Saturday, April 26, 2008

कविता मला स्फुरलीच नाही

.
कुठलीही संवेदना का
माझ्यापाशी उरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

शब्द होते साचलेले
पण काव्यपंक्ती मुरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

आतुर माझी लेखणी फार
शाई त्यातुनी परी झरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही

मनास उधाण जणु आलेले
पोकळी त्याची परी भरलीच नाही
कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
.
.
मूक शब्दांचे ते वाहत जाणे
काठावर बसोनी मी पाहते
दुखरी एक वेदना मनाची
अव्यक्तच बापडी राहते..

ठसठसते ती जखम बिचारी
खपली त्यावरी धरलीच नाही
खरच..!!.. कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही
:
:
सौ. अनुराधा म्हापणकर

10 comments:

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

कधी कधी असही होतं..
मनात काही साचत जातं..
कागदावरती उतरत नाही..
वाईट वाटून घ्यायचं नाही..
नाराजसुद्धा व्हायचं नाही..

यायचे तेंव्हा येतात ...
कागदावरती शब्द..
मुद्दामहून आणायचं नाही..
आले नाहीत म्हणायचं नाही..

कविता करत नाहीत ..
त्यांनाही असतातच ना भावना..
लिहणार्याने भावना..
विरून गेल्या म्हणायचं नाही ..

--
आनंदा

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

आनंदा..
साचतं रे मनात
बरच काही असतं साठलेलं
भावनांचं एक गच्च आभाळ
भर भरून असतं दाटलेलं

कविता करत नाहीत
त्यांनाही भावना असतात
मूक्या प्राण्यासुद्धा नाही का
कित्ती वेदना असतात

पण हे दु:ख कवि मनाचे
कविच फक्त जाणत असतो..
जावे त्याच्या वंशा म्हणत
शब्द गुणगुणत असतो..


-अनुराधा

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

jevhaa suchate tevhaa ashee suchate..

पातेल्यात डाळीला जेव्हा तडतडून देते फोडणी..
आह!कशी उस्फूर्त शब्दांची गेली जमून मांडणी..!!
कोथिम्बीर,थोड़े आलेलसूण, गरम मसाला शिवरते..
डाळ शिजते एकीकडे -दुसरीकडे कविता मला स्फुरते..!!

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

कधी कधी असतो ... अक्षरांचा संप..

रुसून बसतात अक्षरं
माझ्यावरती जेंव्हा..
फ़क्त पाटी पुसत बसतो मी..
लिहीणं जमतच नाही तेंव्हा..

माझ्याकडून कुठलच अक्षर..
थोडंसुद्धा वळत नाही..
घड्याळाचा कासव होतो..
वेळ काही पळत नाही..

अशा वेळी ट ला ट सुद्धा..
वाटू लागतो चांगला..
चालत नाही शब्द तर ..नाही..
आज थोडातरी रांगला..

अशाच वेळी व्हायचं सावध..
लिहीण्यासाठी लिहायचं नाही..
पिंजर्यामधे अडकलो तर..
आकाशात उडायला मिळायचं नाही...

-
आनंदा

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

अक्षरांचा संप.. बाप रे.. कधी कधी असू नये
अक्षरांनी बिच्चार्‍या कवींवर कधी कधी रूसू नये
कवितेत नुसतेच ट ला ट कधी कधी दिसू नये
कविता असावी अर्थ पूर्ण.. भाव शून्य भासू नये

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

फॊडणीला होते शब्द
कढईत चांदण्या.
कल्पनेचा बेत होता
प्रतिभेने शिजविला
थोडी आच..थोडी आग
थिडी हवा थोडे पाणी
मीठ मोहरी..हळद सारे
मोजूनच कसे होते
खमंग जमला स्वयंपाक हा
आज पोटाला हो विसरा
ठेवू नका म्हणते सुगरण
वरचा मजला रिकामा

:चैतन्याचे झरे

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

अनु....

भावना गोठतात ग मनात
मग वाहती झुळकन वाट
गवसत नाही
थंड, बर्फ़ाळ, कठोर,
फ़क्त शब्द होतात
म्हणून मग काही
स्फ़ुरत नाही

:निरु - suruchi

सौ. अनुराधा सचिन म्हापणकर said...

सुरुची..
आला ग उन्हाळा..
वितळून जाईल बर्फ़...
गोठलेल्या भावना आता
झरे होऊन वाहतील
थोडीच सोसूया झळ
शब्दही आता स्फुरतील..

begum said...

itak surekh lihitaa, taree mhantaa kee kavitaa sfuralee naahi.
kaay mhanaav baee hya vinamrapanaalaa.

माधव कुळकर्णी said...

मूक शब्दांचे ते वाहत जाणे
काठावर बसोनी मी पाहते
दुखरी एक वेदना मनाची
अव्यक्तच बापडी राहते..

ठसठसते ती जखम बिचारी
खपली त्यावरी धरलीच नाही
खरच..!!.. कित्ती दिवस झाले
कविता मला स्फुरलीच नाही


सही.... खुपच आवडल्या भावना -