Sunday, January 13, 2013

कितीही म्हटलं तरी.....!!


कितीही आणलं उसनं अवसान जरी
कितीही ठेवलं मनानं अवधान तरी

कितीही जपली डोळ्यात तेल घालून
समजूत आपली घातली बोलून बोलून

कितीही सांगितल्या धीराच्या चार गोष्टी
कितीही म्हटलं ठेव चहुवार चौकस दृष्टी

कितीही जरी दिले युक्त्यांचे कानमंत्र
स्वरक्षणाचे कितीही शिकवले जरी तंत्र

कितीही म्हटलं, घाबरायचं काही कारण नाही
कितीही म्हटलं, कोणाला जायचं शरण नाही

कितीही मी म्हटलं तरी…
नाक्यावरच्या वाण्याकडेही आता
तुला पाठवायची वाटते भीती
काय सांगू, तुला कसं सांगू पोरी
सभोवार लांडगे कोण आणि किती

कुठवर तुला मी असं पदराआड जपणार
कुठवर अशी माझ्यापाठी पोरी तू लपणार

लाज भीतीचं बंधन तुला मोडायला हवं
लढ गं ! .. स्वत:साठी तुला लढायला हवं..
लाळ गळणा-यांचं थोबाड फोडायला हवं
आता फक्त त्या लांडग्यानीच रडायला हवं..

हं !! माझ्या आईपणाच्या बेडीलाही
मी आता तोडायला हवं….
पण.. शेवटी…
कितीही म्हटलं तरी ………. !!

: अनुराधा म्हापणकर

No comments:

Post a Comment