Monday, September 1, 2008

आता पश्चाताप..

जिंकलो आम्ही दोघे
मुलगा डॉक्टर होऊन आला..
एम.बी.बी.एस. नाही नुसता
एम.एस. सर्जन होऊन आला

बालपणीच रुजवलेली
त्याच्या मनात ही जिद्द
त्याच्या शिक्षणासाठी
आम्ही कष्ट केले बेहद्द

पण हे काय.. विपरित?
म्हणतो -इथे राहाणार नाही
परदेशातून आले बोलावणे
इथे प्रक्टिस करणार नाही

समजावले- किती विनवण्या
हातही जोडून पाहिले
आईबाप असूनही मुलापुढे
लाचार होऊन पाहिले

ईमेल आले काल
आज अपॉन्टमेंटचे पाकीट येईल
व्हिसाही मिळेल आता
आणि एअर टिकीट येईल

चूक त्याची नाही
त्याला आम्हीच घडवले होते
महत्वाकांक्षाना त्याच्या
आम्हीच तर रूंद केले होते

मोठं करताना त्याला
जिद्द-ईर्षेचे पंख लावले होते
लक्षातच आले नाही कधी-
त्याच्यातले "माणूस"पण खुंटले होते

आता पश्चाताप..
ज्याचा काडी मात्र उपयोग नाही
त्याच्यासोबत म्हातारपणीचे दिवस..?
आमच्या पत्रिकेत तो योग नाही..:सौ. अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment