Wednesday, June 16, 2010

देवकी

हे कान्हा…
तू माझा की यशोदेचा
मला प्रश्न नाही पडलेला
माझ्या मातृत्वाचा श्वासही
तुझ्यासाठी नाही अडलेला

तरीही काही प्रश्न आहेत..
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

न मागताही तुझ्यासम दैवी रुप उदरी आलं
म्हणून भाग्याने मी उजळायचं,
की
तुला जन्म देऊनही वांझोटपणच पदरी आलं
म्हणून दैवावर मी उसळायचं...
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?

"राम" म्हणून तू जन्म घेतलास तेव्हाही..
"कृष्ण" म्हणून माझ्या उदरी आलास तेव्हाही
तू त्राताच होतास..
कर्त्यव्य तत्पर.. जगाचा, युगाचा
उद्धारकर्ता होतास ...

तेव्हा वनवासात गेलास ते,
पित्याच्या वचनपूर्तीसाठी..
की रावणाच्या पापविनाशासाठी..?
आताही जन्म घेतलास तो
कंसाच्या दुष्कृत्याच्या विनाशाचे
लिखित होऊनच..!

कारण कुठलेही असो..
तेव्हाही.. तसेच..
कौत्सल्याराणीचे पुत्रवियोगात रडणे
आणि आताही
देवकीचे तुझ्यासाठी व्याकुळ होणे
प्रत्येक वेळी ..
आईची कूसच का पणाला लावलीस
.
हे कान्हा...उत्तर देशील.. ?


: अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment