !

  ReplyDelete
 5. @शिरिष,
  सीतेने मायावी सुवर्णमृगाचा हट्ट धरिला नसता तर रावणकाण्ड घडले नसते हा विचार नक्की महत्वाचा आहे.. किंवा रावणकाण्ड घडायचे होते म्हणून सीतेने मायावी सुवर्णमृगाचा हट्ट धरला असाही विचार होऊ शकतो.

  ReplyDelete