Wednesday, June 9, 2010

पहिला पाऊस

आला पहिला पाऊस
धरा झाली चिंब ओली
कोणा सुचली कविता
कोणी लिहीली चारोळी

कोणी प्रेमी झाडामागे
होते झालेले बेभान
तिचे ओलेते सौंदर्य
आज आले मोहरून

तापलेली वसुंधरा
शांत थंड झाली थोडी
नभातूनी बरसली
धार अमृताची गोडी

आली निश्चिंती निवांत
आता भरतील तळी
अशी फुलली म्हणोनी
जनसामान्याची कळी

तरी जीवा नाही थारा
आहे घोर परी चिंता
कशी उडालेली दैना
एक सर येता येता

त्रेधा चालताना पाय
खड्डयांत अडखळती
कुठे पाण्यांची डबकी
कधी भिंती कोसळती

कशी ट्रेन लेट आली
कुठे रुळ उतरले
आणि सबवेत पाणी
उगा ट्राफिक फसले

तो आहे "मुंबईकर"
नाही नशिबी सुटका
ऊन असो की पाऊस
त्याला सदैव फटका
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

1 comment: