Monday, September 1, 2008

देव आज मूडमधे नाही..

तिन्ही सांजेची वेळ
देवघर दिव्याने उजळवलं..
देवाला हात जोडले..
रोजचच मागणं मागितलं

पण आज कदाचित देव मूड मधेच नसावा..

माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं
म्हटलं असेल काही.. मीही लक्ष नाही दिलं..

काही केल्या माझ्याकडे देव जेव्हा बघेना
मलाही मग तेव्हा अजिबातच राहवेना..
म्हटलं बाबा.. तुझ्या मूडला आज काय बरं झालं..
सांग ना रे.. माझ्याकडून काय चुकीच घडून गेलं
तरी देव गप्पच.. !! घुश्श्यातच बसलेला..
कधीच नव्हता खरतर माझ्यावर असा रुसलेला

आठवत राहिले मग.. नक्की आज काय चूक झाली
की पूर्वीच्या कुठल्या चूकीची देवाला आठवण झाली

नाही म्हणायला चुकले खरी.. आज चिडचिड केली फार
आदळाआपटही केली थोडी.. आज शब्दांनाही होती धार

आजचे मागणे माझे.. म्हणून नामंजूर झाले
आज थोडी जास्तच कारण मगरूर मी झाले

कधीची देवाच्या दारात
ताटकळत उभी मी हात जोडून..
म्हटलं नको आज काही..
पण एकदा माझ्याकडे बघ तरी वळून..!
.
.
:सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment