Friday, April 11, 2008

पिंजर्‍याची मला सवय झाली..

.
.
एक मोकळा श्वास घ्यावा
तर कितिक बंधने भोवताली
का आता मलाच माझ्या
पिंजर्‍याची सवय झाली....

जरा कुठे तोडू म्हटलं तर
पायातली बेडी तुटत नाही
हं.. पैजण म्हणतात खरं तिला
पण पाऊल जड.. उचलत नाही..

खिडकी बाहेर डोकावून कधी
मंद झुळुक घेते अंगावर
कधी झेलते तुषार थेंबांचे
निस्तेज फिक्या गालावर..

ते करतानाही मनावर माझ्या
मोरपीस आता फिरते कुठे
मरून गेलेल्या संवेदनाना
हौस मौज तरी उरते कुठे....?

सवयीनेच सारे लादले आहे
दोष कोणाचाच मी मानत नाही
की निरिच्छ मनालाही काही असेल हवं
जे माझं मीच जाणत नाही..??
.
.
सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment